bhargavi chirmule

यंदाचा ‘सांस्कृतिक कलादर्पण’चा (Sanskrutik Kaladarpan Award) सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री भार्गवी चिरमुलेला (BahrgaviChirmule) मिळाला. ‘गुल्हर’ (Gulhar) या सिनेमासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आजवर भार्गवीने अनेक सिनेमा, नाटक आणि मालिकेतून काम केलं आहे. या कामांचं प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केलं. पण तिला कधी पुरस्कार मिळाला नाही. पुरस्कारापासून ती कायम वंचितच राहिली, पण यंदा ‘संस्कृती कलादर्पण’च्या पुरस्कारावर बाजी मारून तिने पुरस्कारांचा श्रीगणेशा केला आहे. तेव्हा याच निमत्ताने भार्गवी चिरमुलेची खास मुलाखत.

  स्मिता मांजरेकर, मुंबई : संस्कृती कलादर्पणचा पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. प्रत्येक कलाकाराला बक्षीस मिळणं म्हणजे त्याच्या कामाची ती पोचपावती असते. तसंच मला हा पुरस्कार घेताना अधिक आनंद वाटला. कारण माझी आई अशा पुरस्कार सोहळ्याला पहिल्यांदाच आली आणि मला पुरस्कार मिळाल्याचा आनंद मी तिच्या डोळ्यात पाहिला.

  कामाचं कौतुक पण पुरस्कारापासून वंचित
  मला आत्तापर्यंत सिनेमा, नाटक यासाठी मला नॉमिनेशन मिळालं होती. पण कधी बक्षीस मिळालं नव्हतं. या सिनेमाच्या माध्यमातून मी पुरस्काराचा श्रीगणेशा केला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांनी पाहिला. छोटा सिनेमा होता. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचायला आम्हाला कठीण गेलं. पण या पुरस्काराच्या माध्यमातून आता तो अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचेल. ‘गुल्हर’ची कथा म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे आणि त्यातील राधापण साधी आहे. त्या राधाला हे बक्षीस आहे.

  सिनेमाची कथा
  ‘गुल्हर’ सिनेमात मी राधाची भूमिका साकारली आहे. ‘गुल्हर’ त्या मुलाचं नाव आहे. धनगर समाजावर तो सिनेमा आधारित आहे. एका मुलाची त्याच्या प्राण्याप्रती असणारं प्रेम आणि भवाना याचा मागोवा या सिनेमातून घेण्यात आला आहे. प्राणीप्रेम हे माझ्यामध्येसुध्दा आहे. त्यामुळे हा सिनेमा माझ्या अगदी जवळचा आहे.

  सिनेमातील संदेश
  या सिनेमातून आम्ही एक संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की,प्रत्येक जण आपापलं काम करत आहे. तुम्ही तुमचं काम मनापासून करा आणि तुमचं काम करताना किंतु, परंतु मनात नका ठेऊ. दैव कायम तुमच्या पाठीशी असतं.

  पुरस्काराने जबाबदारी वाढली
  पुरस्कार मिळाल्यावर शाबासकी तर नक्कीच मिळते. पण त्याचबरोबर जबाबदारीपण वाटते की, याच्यापुढे आणखी चांगलं काम करायचं आहे. थोडंसं काही वेळेला असमाधानही वाटतं. कारण हा पुरस्कार सहाय्यक अभिनेत्रीसाठी मला मिळाला आहे. पुढच्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पुरस्कार मिळावा असं वाटतं. कारण कुठलाही कलाकार कधीच मनाने समाधानी असू शकत नाही.

  समाजाचं प्रबोधन करणारी भूमिका भावते
  मी करिअरच्या सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. मग ती टीव्हीच्या माध्यमातून असो नाटकाच्या किंवा सिनेमाच्या माध्यमातून असो. सुरुवातीला मला ऐतिहासिक भूमिका करायची होती आणि ‘जिजामाता’ सिनेमाच्या माध्यमातून मी जिजाऊंची भूमिकाही केली. सध्या समाजाला वेगवेगळ्या विषयातून प्रबोधन करतील अशा भूमिका करायला मला नक्कीच आवडेल. ‘आई मायेचं कवच’ ही मालिका त्याच पठडीतील आहे. या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आजकालच्या समाजात अचानक असमतोलपणा आलाय. मुलं खूपच सोशल मीडियाकडे वळलेली आहेत. आधीची पिढी त्यांना बाधक वाटते.