Salman Khan (7)

सलमान खानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.

  मुंबई : आज सकाळी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दुचाकीवर आलेल्या एका अज्ञाताने गोळीबार (Salman Khan House Firing News) केला. या घटनेनं मनोरंजन सृष्टी हादरली आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. सलमान खानच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर  आलं असून  घराबाहेरील गोळीबारात सलमान खानच्या घरात गोळी घुसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक टीम, पोलीस, मुंबई गुन्हा शाखेकडून तपास सुरु आहे. पोलीस यंत्रणा अलर्टवर आहेत.

  सलमान खानच्या घरात घुसली गोळी

  रविवारी पहाडे पाच वाजता ही गोळीबाराची घटना घटल्याचं  सांगण्यात येत आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्ति दुचाकीवरुन आले आणि त्यांनी घराच्या दिशेनं गोळीबार  करत पळ काढला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत.

  या गोळीबारादरम्यान, सलमान खानच्या घरात एक गोळी घुसल्याचं देखली सीसीटिव्हीमधून समोर आलं आहे.  गॅलरीत असलेल्या पडद्यातून एक गोळी आरपार झाली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्याचं आता तपासात समोर आलं आहे. एक गोळी पडद्यातून आरपार गेली आणि एक गोळी भिंतीवर लागली, तर तीन पुंगळ्या रस्त्यावर सापडल्या आहेत.

  एटीएस करणार तपास

  सलमान खान गोळीबार प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे देण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता आहे. सलमान खान कुटुंबियांना मागील काही काळात बिश्नोई गँगकडून धमक्या येत होत्या. पत्र आणि ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आता झालेल्या गोळीबाराचं संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडला जात आहे.