‘पण त्यांना बुलडोझरचा आवाज ऐकू आला नाही’…गौतम गंभीर यांच्या ट्वीटवर  स्वरा भास्करची प्रतिक्रीया

स्वरा भास्करसोबतच फरहान अख्तर, कंगना रनौत, नसीरुद्दीन शाह यांनी नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले होते. 

    बिनधास्तपणे आपली मतं माडण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. यावेळी ती पुन्हा चर्चेत आली आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैंगरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर गौतम गंभीरने प्रतिक्रीया दिली होती. आता या स्वरा भास्करनं प्रतिक्रिया दिली आहे.

    गौतम गंभीर यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘माफी मागितली असतानाही एका महिलेला देशात जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. यावर कथित सेक्युलरवादी शांत बसले आहेत.’ या ट्वीटवर रिप्लाय देत इन्स्टाग्रामवर स्वरानं एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये स्वरानं लिहिलं, ‘पण त्यांना बुलडोझरचा आवाज ऐकू आला नाही.’ स्वराच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

    नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर भारतात निदर्शनं झाली. एवढंच नाही तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. काही आखाती राष्ट्रांनी या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. नुपूर यांना पाठिंबा देत नुकतंच गौतम गंभीरने हे ट्विट केलं. स्वरा भास्करसोबतच फरहान अख्तर, कंगना रनौत, नसीरुद्दीन शाह यांनी नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्याबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले होते.