Chandni Sharma - Kaamnaa

‘कामना’ (Kaamna)ही नवी मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर(Sony Entertainment Television) सुरू झाली आहे. सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणारी चांदनी शर्मा(Chandni Sharma) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेत ती स्वप्नरंगी रंगणाऱ्या गृहिणीच्या भूमिकेत समोर आली आहे. या निमित्त चांदनीनं ‘नवराष्ट्र’सोबत मारलेल्या गप्पा...

  ‘कामना’बाबत चांदनी म्हणाली की, टायटलप्रमाणेच या मालिकेतील सर्वांच्या कामना या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. पतीची कामना आहे की आमचं कुटुंब सुखी, आनंदी आणि स्वस्थ राहायला हवं. जे आहे त्यात आनंदी राहून हसतखेळत जीवन जगता यावं अशी या कॅरेक्टरची कामना आहे. मी साकारलेल्या कॅरेक्टरची कामना यापेक्षा थोडी वेगळी आहे. मोठं घर, आलिशान गाडी, चांगल्या शाळेत मुलांचं शिक्षण व्हावं, पतीचं प्रमोशन, भरपूर दागदागिने असावेत ही माझी कामना आहे. दोघांच्याही कामना वेगळ्या आहेत. इतक्या भिन्न अपेक्षा असूनही दोघे कशा प्रकारे एकत्र राहात असून, आनंदी आहेत हे या मालिकेत पाहाण्याजोगं आहे. त्यांना कशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे ‘कामना’मध्ये पहायला मिळणार आहे. माझ्या कॅरेक्टचं नाव आकांक्षा आहे. याचा अर्थही ‘कामना’ असाच होतो. आकांक्षा ही एक हाऊसवाईफ आहे. तिला सर्व बाजूंनी आपलं जीवन छान जगायचं आहे. चांगली साडी, घर, दागिने हीच आकांक्षाची अपेक्षा आहे, पण तिच्या पतीचं म्हणणं खूप वेगळं आहे. त्याला वाटतं की आपल्याकडे जितकं आहे त्यात सर्व भागवता आलं पाहिजे. त्यामुळं ही प्रत्येक घरातील कहाणी आहे असं प्रेक्षकांना वाटेल आणि ते ‘कामना’शी स्वत:ला, आपल्या कुटुंबाला रिलेट करतील. काही लोकांच्या आकांक्षा खूप असतात, तर काहींच्या काहीच नसतात. जे असेल त्यात भागवण्याचा प्रयत्न करतात हे दृश्य प्रत्येक घरात पाहायला मिळतं.

  प्रत्येक तरुणीशी रिलेट होणारी
  पूर्वीची गृहिणी आणि आजची हाऊसवाईफ सेमच आहेत. पूर्वीही त्यांच्या डोळ्यांत स्वप्नं तरळायची आणि आजही… पूर्वीच्या काळातील आणि आताच्या युगातील फरक सांगायचा, तर पूर्वी त्यांच्याकडे आपल्या स्वप्नांबाबत बोलण्याची हिंमत नसायची. आजच्या गृहिणींमध्ये बोलण्याची हिंमत आहे. ‘कामना’मध्ये मी साकारत असलेली आकांक्षा आजच्या युगातील असल्यानं हिच्याकडे मनात येईल ते बोलण्याची हिंमत आहे. तिचं लग्न झालेलं असून, एक अपत्यही आहे, पण तिची स्वप्नं मेलेली नाहीत. आजही ती स्वप्नं पहाते. स्वप्नं पाहण्यात काही गैर नाही असं आकांक्षाचं मत आहे. आपलं जीवन खूप चांगलं करणं किंवा एका चांगल्या भविष्यकाळाची अपेक्षा करणं ही चुकीची गोष्ट नाही. ही आजची मुलगी असल्यानं आपलं बोलणं मांडायला ती घाबरत नाही. आपण बोललेलं पतीला पटलं नाहीतर तो आपल्याला सोडून देईल याची तिला भीती नाही. लोकांच्या बोलण्याचीही ती पर्वा करत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तिच्याकडे व्हॅलिड कारण आहे. त्यामुळं प्रत्येक तरुणी रिलेट करेल.

  चांदनीसारखीच आकांक्षा
  आकांक्षा हे कॅरेक्टर काहीसं माझ्याशी मिळतंजुळतं आहे. पूर्वीच्या शोमध्ये मी निगेटीव्ह कॅरेक्टर साकारलं होतं. यातील कॅरेक्टर अत्यंत सकारात्मक आहे. हा दोन्ही कॅरेक्टर्समधला मुख्य फरक प्रकर्षानं जाणवेल. ती खूपच मॅाडर्न होती, तर ही खूपच सिंपल आहे. आकांक्षा साडी परिधान करते. गळ्यात मंगळसूत्र आहे. यापूर्वीच्या कॅरेक्टरमध्ये माझा खूपच वेस्टर्न लुक होता. यातील लुक भारतीय आहे. इतर गोष्टींबद्दल बोलायचं तर आकांक्षासारखं कॅरेक्टर घराघरांत सापडणारं आहे. रिअल लाईफबाबत बोलायचं तर आम्हा दोघींमध्ये बऱ्याच गोष्टींचं साम्य आहे. माझीही बरीच स्वप्न आहेत. रिअल लाईफमध्ये मी खूप महत्त्वाकांक्षी आहे. आकांक्षासारखी मीसुद्धा आपलं म्हणणं मांडताना कोणालाही घाबरत नाही. आकांक्षाही माझ्यासारखीच असल्यानं दोघींमध्ये खूप साम्य आहे.

  हे होतं मोठं आव्हान
  नकारात्मक न राहाणं हे आकांक्षा साकारताना माझ्यासमोर सर्वात मोठं चॅलेंज होतं. माझं म्हणणं मांडतानाही ते कुठेही नकारात्मकतेकडं झुकता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. पतीला जर मला सांगायचंय की, मोठी गाडी असायलाच हवी, तर ते निगेटीव्ह वाटता कामा नये. कारण ही निगेटीव्ह नाही. हिला सर्व गोष्टी इनोसन्सनं कराव्या लागत आहेत. कारण हि खूप भोळी आहे. हिचं मन साफ आहे. स्वप्नं असली म्हणून काय झालं? एखाद्या चांगल्या माणसाचीही स्वप्नं असूच शकतात. स्वप्नांमुळं कोणतीही व्यक्ती वाईट होत नाही. अभिनय करताना मला ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. हे एक लव्हेबल कॅरेक्टर आहे. स्त्री चांगली आहे, पण स्वप्नं मोठी आहेत.

  उत्तम सहकलाकार आणि दिग्दर्शक
  अभिषेक रावत माझ्या पतीची व्यक्तिरेखा साकारत असून, ते खूप अनुभवी आहेत. त्यामुळं त्यांच्यासोबत काम करताना काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत आहे. अनुभवी असूनही त्यांना जराही गर्व नाही. मनानं खूप साफ असल्यानं काम करताना मजा येतेय. त्यांचा स्वभाव गंमतीशीर असून, मीसुद्धा तशीच असल्यानं आमची चांगली गट्टी जमली आहे. पूर्ण दिवस आम्ही मस्तीही करतो आणि कामही… त्यामुळं कामाचं टेन्शन येत नाही. मौज मस्ती करतानाच कामही होत आहे. दिग्दर्शक खूप चांगले आहेत. एक गोड व्यक्तिमत्त्व आहेत. ते सेटवर खूप शांत असतात. कोणावरही ओरडत नाहीत. त्यामुळं एक फायदा होतो की, कोणताही प्रश्न विचारायचा असेल तरी विचारायला भीती वाटत नाही. त्यांना आवडणार नाही आणि ते ओरडतील असं कधीही वाटत नाही. प्रत्येक गोष्ट ते आपुलकीनं समजावून सांगतात. त्यामुळं बिनादिक्कत कोणतीही गोष्ट आत्मविश्वासानं त्यांना विचारायला कोणीही घाबरत नाही. त्यांच्या अशा स्वभावामुळं काम अगदी शांतेत आणि शिस्तीतही होत आहे.

  याला जीवन ऐसे नाव
  या मालिका कोणताही धडा देण्यासाठी बनवण्यात आलेली नाही. उपदेशाचे कोणतेही डोस या मालिकेच्या माध्यमातून पाजण्यात येणार नाहीत. आम्ही एक स्टोरी घेऊन आलो आहोत, जी खूप रिअल असून, प्रत्येकाच्या घरात घडणारी आहे. विश्वास न बसावा असं यात काहीही नाही. प्रत्येक घरात असंच घडतंय असं प्रेक्षकांना वाटेल. प्रत्येक घरातील ही कथा आहे. कोणी बोलू शकतं, तर कोणी नाही, पण सर्वांचीही आकांक्षा असते. घरात प्रत्येकाची एक वेगळी आशा असते. हेच जीवन असल्यानं यातील कॅरेक्टर्स रिलेटेबल आहे.

  ते अभिमानास्पद क्षण असतात
  ब्युटी पेजेंटसमध्ये सहभागी झालं की अभिनयामध्ये येणं सोपं होतं हा माझा भ्रम तुटला आहे. असं काहीही नाही. दोन्ही खूपच भिन्न आहेत. सौंदर्यस्पर्धांचं जग खूप वेगळं असून, त्याच्या आणि अभिनयाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत.अभिनयामध्ये तुमच्यातील कला दिसते. ती अभिनयाद्वारे सादर करता येतं. ब्युटी पेजेंटस हे ब्युटीशी संबंधीत आहे. यासाठी फिट आणि प्रेझेंटेबल रहावं लागतं. तुमचा ऑरा स्ट्राँग असणं गरजेचं असतं. पर्सनॅलिटी छान असावी लागते. ठराविक मेजरमेंटपेक्षा जास्तच उंची असावी लागते. असं असलं तरी दोन्हींची तुलना होऊ शकत नाही. दोघांची आपली एक वेगळी मजा आहे. अभिनय चांगला आणि ब्युटी पेजेंटसमध्ये मजा नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. जेव्हा तुम्ही जागतिक पातळीवर आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करता जसं की मी जर्मनी, मलेशियामध्ये केलं आहे तेव्हा वेगळीच फिलींग असते. मलेशियामध्ये मी विजयी झाले होते. तो एक वेगळाच अनुभव असतो. भारताचा सॅश परिधान करून एकाच छताखाली ७४ देशांसोबत प्रतिस्पर्धा केली तो अनुभव मला अभिनयात मिळू शकत नाही. तुम्हाला तुमच्या नावानं, देशाच्या नावानं पुकारलं जाणं खूपच अभिमानास्पद क्षण होते. यासाठी स्वत:ला नशीबवान मानते.

  भविष्यातील स्वप्नं
  छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर आता मोठ्या पडद्याचे वेध लागले आहेत. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याची माझी इच्छा आहे. चित्रपटांसोबत वेब सिरीजही करायच्या आहेत. एका मागोमाग एक दरवाजे उघडत आहेत. जीवनात ग्रोथ सुरू आहेत. देवाची कृपा असल्यानं यानंतर माझी जर्नी कुठे घेऊन जाईल ते पहायचं आहे. सध्या तरी ‘कामना’ मालिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. प्रेक्षकांना ही मालिका आणि यातील माझी व्यक्तिरेखा नक्कीच आवडेल ही अपेक्षा आहे.