Chinar Mahesh

लग्नाच्या हंगामाचा आनंद द्विगुणीत करणारं ‘मनाचं पाखरू...’ हे ‘डार्लिंग’(Darling) चित्रपटातील गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. सेव्हन हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत तयार झालेला ‘डार्लिंग’ १० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Chinar Mahesh Interview)यातील गाण्यांना चिनार-महेश(Chinar Mahesh Music To Darling) या आघाडीच्या संगीतकार जोडीनं संगीताची किनार चढवली आहे. या चित्रपटाचं औचित्य साधत चिनार-महेशनं दीड वर्षांच्या कालावधीनंतर पहिली मुलाखत देत ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधला.

  ‘डार्लिंग’ला संगीतसाज चढवण्याबाबत चिनार-महेश म्हणाले की, लग्नाला अनुसरून जेव्हा गाणं बनवायचं असतं, तेव्हा त्यात प्रचंड आनंद आणि आई-वडीलांना सोडून जाण्याची दु:खही सादर करायचं असतं. लग्न किंवा हळदीचं गाणं करताना एक मुलगी आपलं माहेर सोडून कायमची सासरी निघून जाणार असल्याच्या इमोशन्स असतात. मुलगी आई-वडीलांपासून दूर जाणार या भावना असतात. त्या इमोशन्सखेरीज लग्न पूर्ण होत नाही. ‘डार्लिंग’साठी हळदीचं गाणं बनवण्याचं काम जेव्हा समीर आशा पाटीलकडून आलं, तेव्हा आमच्यासमोर एक वेगळं चॅलेंज होतं. अशा प्रकारचं गाणं आम्ही ‘टाइमपास २’मध्येही केलं आहे. त्या गाण्यातील परिस्थितीसुद्धा अशीच काहीशी होती. त्यामुळं पुन्हा एकदा आपणच बनवलेल्या गाण्यासारखं, पण वेगळं वाटावं असं गाणं बनवण्याचं आव्हान संगीतकार म्हणून आमच्यासमोर होतं. या गाण्यात ऱ्हिदमीक बदल केले आहेत. गाण्याचा पूर्ण बाज वेगळा आहे.

  हळदीच्या गाण्यातील पहिल्या अंतऱ्यामध्ये वेगळ्या भावना असून, दुसऱ्या अंतऱ्यामध्ये भिन्न इमोशन्स आहेत. पहिल्या अंतऱ्यात आई-वडीलांपासून दूर जाण्याचं दु:ख आहे, तर दुसऱ्या अंतऱ्यामध्ये माझं नवं जग सुरू होतंय ही भावना आहे. मंदार चोळकरनं अप्रतिम शब्द लिहिले आहेत. संगीतकार म्हणून आम्ही चाल बांधतो, पण त्यासाठी जेव्हा उत्तम शब्दरचना केली जाते, तेव्हा गाणं यशस्वी होतं. सिंगर शुभांगी केदार या गाण्याची युएसपी आहे. शुभांगी युट्यूबर असून, इस्टाग्रामवर फेमस आहे. तिच्या गाण्यांना मिलियन्स व्ह्यूज आहेत, पण यापूर्वी तिनं कधीच चित्रपटात गायन केलं नाही. नवीन तिच्या आवाजामुळं गाणं खूप युनिक वाटतंय. शुभांगीचे सिंगल्स आलेले आहेत, पण चित्रपटासाठी तिनं गायन केलं नव्हतं. सुरेल आवाजाची गायिका असूनही तिला कोणीही अप्रोच केलं गेलं नसल्याचंच आश्चर्य वाटलं. शब्द, चाल आणि आवाज हेच या गाण्याचे युएसपी आहेत.

  ऑनलाईन सनई रेकॅार्डींग
  लग्नसोहळा असेल तर सनईवादन हवंच. सनई वादनाशिवाय लग्न सोहळा पूर्ण होत नाही अशी मराठमोळी परंपरा आहे. ‘मनाचं पाखरू…’ गाण्यातील सनई लॅाकडाऊनच्या काळात रेकॅार्ड केली. ओमकार धुमाळनं सनई वाजवली आहे. लॅाकडाऊनमुळं तो रेकॅार्डिंग स्टुडिओत येऊ शकत नव्हता. संपूर्ण सनई फोन आणि व्हिडिओ काॅलवर रेकॅार्ड केली. व्हिडिओ कॉलवरून इथून त्याच्याशी बोलायचो किंवा फोनवरून ट्युन समजवायचो. मग व्हॅाटस अपवरून ओमकार बरेच पार्टस पाठवायचा. अशा प्रकारे जवळपास पाच-सहा तास सनईचं रेकॅार्डींग झालं. ओमकारनं ट्युन्स पाठवल्यावर आम्ही त्यात बदल सुचवायचो. तो त्याच्या घरी आणि आमच्या घरी होतो. अशा प्रकारे या गाण्यातील संपूर्ण सनई ऑनलाईन रेकॅार्ड आणि फायनल झाली.

  गाण्याला जन्म देताना…
  दिग्दर्शकाकडून सिच्युएशन्स सांगितल्यानंतर गाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या डिटेल्स घेतो. यातील पहिलं गाणं मस्तीच्या मूडमधील आहे. ‘डार्लिंग’ हे टायटलच इतकं कॅची आहे की त्यासाठी कोणताही वेगळा शब्द लिहिण्याची गरज नाही असा विचार केला. त्यामुळं डार्लिंग या शब्दाला धरूनच पहिलं गाणं केलं. चित्रपटात जशी सिच्युएशन असेल त्याप्रमाणं डिटेलिंग घेतो. कुठल्याही गाण्यावर काम करताना ते चित्रपटात कुठे येतंय, त्याची पार्श्वभूमी काय आहे, पुढे काय घडणार आहे त्यावर त्या गाण्याचा इंट्रो कसा असेल, लहेजा काय असेल, शेवट कसा असेल या गोष्टी ठरवल्या जातात.

  रेट्रो साँगचा गुलाबी रंग
  प्रेमकथेमध्ये रोमँटिक साँग असणार या नवल नाही, पण ते कसं वेगळं करता येऊ शकतं याचा विचार केला. रोमॅटिक गाण्याला रेट्रो फिल दिला. ‘ये है प्यार…’ हे गाणं मी (चिनार) आणि सोनाली पटेल यांनी गायलं आहे. पहिलं गाणं उडत्या चालीवर झाल्यावर दुसरं गाणं रेट्रो केलं. गाणं गाताना गायक म्हणून माझ्यासमोर गोविंदा आणि निलम यांच्या ‘हम से मीना से ना साथी से…’ या गाण्याचा रेफ्रन्स होता. आम्ही फिल्ममध्ये तो जॅानर आणण्याच्या उद्देशानं रेट्रो साँग केलं. हे गाणं जुन्या गाण्यासारखं वाटावं यासाठी मी माईकवर गाण्यापूर्वी अगोदर त्या गाण्याच्या ओळी गुणगुणायचो आणि त्याच फिलमध्ये रेट्रो साँग गायचो. मंगेश कांगणेनं लिहिलेलं हे गाणं मराठीतच लिहिलं आहे.

  आयसीयू व स्टुडिओत लिहिलेलं गाणं
  रविंद्र खोमणेनं गायलेलं टायटल साँग समीर सावंतनं लिहिलं आहे. फार उत्तम चाललं होतं. आमच्या सिटींग्ज झाल्या, पण अचानक समीर नॅाट रिचेबल झाला. त्याचा फोन नव्हता, मेसेजेसला रिप्लाय नव्हता. माहिती काढल्यावर समजलं की तो आयसीयूमध्ये होता. त्यावेळी ऑलरेडी कोल्हापूरला शूटिंगच्या डेट्स आणि इतर सर्व गोष्टी ठरल्या होत्या. त्यात बदल करता येण्यासारखे नव्हतं. एखाद्या गाण्याचं म्युझिक करताना आपण इतके त्यात खोलवर शिरलेलो असतो की बऱ्याचदा आपणच त्याचे काही डमी शब्द लिहितो आणि गीतकाराला त्या मीटरमध्ये लिहायला सांगतो. त्यामुळं मला (महेश) काही शब्द सुचले होते. ते मी समीरला पाठवले. ते सर्वांनाच आवडल्यानं चित्रपटात घेतलं. याचे काही शब्द स्टुडिओत, तर काही आयसीयूत लिहिले गेले.

  त्या डार्लिंगला धक्का लावायचा नव्हता
  आम्हा दोघांनाही असं वाटतं की ज्या कल्ट गोष्टी आहेत त्यांना हात लावता कामा नये. त्यातून इन्स्पायर होऊन आपण काहीतरी नवीन करायला हवं. इतक्या वर्षांमध्ये डार्लिंगवर केवळ ‘डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस…’ हे एकच गाणं यावं. दुसरं काहीतरी यायला हवं ना. आपल्या काळातील काहीतरी यायला हवं असं वाटत असल्यानं ‘डार्लिंग’ या टायटलवरच गाणं करायचं. त्यामुळं इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा त्याच शब्दावर आधारीत गाणं बनवण्याचं आव्हान होतं.

  संगीताचा कान असलेला दिग्दर्शक
  समीरसोबत ‘यंटम’ चित्रपट केला होता. त्याची गाणीही सुंदर झाली होती. ‘यंटम’ करण्यापूर्वीपासून समीरला आमच्यासोबत काम करायचं होतं. ‘यंटम’ची गाणी त्याला आवडल्यानं पुढचा चित्रपट तो आमच्यासोबतच करणार होता. समीरसोबत छान ट्युनिंग जुळलं आहे. त्याला संगीतातील बऱ्याच गोष्टी समजतात व व्हिज्युअलाझेशन खूप छान असतं. आमच्यासाठी संगीत देताना मेलडीसोबतच शब्दही महत्त्वाचे असतात. गीतकाराकडून आम्ही खूप ड्राफ्टस घेतो. गीतकार थकतात. आमच्याकडून कुठेही कमी पडता कामा नये हा प्रयत्न असतो. मेलडीसोबत साऊंड महत्त्वाचा असतो. युथला काय आवडतंय व ट्रेंडचा अभ्यास करतो. ऱ्हिदम, व्हॅाईस, अरेंजमेंटस यामध्ये वेगळेपण देण्याचा प्रयत्न करतो.

  रिॲलिटी शो करायचाय
  रिॲलिटी शोमध्ये परीक्षक बनण्यासाठी बोलावणं आलं होतं, पण त्यावेळी आम्ही दोन-तीन चित्रपटांमध्ये बिझी होतो. आमच्या डेट्स मॅच होत नव्हत्या. एखाद्या शोमध्ये परीक्षक म्हणून जाताना दोन-दिवस पूर्ण द्यावे लागतात. ते त्यावेळी देऊ शकत नव्हतो. आता मात्र नक्कीच एखाद्या रिॲलिटी शोमध्ये जाण्याची इच्छा आहे. कारण महाराष्ट्रात आज कमालीचं टॅलेंट आहे. आम्ही प्रत्येक चित्रपटामध्ये नवनवीन सिंगर्स आणि अरेंजर्सना ट्राय करतो. आम्ही सुरुवात करताना आम्हाला काही लोकांनी चान्स दिला होता. त्यामुळं आपणही इतरांना चान्स द्यायला हवा ही भावना असते. तिथे आम्हालाही बरंच शिकता येईल.