“छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…”; मुलाच्या जहांगीर नावावरुन होणाऱ्या ट्रोलींगमुळे चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

चिन्मयनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "छत्रपती शिवरायांची क्षमा मागून, या भूमिकेची रजा घेतो"

  अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या चर्चेत आहे. एका मुलाखती दरम्यान त्याने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर (Jahangir) असल्याचं सांगितल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. यावरुन आता चिन्मयनं ट्रोलींग करणाऱ्यांना चांगलचं सुनावलं आहे यासोबतच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं या पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही, असं म्हण्टलं आहे.

  काय म्हणाला चिन्मय?

  चिन्मय व्हिडीओमध्ये म्हणाला, “नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ माझ्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीनं व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे.”

  “मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर सोशल मीडियावरुन होत असेल तर त्याच्याशी मी बांधील नाही. माझ्या कामावरुन मला वाटेल ते बोलू शकता, तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? यावर मी आधाीही बऱ्याच मुलाखतींमध्ये बोललो आहोत. माझ्या पत्नीनेही काल व्हिडीओमध्ये याबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे हे मी ते बोलून वेळ वाया घालवत नाही.मी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारतो. आतापर्यंत सहा सिनेमांमध्ये मी ही भूमिका केली आहे, तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का आहे? हा ट्रोलर्सचा प्रमुख सूर आहे.”, असंही चिन्मय म्हणाला.

  इथून पुढे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही

  पुढे बोलताना चिन्मय म्हणाला की, “माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झाला आज तो 11 वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं ते आता होतंय. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राच्या बाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचंही प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की, इथून पुढे मी ही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी केलेली भूमिका, या गोष्टींचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं खूप महत्वाचं आहे. मला याचं खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तेच मी भूमिकेतून मांडलं. माझ्या गाडीमध्ये देखील जिथे लोक गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे. हा दिखावा नाहीये प्रेम आहे आणि श्रद्धा आहे. मी या गोष्टीचं स्पष्टीकर देणार नाही”