
चित्र भारती चित्रपट महोत्सव-२०२२ (सीबीएफएफ-२०२२) (Chitra Bharati Film Festival)च्या उद्घाटन समारंभाला हिंदी सिनेअभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
भोपाळ : भारतीय चित्र साधनाच्या (Bharatiya Chitra Sadhana) प्रतिष्ठित चित्र भारती चित्रपट महोत्सव-२०२२ (सीबीएफएफ-२०२२) (Chitra Bharati Film Festival)च्या उद्घाटन समारंभाला हिंदी सिनेअभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. ‘चित्र भारती चित्रपट महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष असून २५ ते २६ मार्च या कालावधीत हा महोत्सव संपन्न होणार आहे.
बिशनखेडी येथील माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता व संचार विश्वविद्यालयाच्या नवीन परिसरामध्ये २५ मार्च रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते तीन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. २५ ते २७ मार्च या कालावधीत होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात देशभरातील नामवंत चित्रपट निर्माते आणि अभिनेते सहभागी होणार असून, यावेळी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना ते स्वानुभव सांगणार आहेत.
या चित्रपट महोत्सवाचा समारोप व पुरस्कार वितरण समारंभ २७ मार्च रोजी रवींद्र भवनच्या नवीन सभागृहात होणार आहे. समारोप समारंभाला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रख्यात अभिनेते आणि पं. लखमीचंद राजकीय प्रदर्शन आणि दृश्यकला विद्यापीठ, हरियाणाचे कुलगुरू गजेंद्र चौहान यांच्यासह अभिनव कश्यप, विवेक रंजन अग्निहोत्री विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चित्र भारती चित्रपट महोत्सवाच्या तीनही दिवशी मास्टर क्लास देखील आयोजित केला जाईल, ज्यामध्ये देशातील नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकार चित्रपट सृष्टीशी संबंधित नवोदितांना त्यांचे अनुभव सांगतील.
भारतीय चित्र साधना ही चित्रपट क्षेत्रातील भारतीय विचारांसाठी काम करणारी एक समर्पित संस्था आहे. भारतीय चित्र साधनाच्यावतीने भारतीय मूल्ये वाढवणाऱ्या सिनेमांना प्रोत्साहित करण्यात येते. ही संस्था राष्ट्रीय स्तरावर दर दोन वर्षांनी ‘चित्र भारती राष्ट्रीय लघुपट महोत्सव’ आयोजित करते. याशिवाय वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम आणि स्थानिक स्तरावरील चित्रपट समीक्षा, चित्रपट प्रदर्शन, चर्चा, प्रशिक्षण आणि लघुपट महोत्सव संस्थेद्वारे आयोजित केले जातात.