Chirag sandip Patil

कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली १९८३मध्ये (83 World Cup) भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्डकपसोबतच तमाम भारतीयांच्या मनावर कोरलेल्या सुवर्णक्षणांना झळाळी देणारा ‘८३’ हा चित्रपट(83 Movie) २५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी उचललेलं हे शिवधनुष्य पाहण्यासाठी केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुरले आहेत. १९८३च्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठमोळे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील ( Cricketer Sandip Patil) यांची भूमिका त्यांचा चिरंजीव चिराग पाटीलनं(Chirag Patil Interview) साकारली आहे. या चित्रपटाचं औचित्य साधत चिरागनं ‘नवराष्ट्र’शी केलेली ही एक्सक्लुझीव्ह बातचित.

    १९८३चा वर्ल्डकप आणि ‘८३’ विषयी विचारलं असता चिराग म्हणाला की, माझा जन्म १९८७मध्ये झाल्यानं १९८३मध्ये भारतील क्रिकेट संघानं विश्वचषकावर नाव कोरल्याचा क्षण मी पाहू शकलो नव्हतो. माझा जन्म झाल्यावर बाबा १९८८ मध्ये निवृत्त झाले, पण लहानपणापासून त्यांना बघतोय, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासोबत बोलताना बघतोय. सगळेजण नेहमी वर्ल्डकपबाबत, त्यांच्या इनिंग्जबाबत बोलतात. ते सर्व जवळून बघितलंय आणि अनुभवलंय. आजही लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण बाबांना ओळखतात. त्यांच्या इनिंग्ज आजही स्मरणात आहेत. खरं तर ते माझे बाबा असल्यानं संदीप पाटील हे किती मोठं नाव आहे याबाबत मला फार सिरियसनेस नव्हता, पण जेव्हा आम्ही चित्रपटावर काम सुरू केलं, स्क्रीप्ट वाचली, कोणत्या परिस्थितीमध्ये त्या टिमनं वर्ल्डकप जिंकून आणला, त्यासाठी किती मेहनत घेतली आणि त्यावेळी सिच्युएशन काय होती हे सर्व वाचल्यावर मला सिरियसली बाबा व त्यांच्या टिमनं घेतलेली मेहनत समजली. कारण १९८३ वर्ल्डकप हा भारतीय क्रिकेटमधीलच नव्हे तर देशाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे.

    चिराग पुढे म्हणाला, वर्ल्डकप जिंकल्यावर प्रत्येक भारतीयाला नवी उर्जा मिळाली. आपणही जागतिक पातळीवर काहीतरी करू शकतो याची प्रेरणा मिळाली. १९८३चा वर्ल्डकप केवळ त्या टिमनं जिंकलेला नव्हता, तर अख्ख्या देशानं जिंकला होता. संपूर्ण देशात याचा आनंद साजरा करण्यात आला. आज आपण जे क्रिकेट पाहतोय, आज ज्या प्लेअर्सना फॅसिलिटीज मिळताहेत, कोचेस, फिझिओज, मानधन मिळतंय ते १९८३च्या टिममुळं मिळतंय. कारण त्यांनी क्रिकेट हा खेळ त्या उंचीवर नेऊन ठेवला. त्यानंतर खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये पैसे मिळू लागले. स्पॅान्सर्स आले. हे सर्व आम्ही शूट करताना अनुभवलं.

    फ्रॅक्चरसह ते खेळले
    बाबांकडे क्रिकेटचे खूप किस्से आहेत. १९८३च्या विजयाच्या तर असंख्य आठवणींचा ठेवा त्यांच्याकडे आहेत. एक महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे १९८३च्या वर्ल्डकपमध्ये बाबांना रिप फ्रॅक्चर झाला होता. पूर्ण वर्ल्डकप ते रिप फ्रॅक्चरसोबत खेळले. आज जर एखाद्या प्लेअरला रिप फ्रॅक्चर असेल, तर तो सहा महिने रिहॅबमध्ये जाईल. या खूप महत्त्वाच्या गोष्टी तेव्हाचं क्रिकेट आणि आजच्या क्रिकेटमध्ये बदलल्या आहेत. या सर्व गोष्टी ऐकल्यावर, शूट केल्यावर, त्याबाबत माहिती मिळाल्यावर एक वेगळंच गांभीर्य निर्माण होतं. ते गांभीर्य आणि ती नजर मला ‘८३’’या सिनेमामुळं मिळाली असं म्हणता येईल.

    …आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं
    माझे आजी-आजोबा दोघेही क्रिकेटर आहेत. दोघेही स्टेट लेव्हल चॅम्पियन्स होते. बाबा भारतासाठी खेळल्यानं सर्व सांगत असल्यानं मी देखील क्रिकेट खेळावं असं वाटत होतं. मी देखील क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. मला आजही आठवतंय की सहावीत असताना मी पहिल्या दिवशी प्रॅक्टीसला निघालो होतो. बाबांनी मला बॅट पकडताना बघितलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, तू आयुष्यात कधीच भारतासाठी खेळू शकणार नाहीस. त्यामुळं वेळ फुकट घालवू नकोस किंवा क्रिकेट हे करियर निवडू नकोस. आयुष्यात दुसरं काहीतरी कर. कदाचित मला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट कमी असल्याचं त्यांना जाणवलं. मलाही लहानपणापासून कधीच क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नव्हता. आज भारतीय क्रिकेट संघातील दोन-तीन खेळाडू वगळले तर इतर कोणाचीही नावं मला माहित नाहीत. यात चुकीचं काही नाही. प्रत्येकामध्ये आपलं एक पॅशन असतं.

    घोषणेलाही गेलो होतो पण…
    ‘८३’ फिल्मची घोषणा होणार होती. त्या कार्यक्रमाला बाबांनाही बोलावलं होतं. मीदेखील बाबांबरोबर पत्नीला घेऊन गेलो होतो. तिथं मी रणवीर सिंग, दिग्दर्शक कबीर खानसरांनाही भेटलो. त्यांच्यासोबत बसून जेवलोही, पण मी कधीच त्यांना सांगितलं नाही की मला बाबांचा रोल करायला आवडेल किंवा त्या दिवशी त्यांनीही कधीच मला बाबांचा रोल करण्याबाबत विचारलं नाही. कारण मला वाटायचं की, मला क्रिकेटच खेळता येत नाही, तर मला हे का घेणार… मला घेणं शक्यच नाही; परंतु बलविंदरसिंग संधू हे १९८३च्या क्रिकेट संघातही होते आणि त्यांनी आम्हाला या चित्रपटासाठी कोचिंगही दिलं. संधू एक दिवस घरी बसले असताना झी टॅाकिजवर माझा ‘वजनदार’ चित्रपट सुरू होता. चॅनल बदलताना त्यांनी नेमका माझा सीन पाहिला. तो पाहिल्यावर त्यांनी कबी रसरांना फोन करून सांगितलं की, संदीपचा मुलगा मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये ॲक्टींगही करतो. त्यालाही आपण ऑडीशनला बोलवूया. कबीर सर बोलले ठीक आहे.

    अशी झाली निवड
    ऑडीशनला जाण्यापूर्वी कबीर सरांनी माझा चित्रपट पाहिला होता. त्यामुळं मला स्क्रीप्ट वगैरे दिलीच नाही. थेट क्रिकेट खेळायला सांगितलं. क्रिकेट खेळायला सांगितल्यानं मी थोडा गोंधळलो. कारण मी थेट १०-१२ वर्षांनी बॅट पकडली होती. पहिल्याच बॅालवर आऊट झालो. तिथेच मी विचार केला की मला काही या चित्रपटात घेणार नाहीत. बाबांनी विचारलं कसं झालं ऑडीशन… मी घडलेला प्रकार सांगितला. या चित्रपटात ते मला घेतील असं वाटत नाही. त्यांनी ॲक्टींग सोडून क्रिकेट खेळायला सांगितलं. मी पहिल्याच बॅालला आऊट झालो. बाबा म्हणाले की, ठिक आहे. तू प्रयत्न तर केलास ना… दोन महिने काहीच रिप्लाय आला नाही. जानेवारी २०१८मध्ये मी ऑडीशन दिली होती आणि एप्रिलमध्ये कबीरसरांचा कॅाल आला. त्यांनी भेटायला बोलवलं आणि बाबांच्या रोलसाठी मीच हवा असल्याचं सांगितलं. मला कोणत्या निकषांवर निवडल्याचं विचारल्यावर त्यांनी माझं ऑडीशन आणि बाबांचे शॅाटस एडीट करून बाजूबाजूला कॅाम्प्युटरवर दाखवले. ते पाहून मी देखील चकीत झालो. आम्हा दोघांचीही शॅाटस मारण्याची, उभं राहण्याची, चालण्याची स्टाईल सेम होती. ते म्हणाले की, तू क्रिकेट खेळायला हवा असं नाही. तुझी स्टाईल सेम आहे, दिसतोसही त्यांच्यासारखा आणि तुझी ॲक्टींगही बघितली आहे. यासाठी मी तुला घेतोय.

    राईट टाईमला राईट गोष्ट
    कबीर सरांनी माझी निवड केल्यानंतर तुला क्रिकेट खेळायलाच लागेल हे सांगितलं. त्यानंतर आठ-नऊ महिने मी दररोज सकाळी दोन तास प्रॅक्टीस करायचो, संध्याकाळी चंद्रकांत पंडीत यांच्याकडे निलेश सरांकडे जाऊन धडे घ्यायचो. लॅपटॅापवर बाबांच्या युट्यूबवरील क्लिपींग लावून एकेक आठवडा एकेक शॅाट प्रॅक्टीस करायचो. संपूर्ण आठवडाभर एकच शॅाट. तो परफेक्ट येईपर्यंत दुसरा शॅाट नाही. आठ-नऊ महिने प्रॅक्टीस केल्यावर थोडंफार खेळायला जमतंच. लाईफमध्ये टायमिंग फार महत्त्वाचं असल्याचं मी मानतो. हा चित्रपट जर १०-१५ वर्षांपूर्वी बनला असता तर त्या रोलसाठी मी फार लहान असतो. १० वर्षांनंतर बनला असता तर मी फार मोठा दिसलो असतो. त्यामुळं राईट टाईमला राईट गोष्ट माझ्या वाट्याला आलीय.

    मी संदीप पाटील बनलो
    आयुष्यभर मी संदीप पाटील यांचा मुलगा हिच माझी ओळख होती. साहजिक आहे की, जेव्हा वडीलांचं नाव इतकं मोठं असतं, तेव्हा मुलाला त्यांच्याच नावानं ओळखलं जातं. जरी तो त्याच्या फिल्डमध्ये कितीही मोठा झाला तरीही. आज अभिषेक बच्चन कितीही मोठा ॲक्टर असला तरीही त्याला अमिताभ बच्चन यांचा मुलगाच म्हटलं जातं. आपलंही नाव व्हावं असं वाटत असतं आणि आपल्यालाही स्वत:च्या नावानं ओळखलं जावं हे वाटत असतं. ती माझी धडपड कुठेतरी मागील १० वर्षांपासून सुरू होती. आता योगायोग असा झालाय की, आयुष्यभर मला संदीप पाटील यांचा मुलगा म्हणून ओळखलं गेलं. आता यापुढे मी संदीप पाटील म्हणून ओळखला जाणार आहे. चिराग पाटील कुठे हरवला हे मलाही माहित नाही. मी इतका त्या गोष्टीचा विचार करत नाही. मी पॅाझिटीव्ह विचार करतो.

    वडीलांचा अभिमान
    मी आणि माझा भाऊ प्रतीक पाटील फार लकी आहे. त्याला दिग्दर्शक बनायचंय असून, तो सध्या रितेश देशमुखला असिस्ट करतोय. विधू विनोद चोप्रांसारख्या बऱ्याच दिग्गजांना त्यानं असिस्ट केलं आहे. आजच्या जमान्यात कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना लाँच करायला उत्सुक असतात; परंतु त्या मुलात ते गुण आहेत का किंवा टॅलेंट आहे का हे ओळखायचं कामही आई-वडीलांचंच असतं. उगाचच मुलाला किंवा मुलीला आई-वडीलांच्याच क्षेत्रात ढकलायचं या विचारांचे माझे बाबा नाहीत. फार लहान वयात बाबांनी आम्हा दोन्ही भावांना हे सांगितल्यानं आम्ही खूप लकी आहोत. त्यांनी सांगितल्याचं आम्हाला अजिबात दु:ख नाही. याउलट आमचे वडील आमच्याबरोबर स्पष्ट बोलल्याचा अभिमान आहे. माझ्या पहिल्या फिल्ममधील एका गाण्याची क्लिप मला अगोदर मिळाली होती. मी ती बाबांना दाखवली होती. ती बघितल्यावर ते म्हणाले की, तुझ्यामध्ये हिंदी सिनेमातील सुपरस्टार होण्याचे सर्व गुण आहेत, पण तू होशील की नाही हे मी सांगू शकत नाही. कारण त्यामागं खूप गोष्टी आहेत.