लगन सिनेमाचा टिझर आऊट

ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटात प्रेमाचे नवे रंग, नवे ढंग, प्रामाणिक भाव आणि नवी परिभाषा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

    असंख्य कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येकव्यक्तीला एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे प्रेम जरी सोपं वाटत असलं तरी ते सोपं अजिबात नाही असं काहीसं सांगणारा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तुमाला वाटतंय पण सोपं नायी…’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या चित्रपटाचं नाव ‘लगन’ असं आहे. हा चित्रपट ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    प्रेम म्हणजे एक गुलाबी अनुभूती… आपल्या आवडत्या व्यक्तीच्या विचारांत रमणं…आपल्याच विश्वात हरवून जाणं… तहान-भूक हरपणं… अशी काहीशी प्रेमाची लक्षणं सांगितली जातात. ही प्रेमाची एक बाजू झाली, पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या मुळीच नाहीत. कितीही संकटं आली, कितीही आव्हानं आली, नात्यांची बंधनं आड आली, स्वप्नांचा चुराडा होत असल्याचं जाणवलं तरीही जे टिकतं त्याला खरं प्रेम म्हणता येऊ शकतं. असाच काहीसा विचार मांडणाऱ्या चित्रपटाची निर्मिती जी. बी. एन्टरटेन्मेंटनं ‘लगन’च्या माध्यमातून केली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटात प्रेमाचे नवे रंग, नवे ढंग, प्रामाणिक भाव आणि नवी परिभाषा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ‘लगन’ म्हणजे नेमकं काय आहे त्याचा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता वाढली आहे