‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ ४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

गोप्याच्या एका चुकीने सगळं गावचं गोत्यात येतं.

    मुंबई : प्रत्येक गावाची कुठला  ना कुठली गोष्ट असतेच. मराठवाड्यातील ‘सालई मोकासा’ या एका अविकसित मागास गावातील इरसाल माणसांची इरसाल गोष्ट गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ या धमाल चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार  आहे. येत्या ४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या  भेटीला येतोय. गणपत रावजी म्हैसने,  प्रशांत प्रकाश चंद्रिकापुरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या आवडीतून ही सारी मंडळी एकत्र आली आहेत. झिरा फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरअंतर्गत बनवण्यात आलेल्या ‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक मनोरंजक धमाल कथा पहायला मिळणार आहे.

    ‘सालई मोकासा’ या गावातील गोप्याची ही गोष्ट आहे. आळशी आणि वेंधळा असणारा गोप्या आपल्या कुटुंबासहित राहत असतो. चुकीच्या आणि अर्ध्या माहितीतून गोप्या सगळ्यांनाच अडचणीत आणतो. त्याच्या एका चुकीने सगळं गावचं गोत्यात येतं. ‘प्रत्येकाला १५ लाख मिळणार’ या घोषणेने गावात एकच गोंधळ उडतो. त्यानंतर काय घडतं? हे चित्रपटात बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

    प्रकाश भागवत, प्रिया गमरे, डॉ. विलास उजवणे, संजीवनी जाधव, रंगराव घागरे, चांदणी पाटील, विराग जाखड, त्रिग्य चंद्रिकापुरे आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा प्रशांत चंद्रिकापुरे यांची असून पटकथा व संवाद प्रकाश भागवत यांचे आहेत.  संगीत दिग्दर्शन समीर सोनू तर कलादिग्दर्शन विराग जाखाड यांनी केले आहे. सतीश कोयंडे आणि प्रकाश भागवत यांनी लिहिलेल्या गीतांना अमित मिश्रा, राहुल सक्सेना, वैशाली माडे, संतोष जोंदळे, यश उन्हवने, तन्मयी घाडगे, माधुरी भालेराव या गायकांचा स्वर लाभला आहे.