‘आरोप सिद्ध होण्याआधीच मला दोषी ठरवण्यात आलं’, जामिनावर सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच पॉर्नोग्राफी प्रकरणावर राज कुंद्राने मांडली भूमिका

जामिनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रानं पॉर्न व्हिडीओ प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. राज कुंद्रा यानं यासंदर्भात सविस्तर निवेदन (Raj Kundra Statement On Pornography Case) जारी केलं आहे.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणी (Pornography Case) अटक झाली होती. काही दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र जामिनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रानं या संपूर्ण पॉर्न व्हिडीओ प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे . राज कुंद्रा यानं यासंदर्भात सविस्तर निवेदन (Raj Kundra Statement On Pornography Case) जारी केलं असून त्यामध्ये आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचा दावा देखील त्यानं केला आहे.

    मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला अश्लील चित्रफीत बनवणे आणि त्याचं वितरण करणे या गुन्ह्याखाली अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज कुंद्रानं प्रसार माध्यमांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा दावा या निवेदनात केला आहे. तसेच, आपल्यावरील आरोप देखील फेटाळून लावले आहेत. “प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असून मी अशा प्रकारचे व्हिडीओ बनवण्यात अजिबात सहभागी नव्हतो. हा सगळा प्रकार म्हणजे मला जाणून बुजून टार्गेट करण्याचा होता”, असं राज कुंद्रा म्हणाला आहे.

    “दुर्दैवाने माझ्यावरील आरोप सिद्ध होण्याआधीच माध्यमांकडून आणि माझ्या कुटुंबीयांकडून दोषी म्हणून जाहीर झालो आहे. मला प्रचंड वेदना होत आहेत. अनेक स्तरांवर माझ्या घटनात्मक आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करण्यात आलं आहे”, असं राज कुंद्रा म्हणाला आहे.

    “मला वाटलं या मीडिया ट्रायलमार्फत माझ्या प्रायव्हसीचा भंग केला जाणार नाही. माझ्या कुटुंबाला कायमच माझं प्राधान्य राहिलं आहे. याव्यतिरिक्त काहीही माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मला वाटतं की सन्मानाने जगणं हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे आणि माझीही तीच विनंती आहे. हे निवेदन वाचण्यासाठी वेळ काढलात त्यासाठी धन्यवाद. इथून पुढे माझ्या प्रायव्हसीचा सन्मान ठेवा”, असं देखील त्यानं या निवेदनात म्हटलं आहे.