pawankhind chinmay mandlekar look

पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपात चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar In Chatrapati Shivaji Maharaj Look) झळकला आहे.

    महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लेखक-अभिनेता-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या (Digpal Lanjekar) संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील ‘पावनखिंड’ (Pawankhind) या तिसऱ्या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लूक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपात चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar In Chatrapati Shivaji Maharaj Look) झळकला आहे.

    ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर ‘पावनखिंड’साठी चिन्मयनं पुन्हा एकदा आपल्या मस्तकी शिवरायांचा जिरेटोप चढवला आहे. हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर चिन्मयचं आजवर कधीही न दिसलेलं करारी रूप पाहायला मिळत आहे. शिवराय भासावेत असा पेहराव, भाळी कुमकुम तिलक, उजव्या हातात गनिमांवर तुटून पडणारी तलवार आणि पाठीमागे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करत मुसळधार पावसातही डौलानं फडकणारा भगवा झेंडा असं काहीसं शिवरायांचं चिन्मयरूप ‘पावनखिंड’च्या पोस्टरवर पाहायला मिळतं.

    एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चक्क तिसऱ्यांदा रुपेरी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळण्याबाबत चिन्मय म्हणाला की, पूर्व संचिताशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा वाट्याला येणं शक्य नाही. लागोपाठ तीन चित्रपटांमध्ये महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हे मी माझं भाग्यच मानतो. दिग्पालला माझ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची छबी दिसली आणि त्यानं ते शिवरूप यशस्वीपणे रसिकांसमोरही सादर केलं हे खूप महत्त्वाचं आहे. ‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने स्वराज्य आणि महाराजांच्या रक्षणाकरीता दिलेल्या अमूल्य बलिदानाची सुवर्णगाथा पाहायला मिळणार आहे.