शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये क्रेझ, चित्रपटाच्या फर्स्ट शोसाठी पूर्ण केलं थिएटर बुक!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या फॅन्स क्लबने मुंबईतील सर्वात मोठा सिनेमा गेटी थिएटरच्या फर्स्ट डे फर्स्ट शोची सर्व तिकिटे खरेदी केली आहेत.

  मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाची जबरदस्त क्रेझ आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता तब्बल चार वर्षांनी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ‘पठाण’ हा  (Pathaan Movie) चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली आहे. ही कमाई चित्रपटाच्या आगाऊ तिकीट बुकिंगमधून झाली आहे.

  शाहरुख खानच्या फॅन्स क्लबने सिनेमागृह बूक केलं

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या फॅन्स क्लबने मुंबईतील सर्वात मोठा सिनेमा गेटी थिएटरच्या फर्स्ट डे फर्स्ट शोची सर्व तिकिटे खरेदी केली आहेत. फॅन्स क्लबने सकाळी 9 वाजता शो बुक केला आहे. मुंबईतील सर्वात मोठे थिएटर गेटी थिएटर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासाठी आपला नियम तोडणार आहे. आत्तापर्यंत गेटी थिएटरमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून चित्रपट दाखवले जात असले तरी ‘पठाण’ चित्रपटासाठी गेटी थिएटरने २५ जानेवारीला सकाळी ९ वाजता चित्रपटाचा पहिला शो दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

  गेटी थिएटर स्थापनेपासून पहिल्यांदाच असे करणार आहे. गेट्टी थिएटरची स्थापना 1972 मध्ये झाली. विशेष म्हणजे, शाहरुख खान शेवटचा 2018 साली रिलीज झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. त्याच वेळी, त्याच्या मोठ्या पडद्यावर पुनरागमनाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  पहिल्या दिवशी 35 ते 45 कोटी कमाई करण्याची अपेक्षा

  चार-पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स त्याचा चित्रपट (Pathaan Movie) पाहण्यास कमालीचे उत्सुक आहेत. त्यामुळे आता पठाण चित्रपटाकडून चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहेत. व्यापार विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, ते शाहरुख खानच्या बॉक्स ऑफिसवर पुनरागमनासाठी आशावादी आहेत. याचा फायदा बघता हा चित्रपट  35 कोटी ते 45 कोटी पर्यंत व्यवसाय करण्याची अपेक्षा केली जात आहे.