
'मन उडु उडु झालं' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' या झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या दोन्ही मालिकांच्या टायटल ट्रॅक्सची कोरिओग्राफी अमितनं केलं आहे. आपल्या आजवरच्या प्रवासाबाबत अमित म्हणाला की, मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असलेल्या शिपोशी गावातील आहे, पण लहानाचा मोठा मुंबईतच झालो आहे. बालपणापासूनच डान्सची खूप आवड होती. पुढे हीच आवड प्रोफेशन बनली. यातून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि स्वत:चं करियर घडवता आलं.
चित्रपट आणि नाट्यगीतांसोबतच मालिकांच्या टायटल ट्रॅक्समध्ये आघाडीचे कलाकार मनमोहक डान्सिंग स्टेप्स करताना दिसतात, ज्या पाहून सर्वसामान्यांनाही त्या फॅालो करण्याचा मोह आवरता येत नाही. खरं तर यामागं मेहनत असते ती कोरिओग्राफरची, जो कधीच समोर येत नाही. हिंदीपासून मराठीपर्यंत यशस्वी कारकीर्द केल्यानंतर सध्या झी मराठी वाहिनीवरील मालिकांच्या शीर्षकगीतांमुळं चर्चेत आलेल्या आमित बाईंग या मराठमोळ्या कोरिओग्राफरनं आजवर बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवलं आहे. ‘नवराष्ट्र’शी खास बातचित करताना अमितनं आपला प्रवास आणि होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावाबाबत सांगितलं.
‘मन उडु उडु झालं’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या दोन्ही मालिकांच्या टायटल ट्रॅक्सची कोरिओग्राफी अमितनं केलं आहे. आपल्या आजवरच्या प्रवासाबाबत अमित म्हणाला की, मी मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असलेल्या शिपोशी गावातील आहे, पण लहानाचा मोठा मुंबईतच झालो आहे. बालपणापासूनच डान्सची खूप आवड होती. पुढे हीच आवड प्रोफेशन बनली. यातून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आणि स्वत:चं करियर घडवता आलं.
थोरामोठ्यांच्या ओळखी झाल्या. त्यांच्या सान्निध्यात राहून स्ट्रगल करताना दुनियादारी काय असते ती समजली. जोगेश्वरीमध्ये अरविंद गंडवीर हायस्कूलमध्ये शिकताना तिथल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचो, घरीही डान्स करायचो. इयत्ता सहावीनंतर प्रायव्हेट शोज आणि आॅर्केस्ट्राजमध्ये परफॅार्म करू लागलो. त्यामुळं स्टेज आणि क्राऊडची भीती कधीच वाटली नाही. आॅटोमोबाईल डिप्लोमा करतानाही डान्सचं वेड काही गप्प बसू देत नव्हतं. हिंदीतील कोरिओग्राफर अहमद खान यांच्या ग्रुपमध्ये डान्स करण्याची संधी मिळाली आणि जणू माझ्या स्वप्नांना नवे पंखच लाभले. त्यानंतर फराह खान यांच्यासोबतही काम केलं.
२००८मध्ये लाँजिनीस फर्नांडीस यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करू लागलो. किरण गिरी, संजय शेट्टी यांना असिस्ट केल्यानंतर तिग्मांशू धुलियांच्या ‘साहिब बीबी और गँगस्टर’ या चित्रपटाद्वारे माझा स्वंतंत्र प्रवास सुरू झाला. या चित्रपटात जिमी शेरगिल, माही गिल आणि रणदीप हुड्डा हे कलाकार होते. यातील मुक्ती मोहनवरील आयटम साँग मी कोरिओग्राफ केलं आहे.
मराठीमुळं रुंदावला कोरिओग्राफीचा ‘कॅनव्हास’
दिग्दर्शक समीर गायकवाडच्या ‘कॅनव्हास’ या मराठी चित्रपटासाठी प्रमोशनल साँग करण्याची संधी लाभली आणि माझी मराठी सिनेसृष्टीत कोरिओग्राफर म्हणून एंट्री झाली. त्यानंतर हळूहळू चित्रपट मिळू लागले. मकरंद अनासपुरेंचा ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, अजय फणसेकरांचा ‘चीटर’, लक्ष्मण उतेकरांचा ‘लालबागची राणी’ या मराठी चित्रपटांसाठी काम केलं. हिंदीमध्ये ‘जब तुम कहो’, ‘जाने भी दो यारों’ अशा बऱ्याच चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारच्या ‘उनाड’ या चित्रपटासोबतच ‘पिरेम’, ‘सलमान सोसायटी’, ‘रावस’, ‘मातंगी’ या आगामी चित्रपटांसाठीही गाणी केली आहेत. अभिनेते गजराज राव यांच्यासाठी जवळपास ३५ जाहिराती केल्या आहेत. गुजरात कॅम्पेन केली. आता झी मराठी, कलर्स मराठीसाठी मालिकांची शीर्षक गीतं करतोय. हिंदीमध्ये विशाल-शेखरसोबत काम केलं आहे.
दोन वर्षांमध्ये १४ टायटल्स
मालिका विश्वाकडे वळल्यानंतर मागील दोन वर्षांच्या काळात मी एकूण १४ मालिकांच्या शीर्षकगीतांची कोरिओग्राफी केली आहे. यात ‘बिग बॅास मराठी’च्या दोन्ही सीझन्ससाठी महेश मांजरेकरांसोबत काम केलं आहे. ‘मन उडु उडु झालं’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकांचे टायटल ट्रॅक्स रसिकांना खूप आवडत आहे. ‘अगं बाई सासूबाई’ पासून माझा झी मराठीसोबतचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ‘भागो मोहन प्यारे’, ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’, ‘लग्नाची वाईफ वेडींगची बायको’, ‘डॅा. डॅान’, ‘पाहिले न मी तुला’, ‘डान्सिंग क्वीन’, ‘कारभारी लय भारी’ अशा विविध मालिकांसाठी गाणी केली. एबी एन्टरटेन्टमेंट या बॅनरखाली सध्या चित्रपटांची निर्मितीही करत आहे. चित्रपट दिग्दर्शन हे माझं या पुढचं पाऊल असेल. त्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. सध्या शॅार्टफिल्म्सच्या माध्यमातून निर्मितीचा अनुभव घेत आहे.
रेमोनं मिळवून दिला रिस्पेक्ट
डान्समध्ये करियर करू इच्छिण्यासाठी पॅशन गरजेचं आहे. पैसे तर सर्वच कमावतात, पण पॅशन महत्त्वाचं असतं. इथे मेहनत खूप आहे. शिकण्याचा प्रवास कधीच संपत नाही. कायम प्रयत्न करावे लागतात. मीसुद्धा २२ वर्षांपासून डान्ससाठी काम करतोय. माझ्या जीवनातील एवढा मोठा माळ मी डान्ससाठी दिला आहे. डान्सकडे हॅाबी म्हणून न पाहता करियर म्हणून पाहण्याची गरज आहे. २००८मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ हा रेमो डिसूझाचा शो आला आणि कोरिओग्राफरला एक रिस्पेक्ट मिळू लागला. त्यापूर्वी आम्हाला इतका मान-सन्मान मिळत नव्हता. कोरिओग्राफर्सना स्वत:चं अस्तित्व जाणवू लागलं. गाण्यांना व्हॅल्यूज मिळू लागली. क्रिएटीव्हीटीला रिझल्ट मिळू लागला. त्यामुळं नवीन येणाऱ्यांनी बिनधास्त यावं आणि मेहनत करावी. एकमेकांना मदत करावी.
ट्रेंड चेंजर डान्सिंग गुरु
अहमद खान आणि फराह खान यांच्यासोबत काम करणं हा माझ्या लाईफमधील अमेझिंग एक्सपिरीयन्स आहे. हे खऱ्या अर्थानं क्रिएटर्स आहेत. यांनी कितीतरी नवीन गोष्टी आणल्या. ‘रंगीला’च्या माध्यमातून अहमद खान ट्रेंड चेंजर बनले. त्यांनी डान्सिंगपासून लुकचाही ट्रेंड चेंज केला. याच काळात फराह खान यांनी हाय स्पीड शूट आणि वेगळ्या जॅानरची गाणी देण्याचं काम केलं. माझ्यासाठी दोघेही गुरुस्थानी आहेत. मी त्यांच्याकडून एकलव्याप्रमाणे शिकत आलो आहे. मी यांची गाणी कायम स्टडी करत आलो आहे. त्यांच्या गाण्यांची स्टाईल, ट्रीटमेंट, व्हीजन, स्टोरी व्हॅल्यूचा कसा समावेश केला जातो, या सर्व गोष्टींचा बारकाईनं निरीक्षण केलं आहे.
मराठीत वेगळीच मजा
मराठीमध्ये काम करताना आपुलकीची भावना असते. माझी सुरुवात हिंदीतून झाली आहे, पण मी साऊथमध्ये आणि गुजरातमध्येही काम केलं आहे. कोणत्याही इंडस्ट्रीत मी काम एन्जॅाय करतो. मराठी आपली भाषा असल्यानं इथं काम करताना वेगळीच मजा येते. आज आपले कलाकार सर्व इंडस्ट्रीमध्ये आहेत. रोहित शेट्टींच्या चित्रपटात बरेच कलाकार मराठी असतात. आता मराठीतही अॅडव्हान्स टेक्नीक वापरलं जात आहे. मराठी मालिकांच्या टायटल ट्रॅक्ससाठीही आता बराच खर्च केला जातो. ‘अगंबाई सासूबाई’मध्ये मी ट्रेंड चेंज केला आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये केलेला वेगळा प्रयत्न रसिकांना भावतोय. माणूस म्हणून खूप चांगले असलेल्या श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दोन कलाकारांसोबत या निमित्तानं काम करता आलं. श्रेयससाठीही या गाण्यात परफॅार्म करण्याचा अनुभव खूप वेगळा होता.