हर्षवर्धन राणे रुपेरी पडद्यावर पुन्हा करणार धमाल, कॉलेजमध्ये एहान भट्टशी भिडणार, ‘दंगे’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

हर्षवर्धन राणे आणि एहान भट्ट यांच्या दंगे चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, जो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

    बऱ्याच दिवसानंतर रुपेरी पडद्यावर एक कॅालेज ड्रामा रंगणार आहे. कॅालेज लाईफ, मस्ती, मैत्री असे वेगवेगळे पैलू असलेला ‘दंगे’ हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हर्षवर्धन राणे ( Harshvardhan Rane) आणि एहान भट्ट (Ehan Bhatt) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर  नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता, जो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. आता चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘दंगे’ चा दमदार ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये हर्षवर्धन राणे आणि एहान भट्ट एकमेकांशी भिडताना दिसत आहेत.

    ‘दंगे’ ची स्टारकास्ट

    बेजॉय नांबियार दिग्दर्शित डांगे हा द्विभाषिक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या हिंदी भाषेतील आवृत्तीत हर्षवर्धन राणे आणि एहान भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याच्याशिवाय निकिता दत्ता आणि टीजे भानू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. बेजॉय नांबियार, प्रभू अँटनी, मधु अलेक्झांडर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट टी-सीरीज आणि रुक्स मीडियाच्या माध्यमातून सादर केला जाणार आहे.

    तर, हिंदीसोबत हा चित्रपट तामिळ भाषेतही बनवला जात आहे. तमिळमध्ये त्याचे नाव ‘पीओआर’ आहे, ज्यामध्ये अर्जुन दास, कालिदास जयराम, टीजे बानू आणि संचना नटराजन सारखे स्टार्स दिसणार आहेत. निर्मात्यांनी हा ट्रेलर तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज केला आहे.