dharavi bank

‘धारावी बँक’(Dharavi Bank)मध्ये एक वेगळं जग पाहायला मिळणार आहे. एमएक्स प्लेअरची (MX Player) ही ओरिजनल सीरिज आहे.

    दिग्दर्शक समित कक्कड (Samit Kakkad) हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असं नाव बनलं आहे, ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समित कक्कड यांनी रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समित यांच्या ‘३६ गुण’ या चित्रपटाचं समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारे समित रोमँटिक सिनेमानंतर ‘धारावी बँक’  (Dharavi Bank) ही हिंदी वेबसीरिज (Hindi Webseries) घेऊन आले आहेत.

    कोणत्याही विषयाचा अत्यंत बारकाईनं संशोधन करून मगच आपल्याला उमगलेलं चित्र पडद्यावर सादर करायचं हे समित यांच्या यशाचं गमक असल्याचं त्यांच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकल्यावर अगदी सहजपणे लक्षात येतं. ‘हुप्पा हुय्या’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर ‘आयना का बायना’मध्ये त्यांनी एका वेगळ्याच विषयावर भाष्य केलं होतं. ‘हाफ तिकिट’ या चित्रपटानं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारली होती. आश्चर्यचकित हा सिनेमाही वेगळ्या विषयावरील होता. ‘३६ गुण’च्या प्रदर्शनानंतर सर्वांनाच ‘धारावी बँक’ या वेबसीरिजची प्रतीक्षा होती.

    समित यांनी मुंबईतील अंडरबेलीचा खूप बारकाईनं अभ्यास केला आहे. धारावी म्हणजे केवळ एक भली मोठी झोपडपट्टी नसून, तिथं राहणाऱ्या प्रत्येक घटकानं तिला आशियातील पहिल्या क्रमांकाची झोपडपट्टी बनवलं आहे. घरदार नसल्यानं रस्त्यावर झोपणारेही इथे आहेत आणि झोपड्यांचे तीन-चार मजली टॅावर उभारणारे माफियाही आहेत. सुसंस्कृत लोकांच्या विश्वापेक्षा धारावीतील जग खूप वेगळं आहे. या सर्व गोष्टींचा त्यांनी खूप रिसर्च केला आहे. याचा खूप फायदा त्यांना ‘धारावी बँक’ बनवताना झाला. समित यांच्या मते मुंबईतील सुंदर ठिकाण म्हणजे धारावी. समित यांचं बालपण याच परिसरात गेल्याने हे सगळं त्यांनी जवळून अनुभवलं आहे. एमएक्स प्लेअरची ही ओरिजनल सीरिज आहे. ‘धारावी बँक’मध्ये एक वेगळं जग पाहायला मिळणार आहे.

    आतापर्यंत असंख्य सिनेमांमध्ये अंडरवर्ल्ड आणि प्रशासनाचा सामना सर्वांनीच पाहिला आहे, पण या दरम्यानच्या अनेक गोष्टी कधीच समोर आल्या नव्हत्या. त्या सर्व बारीकसारीक गोष्टी ‘धारावी बँक’मध्ये पाहायला मिळणार आहेत. धारावीतील व्यवहार कसे चालतात, कशाप्रकारे इथली व्यवस्था सुरू असते, पोलिसांचे खबरी कसे काम करतात, अंडरवर्ल्डचे धागेदोरे कसे जोडलेले आहेत आणि एकूणच मुंबईतील अंडरबेलीचा उल्लेख या वेबसीरिजमध्ये आहे. या वेबसीरिजची निर्मिती झी स्टुडिओची आहे. एमएक्स प्लेअरचे चीफ कंटेट ऑफिसर गौतम तलवार तर सीनियर क्रिएटीव्ह प्रोड्यूसर पेरसी जामशेदजी आहेत.

    ‘धारावी बँक’मध्ये ‘थलाईवन’च्या भूमिकेत अभिनेता सुनील शेट्टी आहे, तर त्याच्या मागावर असलेला जेसीपी जयंत गावस्कर हा पोलीस अधिकारी बनलाय अभिनेता विवेक ओबेरॅाय. सोनाली कुलकर्णी, नागेश भोसले, फ्रेडी दारूवाला, सिद्धार्थ मेनन, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, जयवंत वाडकर शांती प्रिया, ल्यूके किनी, वामशी कृष्णन, भावना राव, समीक्षा भटनागर, श्रुती श्रीवास्तव, हितेश भोजराज, पवित्रा सरकार, रोहित पाठक आदी कलाकार ‘धारावी बँक’ या वेबसीरिजमध्ये आहेत. या वेब सीरिजचे लेखन सार्थक दास गुप्ता यांचे आहे. एमएक्स प्लेअरवर १९ नोव्हेंबरला ‘धारावी बँक’ स्ट्रीम झाली आहे.