digambar naik and sonali patil in bai wadyatun ja

तब्बल चार वर्षांनी ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून आपल्याला हसवायला सज्ज झालेले दिगंबर नाईक सांगतात, पुष्पगुच्छ जसा निरनिराळ्या फुलांनी सजलेला असतो तसंच ‘बाई वाड्यातून जा’ हे नाटक सजलयं. धमाल मनोरंजन करणारं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल, असा विश्वास अभिनेते दिगंबर नाईक व्यक्त करतात.

आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे. ‘बाई वाड्यातून जा’(Bai Wadyatun Ja) असं ते म्हणतायेत. ही बाई नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहायचं असेल तर अभिनेते दिगंबर नाईक (Digambar Naik) आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील (Sonali Patil) यांचं आगामी धमाल विनोदी नाटक ‘बाई वाड्यातून जा’ हे पाहावं लागेल. येत्या बुधवारी 29 मार्चला कल्याणमधील अत्रे रंगमंदिर येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले आहेत. नाटकाचे लेखन दिग्दर्शन संकेत तांडेल यांचं आहे.

या नाटकाची कथा एका जुन्या वाड्याभोवती फिरते. हा वाडा विकायचा असतो. तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो? याची धमाल कथा ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील या दोघांसमवेत या नाटकात भूषण घाडी, दीपा माळकर, भावेश टिटवळकर, अश्वजीत सावंतफुले या कलाकारांच्या भूमिका आहेत.

तब्बल चार वर्षांनी ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून आपल्याला हसवायला सज्ज झालेले दिगंबर नाईक सांगतात, पुष्पगुच्छ जसा निरनिराळ्या फुलांनी सजलेला असतो तसंच हे नाटक सजलयं. धमाल मनोरंजन करणारं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल, असा विश्वास अभिनेते दिगंबर नाईक व्यक्त करतात.
तीन वेगळ्या जॉनरची गाणी या नाटकात असून गायक अश्मिक पाटील ,कविता राम यांचा स्वराज गाण्यांना लाभला आहे. संगीत सुशील कांबळे यांचं आहे .नाटकाची जाहिरात संकल्पना संजय खापरे यांनी सांभाळली आहे. नेपथ्य वैभव पिसाट तर प्रकाशयोजना सौरभ शेठ यांची आहे. नेपथ्य निर्माण महेश धालवलकर यांचे आहे. रंगमंच व्यवस्था सचिन सावंत तर व्यवस्थापन जयेश निकम यांचं आहे.