
यशजींचा शेवटचा चित्रपट 'जब तक है जान' (रिलीज १३ नोव्हेंबर २०१२) प्रदर्शित करण्याची तयारी सुरु असतानाच त्यांचे २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले. आपल्या या शेवटच्या चित्रपटाच्या गुणवत्तेवर समिक्षक, प्रेक्षक व चित्रपटसृष्टी यांच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद ते अनुभवू शकले असते तर फार चांगले झाले असते.
‘दीवार’ (१९७५) मधील सर्वाधिक भावपूर्ण प्रसंग तुम्हालाही माहिती आहे. विजय (अमिताभ बच्चन) आपला धाकटा भाऊ रवी (शशी कपूर) या दोघांमध्ये संवाद सुरु होतो. संवादचे हळूहळू रुपांतर शाब्दिक चकमकीत होतं आणि अशातच विजय रवीला म्हणतो, आज मेरे पास बिल्डिंग है, प्राॅपर्टी है, बॅन्क बॅलन्स है, गाडी है… क्या है तुम्हारे पास? मेरे पास माँ है…. रवि शांतपणे उत्तर देतो आणि संपूर्ण हाऊसफुल्ल थिएटरमध्ये एक प्रकारची शांतता पसरते.
चित्रपट “मशाल” (१९८४) पत्रकार संपादक विनोदकुमार (दिलीपकुमार) एका मध्यरात्री आपल्या आजारी पत्नीला सुधाला (वहिदा रेहमान) डॉक्टरकडे घेऊन जाऊ इच्छितात. सुधाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर मूत्रपिंडाचे दुखणे बळावते. तिच्या पोटात प्रचंड वेदना होतात. बेलाॅर्ड पिअरच्या रस्त्यावर विनोदकुमार येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला हात करुन सांगतोय, विनंती करतोय, अरे थांबा… कोणीतरी थांबा कोई तो रोको… कोणीच थांबायला तयार होत नाही…. विनोदकुमारसाठी हा अनुभव अतिशय मन:स्ताप देणारा आणि धक्कादायक, दुर्दैवी असतो. अथक प्रयत्नांनंतरही त्याच्या पत्नीला कोणाच्याही गाडीतून लिफ्ट मिळत नाही आणि त्यातच सुधाचे निधन होते.
दिग्दर्शक यश चोप्रा यांची ओळख “रोमान्सचा बादशहा” (प्रेमपटाचा राजा) असली तरी माझ्या मते ते भावनोत्कट दृश्यांचे प्रभावी कारागीर आहेत. आणि त्यांच्या दिग्दर्शनातील अनेक चित्रपटांत अशा लहान मोठ्या गोष्टी दिसतात.
अगदी यशजींच्या दिग्दर्शनातील हिंदी चित्रपटातील पहिला मल्टीस्टार कास्ट चित्रपट ‘वक्त’ (१९६५) मध्ये भूकंपामुळे एका कुटुंबाची वाताहत होते. आई-वडील व तीन लहान मुले एकमेकांपासून वेगळे होतात, आपलं आयुष्य जगतात आणि मोठेही होतात आणि अठरा रिळांनंतर ते भेटतात. लाॅस्ट अॅण्ड फाऊंड हाच फाॅर्मुला. मांडणी व बांधणी अतिशय प्रभावी आणि त्यात भावनोत्कट दृश्यांची प्रभावी पेरणी.
‘इत्तेफाक’ (१९६९) मध्येही यशजींनी एका खुनाभोवतीचे रहस्यरंजक नाट्य साकारताना त्यात शक्य तेथे इमोशन्सही रुजवल्यात. ‘त्रिशूल’ (१९७८) असो वा ‘काला पत्थर’ (१९७९) यशजींनी पटकथेत सर्व प्रकारच्या गोष्टींत ‘एक धागा भावनोत्कटचा’ अगदी प्रभावीपणे साकारल्याचे जाणवते.
‘मशाल’ चित्रपट ‘अश्रूंची झाली फुले’ या मराठी नाटकावर बेतलेला तर ‘दिल तो पागल है’ (१९९७) गीत संगीत व नृत्य यांच्या पाश्र्वभूमीवरील प्रेमाचा त्रिकोण. एक प्रकारचा ऑपेरा. यशजींची रेंज अशी जबरदस्त. ‘वीर झारा’साठी (२००४) त्यांनी संगीतकार मदन मोहन यांच्या एकेकाळी ध्वनिमुद्रित झालेल्या पण कोणत्याच चित्रपटात वापरल्या न गेलेल्या अशा ‘चीजा’ अर्थात गाणी या चित्रपटात समाविष्ट केले. यशजींना चित्रपट संगीताचा कान आणि दृष्टी होती हे त्यांच्या ‘आदमी और इन्सान’ (१९६९), ‘कभी कभी’ (१९७६) अशा अनेक चित्रपटातील अनेक गाण्यांतून ‘दिसते.’ (‘इत्तेफाक’ मात्र त्यांनी गीतविरहित दिला. या चित्रपटाच्या प्लाॅटमध्ये गाण्याला ‘स्कोप’ नव्हताच. ‘दीवार’मध्ये गाणी आहेत. पण ती चित्रपटाच्या ‘क्लास’च्या तुलनेत फिकी. )
यशजींनी ‘द पोयट ऑफ लव्ह’ अर्थात रुपेरी प्रेमकाव्याचा जनक अशी इमेज ‘सिलसिला’ (१९८१) वेळी मिळाली. चित्रपटात अमित मल्होत्रा (अमिताभ बच्चन) आणि चांदनीचे (रेखा) यांचे एकमेकांवर बेहद्द प्रेम असतानाच अमितच्या भावाचे (शशी कपूर) अपघातात निधन झाल्याने अमितला भावाच्या पत्नीशी (शोभा) लग्न करावे लागते आणि चांदनीला याचा प्रचंड धक्का बसतो. तीदेखील मग लग्न करते, पण तिचं मन आपल्या पतीत डाॅ. व्ही. के. आनंद (संजीवकुमार) गुंतण्याऐवजी अमितकडे धाव घेते… या थीममध्ये भरपूर प्रेम, असोशी, भावनिक नाट्य आहे. पण जास्त ‘फोकस’ प्रेम गीतांचे दिलखुलास रुपेरी सादरीकरण, उत्कट प्रेम दृश्य आणि स्वित्झर्लंडचे देखणे सौंदर्य, गुलाबांचे ताटवे यावर पडला आणि यश चोप्रा म्हणजे रोमान्स असे समीकरण जुळले. यशजींनी या इमेजमध्ये न अडकता मशाल, फासले, विजय असे काही चित्रपट दिग्दर्शित केले. त्यात प्रेमासह अनेक गोष्टी होत्या.
‘चांदनी’ त्यांच्या मनात बसलेली व्यक्तीरेखा. ‘दाग’मध्ये राखीचे तर ‘सिलसिला’मध्ये राखीचे नाव चांदनी आहे. ‘चांदनी’ या नायिकाप्रधान चित्रपटाची त्यांनी घोषणा करताच रेखा ही भूमिका साकारेल असाच अनेकांचा समज होता. त्यांच्या डोळ्यासमोर श्रीदेवी होती. ती चेन्नईत शूटिंग करत असताना यशजी तिकडे गेले आणि त्यांनी श्रीदेवीला अतिशय चांगल्या मानधनात ‘चांदनी’साठी साईन केल्याची बातमी मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत पोहचलीदेखिल. यशजींना ‘चांदनी’च्या सादरीकरणात जास्त रस होता. त्यांनी अनेक दृश्यात सफेद अथवा लाईट रंगाच्या वस्त्रांना दिलेली पसंती श्रीदेवीच्या आईला रुचली नाही. पण यशजींना तोच रंग योग्य वाटले. चित्रपट पूर्ण झाल्यावर त्यांचाच निर्णय योग्य होता हे पडद्यावर दिसले. ‘चांदनी’ (१९८९)चा दक्षिण मुंबईतील मेट्रो थिएटरमधील मुहूर्त मला आजही आठवतोय. आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना त्याचे आमंत्रण होते आणि तोपर्यंत दक्षिणेकडील प्रादेशिक आणि हिंदी चित्रपटात व इव्हेन्टसमध्ये कलरफुल कपडे परिधान करणाऱ्या श्रीने चक्क लाईट अथवा साॅफ्ट रंगाला आपल्या कपड्यात पसंती दिल्याचे दिसले. यशजींच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील व्यक्तीरेखेनुसारची वस्त्रे आणि मग त्याचे त्या कलाकाराला त्याचे पटलेले महत्व यात अधोरेखित होते. ‘सिलसिला’साठी त्यांनी जया बच्चन व रेखा यांना महागड्या शिफाॅनच्या साड्यांची भरपूर चंगळ करु दिल्याची चर्चा फार रंगली तशी ‘चांदनी’च्याही वस्त्रांची व्हायला हवी होती.
श्रीला तिच्या कारकिर्दीतील द बेस्ट भूमिका यश चोप्रा यांनी ‘लम्हे’त (१९९१) दिली. तिची ही वेगळीच दुहेरी भूमिका. त्यांच्याच ‘डर’ (१९९३) मध्ये नायकावर (सनी देओल) त्याची पत्नी किरणवर (जुही चावला) एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेला असा एक प्रकारचा मानसिक स्वास्थ्य सुटलेला (शाहरुख खान) भारी पडला. याच वर्षीच्या ‘परंपरा’मध्ये भूमिका साकारायला मिळाल्याने अश्विनी भावे कमालीची सुखावली. अनेक कलाकारांना आपण यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात भूमिका साकारावी असे मनोमन वाटत असे. हे एक प्रकारचे प्रमाणपत्रच.
यशजींचा शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ (रिलीज १३ नोव्हेंबर २०१२) प्रदर्शित करण्याची तयारी सुरु असतानाच त्यांचे २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले. आपल्या या शेवटच्या चित्रपटाच्या गुणवत्तेवर समिक्षक, प्रेक्षक व चित्रपटसृष्टी यांच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद ते अनुभवू शकले असते तर फार चांगले झाले असते.
यश चोप्रा यांनी परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत रुजवलेल्या यशराज फिल्म या निर्मिती संस्थेचा आज प्रचंड मोठा वटवृक्ष झाला आहे. ‘दाग’ (१९७३) यशराज फिल्मचा पहिला चित्रपट. यशजी आपले मोठे बंधु बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म या बॅनरमधून बाहेर पडलेले. तेथे ‘धर्मपुत्र’, ‘धुल का फूल’ इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आता चित्रपती व्ही.शांताराम यांनी यशजींना आपल्या राजकमल स्टुडिओत ऑफिससाठी जागा दिली आणि यशजीनी त्यानंतर आपल्या अनेक चित्रपटांचे मुहूर्त व शूटिंग याच स्टुडिओत केले. कालांतराने त्यांची मुले आदित्य आणि उदय यांनी ओशिवरात आधुनिक तांत्रिक गोष्टींसह भव्य दिमाखदार असा यशराज स्टुडिओ उभारलाय. अनेक चित्रपटांची निर्मिती सुरु आहे. यश चोप्रांचा स्मृतिदिन असं बरेच काही सांगणारा.
– दिलीप ठाकूर