नाट्यप्रयोगशाळेत सम्राट अशोक!

मराठी आणि हिंदी प्रायोगिक रंगभूमीवर गेली अनेक वर्षे सक्रीय असलेले मंजूल भारद्वाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'सम्राट अशोक' या संहितेवर विविध अंगांनी अभ्यास सुरू केला.

    – संजय डहाळे

    युद्धभूमीवर चारी बाजूंनी पडलेला मुडद्यांचा खच; जीव हेलावून सोडणारा जखमींचा आक्रोश; अनाथ, निराधार कुटुंबांची वेदना; चारीबाजूंनी वाहाणाऱ्या रक्ताच्या नद्या… सारं काही भयानक सुन्न करून सोडणारं. कलिंग युद्धातल्या रक्तपातानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक हादरुन गेलाय. मृत्यूचे एवढं भीषण तांडव डोळ्यांनी बघणं असह्य झालंय. अखेर युद्धाऐवजी शांततेचा मार्ग त्यानं स्वीकारला. बुद्धधर्माचा अनुयायी बनला…
    आज एक काळ उलटला. कोरोना संकटानं जवळपासची माणसं गडप केली. गच्च भरलेल्या स्मशाणांनीही हात टेकले. मृत्यूचं तांडवच सुरू झालं आणि कुठेतरी रंगकर्मींना सम्राट अशोकाची ‘ती’ मनस्थिती जाणवू लागली. त्याचा ‘नाट्य’ या माध्यमातून अभ्यास सुरू झाला. धनंजय कुमार यांनी लिहीलेलं सम्राट अशोकावरलं नाटक एका अभ्यास ग्रुपमध्ये अक्षरशः संचारले…
    मराठी आणि हिंदी प्रायोगिक रंगभूमीवर गेली अनेक वर्षे सक्रीय असलेले मंजूल भारद्वाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सम्राट अशोक’ या संहितेवर विविध अंगांनी अभ्यास सुरू केला. सम्राटाच्या मनस्थितीचा त्यात वेध घेतला. साचेबद्ध मनोरंजनाच्या सीमा ओलांडून दोन काळातल्या वास्तवावर भाष्य करण्यासाठी ही टिम तयार झाली. यश-अपयश याचा धोका पत्करणं हे साऱ्यांनाच अंगवळणी पडलं आहे. रंगकर्मींनी त्यातील प्रायोगिकता जपण्याचा प्रयत्न केला आणि काही दिवसानंतरच्या अभ्यासानंतर ‘सम्राट अशोक’ एक तालमीतलं नाट्य म्हणून आकाराला आलं. सुरक्षा व सादरीकरणाच्या अनेक बंधनांमुळं त्यातील काही भाग हा चित्रीत करून अखेर दर्दी रसिक व अभ्यासकांपर्यंत पोहचविण्यात आलाय.
    ‘कसंही करून निवडणूका जिंकून लोकप्रतिनिधी होण्याची आजची संस्कृती आणि कोरोना संकटामुळं मृत्यूचा सुरू असलेला तांडव – या दोन्ही पार्श्वभूमीवर एक संदेश देण्याचा प्रयत्न याच्या सादरीकरणात करण्यात आलाय. भूतकाळातील सम्राट अशोक जो यापूर्वी चित्रपट, मालिका, नाटक, कथा कादंबऱ्या यात रंगविण्यात आलाय. तो कदाचित असा नसेलही. रंगभूमीच्या सर्व अंगाने सम्राट अशोक; तो कालखंड याचा परिपूर्ण अभ्यास करून नाट्य रंगविण्याचा प्रयत्न व प्रयोग दिग्दर्शक म्हणून प्रामाणिकपणं केलाय, असेही दिग्दर्शक आणि अशोकाची भूमिका साकार करणारे रंगचिंतक मंजूल भारद्वाज यांनी या भेटीत सांगितलं.
    पनवेल येथील निसर्गाच्या साक्षीनं ‘सम्राट अशोक’ या हिंदी संहितेवर ‘पूर्वअभ्यास’ झाला. चर्चा झाली. विविध शक्यता तपासण्यात आल्या आणि ‘सम्राट’ उभा राहीला. येत्या १२ ऑगस्टला याचा पहिला जाहीर प्रयोग होणार आहे. या प्रयोगाच्या सादरीकरणात ‘कलाकार’ आणि ‘प्रकाश योजना’ यावरच भर देण्यात आलाय. पूर्ण रंगमंच हाच नेपथ्य आणि कलाकारांची देहबोली हेच सर्वस्व – अशी मांडणी केली आहे. संहिता अभ्यासानं एका दोन अंकी ‘प्रायोगिक’ नाटकाचा जन्म अशाप्रकारे झाला.
    सम्राट अशोकाची भूमिका हा या नाटकाचा कणा आहे. त्यावर खुद्द मंजूलजींनी बरेच परिश्रम घेतलेत. तांत्रिक सहाय्यापेक्षा भूमिकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलय. स्वगतांनी परिपूर्ण नाट्य असल्यानं अनेक दक्षता घेण्यात आल्यात. रचनातंत्रातही नवा ‘प्रयोग’ केलाय. ओढून-ताणून सादरीकरण केलेलं नाही. कृत्रिमता टाळण्याचा एक आगळावेगळा त्यामागं प्रयत्न आहे. रंगमंचीय अवकाश व्यापून टाकणारा एक महान योद्धा हा यातील महत्त्वाचा घटकच. ‘लोकहितदक्ष  राजा’ त्यातून नजरेत भरतो.
    अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर, सायली पावसकर अभ्यास रंगकर्मींचा सहभाग या नाट्यात असून, ‘सम्राट अशोक’ यामुळे साऱ्यांनाच भारताचा एक सांस्कृतिक वारसा जवळून अभ्यास करण्यास मिळाला. भूतकाळाशी वर्तमानाशी संदर्भ जोडता आला. दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासात साऱ्या अभ्यासकांना डोकविता आलं.
    ऐंशीच्या दशकात ज्याप्रमाणं छबिलदास रंगभूमी ही एक महत्त्वाची प्रायोगिक चळवळ ठरली. त्याच प्रकारे पनवेल येथे सुरू असलेले प्रयत्न हे एक ‘नाट्य प्रयोगशाळा’ ठरत आहेत. भाषा, सादरीकरण हा इथे महत्त्वाचा विषय नाही, तर त्याहीपेक्षा आपल्या देशाची संस्कृती, सन्मान हे लाखमोलाचे आहेत. हेच या प्रयोगातील काही स्वगतांच्या सादरीकरणातून जाणवले!