fauj

‘फौज-द बॅटल ऑफ हिली’(Fauj The Battle Of Hilli) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

    भारत आणि पाकिस्तान (India Pakistan War) या दोन देशांमध्ये 1971 मध्ये महत्वपूर्ण युद्ध झालं. याच युद्धावर आधारित ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’(Fauj The Battle Of Hilli) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अशोक समर्थ, किरण गायकवाड, सोमनाथ अवघडे, उत्कर्ष शिंदे,गणेश पदमाळे, श्रीकांत गायकवाड, प्रसाद सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मयूर तातुसकर, कुशन जोशी, महेश करवंदे ( निकम), निलेश रमेश चौधरी आणि अमृता धोंगडे निर्माते आहेत. (Marathi Movie)

    हे युद्ध इतिहासातील एक महत्वाचं युद्ध होतं. कारण या युद्धात भारताच्या विजयी झेंड्याची घोषणा करण्यात आली. तसेच बांग्लादेश या नवीन देशाची स्थापनाही झाली. या सगळ्यात बलिदान दिलेल्या शूरवीर सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे.

    चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, “या पूर्वीही मी अशाच धाटणीचा चित्रपट केला आहे. त्यामुळे मला अशा रक्तरंजित लढाई असणाऱ्या कथा विशेष भावतात. हे पडद्यावर साकारणं जरा जड जातं. मात्र निर्माते, कलाकार, इतर टीम यांच्या साथीने हा प्रवास सोपा होतो. इतिहासात अनेक लढाया, युद्धे झालीत. परंतु या युद्धामुळे महत्वपूर्ण घटना घडली. अंगावर शहारा आणणारी ही लढाई आतापर्यंतची सर्वात मोठी रक्तरंजित लढाई ठरली. या लढाईत पाकिस्तानचे दोन भाग झाले. ही लढाई निश्चितच सोपी नव्हती. भारतीय सैन्यांची हीच शौर्यगाथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या निमित्ताने इतिहास पुन्हा जागवण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे. या सगळ्यात मला भूषण मंजुळे यांची कथा, पटकथा लाभल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना अधिकच वास्तववादी वाटेल.”