‘तूफान’ची प्रेरणादायक खेळ-कथा उलगडणार, बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित!

मेहरांचं दिग्दर्शन असल्यानं 'तूफान'कडून अपेक्षा वाढल्या आहेत. 'तुफान'च्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचं दर्शन घडतं.

    अमेझॉन प्राईम व्हिडीओनं या वर्षातील बहुप्रतीक्षित समर ब्लॉकबस्टर ‘तूफान’ या आगामी हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सहकार्यानं एक्सेल एन्टरटेन्मेन्ट आणि आरओएमपी पिक्चर्सच्या साथीनं प्रस्तुत, रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित ‘तूफान’ प्रेरणादायक खेळ-कथा उलगडणार आहे. या सिनेमात फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत असून, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ यांच्याही भूमिका आहेत.

    मेहरांचं दिग्दर्शन असल्यानं ‘तूफान’कडून अपेक्षा वाढल्या आहेत. ‘तुफान’च्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचं दर्शन घडतं. हा अज्जू भाई व्यावसायिक बॉक्सर अझीझ अली बनतो. एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजीत अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रकाशित होणारा ‘तूफान’ हा पहिलाच चित्रपट असून, १६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत फरहान म्हणाला की, मी ‘तूफान’च्या खऱ्या अर्थानं प्रेमात आहे. एखादी व्यक्ती शरीरानं कितीही बळकट असली तरीही बॉक्सर असणं, हे काही येरागबाळ्याचं काम नव्हे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ८ ते ९ महिने अविश्रांत कष्ट घ्यावे लागले. बॉक्सिंग हा खेळ शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कसोटी पाहणारा आहे. या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत स्क्रीनवर पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे.