
भयानक दिसणारी व्यक्ती अबाया परिधान केल्याने मुस्लिम बनत नाही.
गौहर खान : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. एकीकडे राखीचा पूर्व पती आदिल खान दुर्रानी तिच्यावर माध्यमांसमोर विविध आरोप करत आहे. तर दुसरीकडे या सर्व वादादरम्यान राखी स्वतः मुस्लिम असल्याचं सांगत आहे. राखीने या आधी सांगितले होते की जेव्हा तिने आदिल खानशी लग्न केले होते तेव्हा तिने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. नुकतीच ती उमराह करण्यासाठी मक्काला पोहोचली होती. तिथून परतल्यानंतर ती आता अबाया परिधान घालून फिरताना दिसतेय. पापाराझींसमोर राखीचा नवीन ड्रामा पहायला मिळत आहे.
राखीने पापाराझींसमोर केलेल्या ड्रामामुळे ‘बिग बॉस ७’ ची विजेती आणि अभिनेत्री गौहर खान चांगलीच भडकली आहे. राखीने इस्लाम धर्माचा अपमान केल्याचा आरोप तिने केला आहे. “राखी तिच्या स्वत:च्या स्टंटसाठी उमराहचा किंवा एखाद्या धर्माचा वापर कसा करू शकते”, असा सवाल गौहरने केला. नुकतीच गौहरने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. कतारमधल्या एका चॅरिटीने कशा पद्धतीने २० अनाथ मुलांना उमराह करण्यासाठी पाठवलं, असं सांगणारी ती पोस्ट होती. यासोबतच गौहरने कोणाचंही नाव न घेतला म्हटलं, ‘काही लोक इस्लाम धर्माची खिल्ली उडवत आहेत. भयानक दिसणारी व्यक्ती अबाया परिधान केल्याने मुस्लिम बनत नाही. अशा पद्धतीचा ड्रामा करणारी लोकं उमराह करण्यासाठी त्या पवित्र जागी पोहोचू कसे शकतात, यावर माझा विश्वासच बसत नाही.
या पोस्टमध्ये गौहरने पुढे लिहिलं, ‘एका मिनिटात इस्लाम कबूल केलं जातं आणि दुसऱ्या मिनिटाला म्हणतात की त्यांनी आपल्या मर्जीने हे सर्व केलं नाही. हा सर्व मूर्खपणा आहे. लोकांना जेव्हा प्रसिद्धी हवी असते तेव्हा ते इस्लाम धर्म स्वीकारतात, अन्यथा नाही. त्यांना लाज वाटली पाहिजे. मी सौदी आणि इंडियाच्या बोर्ड ऑफ इस्लामला याविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती करते. जेणेकरून पुन्हा कधी कोणी अशा पद्धतीने धर्माची मस्करी करणार नाही.’ अशी गौहर खान म्हणाली.