या बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही रंगपंचमी, कोरोनामुळे घरातच ही गाणी ऐका आणि सण साजरा करा!

आजवर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये होळी साजरी करण्यात आली. त्यासाठी होळीवर आधारित काही गाणी देखील तयार करण्यात आली. आता तिच गाणी होळीच्या दिवसांमध्ये ठिकठिकाणी ऐकायला मिळतात. होळी आणि बॉलिवूडची गाणी हे आनोखं समीकरण आहे.

    शोले-

    भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या पसंतीस उतरलेला ‘शोले’ चित्रपटात होळीचे रंग पाहायला मिळाले होते. नायक अमिताभ बच्चन, धर्मेद्र आणि बसंतीच नव्हे तर या चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग होळीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसले होते. ‘कब है होली…’ हा डायलॉग आजच्या घडीलाही चांगलाच प्रसिद्ध आहे. या चित्रपटातील होली के दिन जब दिल खिल जाते है हे गाणं खूप प्रसिद्ध आहे.

    मोहब्बते-

    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि बादशहा शाहरुख खान या जोडीने किती चित्रपटात काम केले यापेक्षा कोणत्या चित्रपटात शाहरुखने अमिताभ यांना रंग लावला हा जर विचार केला तर ‘मोहब्बते’ चित्रपटातील अमिताभ यांचे गुरुकूल आणि शाहरुखने होळी साजरी करण्यासाठी केलेली विनंती तुम्हाला नक्कीच आठवेल. बॉलिवूडमधील होळीचा एक वेगळा रंग या चित्रपटात दिसला होता.

    सिलसिला-

    अमिताभ बच्चन यांच्या या दमदार चित्रपटानंतर त्यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटातही होळीच्या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. या चित्रपटात अमितच्या भूमिकेत दिसले अमिताभ आणि चांदणीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या रेखा यांचा अभिनय जेवढा लोकांच्या लक्षात आहे, अगदी तेवढेच या चित्रपटातील ‘रंग बरसे…’ हे गाणे देखील लोकप्रिय आहे.

    ये जवानी है दिवानी-

    बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी दीपिका आणि रणबीर कपूर यांचं ब्रेकअप तसे कुणासाठीच नवं नाही. ‘ये जवानी दिवानी’ चित्रपटातील ‘बलम पिचकारी..’ या गाण्यातील त्यांच्या केमिस्ट्रीने एक वेगळाच रंग भरला होता. चित्रटातील या गाण्याची आजही लोकप्रियता दिसून येते.

    रामलीला-

    रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमाच्या चांगल्याच चर्चा होत्या. त्याच वेळी बॉलिवूडमधील या गोड जोडीने ‘रामलीला’ चित्रपटात होळीचे रंगाची उधळण केल्याचे पाहायला मिळाले होते. तेव्हा त्यांचा हा चित्रपट हिट ठरला होता.