
हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
गायक आणि रॅपर हनी सिंह याचा (Honey Singh) आज 40 वा वाढदिवस आहे. हनी सिंहने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे. हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री (Documentary On Honey Singh’s Life) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री रिलीज होणार आहे. डॉक्युमेंट्रीची घोषणा करत हनी सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये तो गाणं गाताना दिसतोय. त्याच्या गाण्याला चाहते त्याला दाद देताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलं आहे, “माझ्या आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हनी आजारी आहे आणि डॉक्युमेंट्री तयार आहे”.
ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगांची निर्मिती
हनी सिंहच्या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन मोजेज सिंहने केलं आहे. तर ऑस्कर पुरस्कार विजेते गुनीत मोंगा या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करत आहेत. देशातला सगळ्यात मोठा रॅपर बनण्याचा हनी सिंहचा प्रवास या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून उलगडणार आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येणार आहेत. तसेच त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची झलकदेखील प्रेक्षकांना या डॉक्युमेंट्रीमध्ये मिळणार आहे.
हनी सिंहच्या डॉक्युमेंट्रीबद्दल गुनीत मोंगा म्हणाल्या, “भारतीय संगीत क्षेत्रात बदल घडवून आणण्यात हनी सिंहचा मोलाचा वाटा आहे. तरुणांमध्ये त्याची क्रेझ आहे. त्याच्या आयुष्यावर एखादी कलाकृती बनवण्याची माझी इच्छा होती. नेटफ्लिक्सच्या बॅनरखाली या डॉक्युमेंट्रीची निर्मिती करण्यास मी सज्ज आहे”. गुनीत मोंगाच्या ‘एलिफेंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
हनी सिंहचं खरं नाव हिरदेश सिंह आहे. एका पंजाबी रॅप सॉन्गच्या माध्यमातून 2003 साली त्याने संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. ‘ब्राउन रंग’, ‘देसी कलाकार’ आणि ‘ब्लू आईज’ अशी अनेक सुपरहिट गाणी त्याने गायली आहेत. तसेच अनेक बॉलिवूड सिनेमांसाठीदेखील त्याने गाणी गायली आहेत. मात्र 2015 पासून आजारपणामुळे तो मनोरंजन सृष्टीपासून दूर होता. पण 3.0 या म्यूझिक अल्बमच्या माध्यमातून त्याने पुन्हा काम सुरु केलं आहे.