sonu_sood

कोरोना काळात आपण लोकांना मदत करण्याच्या स्वच्छ हेतूने आपल्या संस्थेमार्फत रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचे गरजूंमध्ये वाटप केले असा दावा करणारा हस्तक्षेप अर्ज अभिनेता सोनू सूदकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

    मुंबई : कोरोना काळात आपण लोकांना मदत करण्याच्या स्वच्छ हेतूने आपल्या संस्थेमार्फत रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचे गरजूंमध्ये वाटप केले असा दावा करणारा हस्तक्षेप अर्ज अभिनेता सोनू सूदकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

    कोरोनासंदर्भात विविध समस्यांवर मुंबई उच्च न्यायालयात जनिहत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. त्यावेळी सेलिब्रिटीना रेमेडिसिव्हीर इंजेक्शन मिळालेच कसे असे खडसावत न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यावर सोनू सुदकडून अँड. मिलन देसाई यांच्यामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे.

    आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नसून काहीजण आपली बदनामी करून समाजिक कामात अडथळा निर्माण करत आहेत असा दावा सोनूच्यावतीने करण्यात आला. कोरोनामुळे अनेक बेघर झालेल्या गरजु लोकांची आपण मनोभावे मदत केली आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही लोकांना औषधांची गरज होती त्यांचा केवळ दुवा म्हणून आपण काम केले असून कंपनीकडून गरजूंना ती मिळवून दिली असा युक्तिवाद सूदच्या वकिलांकडून करण्यात आला. त्याचा युक्तिवाद ऐकून घेत खंडपीठाने सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.