sagar mhatre

‘इंडियन आयडॉल मराठी’च्या पहिल्या पर्वाचा (Indian Idol Marathi) ठरलेल्या सागर म्हात्रेच्या (Sagar Mhatre) विजयाने सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. कोप्रोली गावाचा सुपुत्र असलेल्या सागरने उरणमध्ये आल्यावर सर्वप्रथम जासई येथील माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून त्यांना वंदन केले.

  उरण: ‘इंडियन आयडॉल मराठी’चा (Indian Idol Marathi) नुकताच महाअंतिम सोहळा संपन्न झाला आहे. या महाअंतिम सोहळ्यात मुळचा उरण तालुक्यातील कोप्रोली गावचा पण पनवेलमध्ये राहणारा सागर म्हात्रे (Sagar Mhatre) ‘इंडियन आयडॉल मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला आहे. तर जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. गुरुवारी सागरचे गावात उत्साहात स्वागत (Warm Welcome  Of Sagar Mhatre) करण्यात आले. प्रत्येक गावाच्या वेशीवरून स्वागतोत्सव रॅली काढण्यात आली.

  मराठी इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलेल्या सागर म्हात्रेच्या विजयाने सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. कोप्रोली गावाचा सुपुत्र असलेल्या सागरने उरणमध्ये आल्यावर सर्वप्रथम जासई येथील माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून त्यांना वंदन केले.

  जेव्हा मी इंडियन आयडॉलमध्ये गेलो आणि एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हापासून लोकांचा मला खूप सपोर्ट होता. सुरुवातीपासून लोकांनी मला एवढा सपोर्ट केला की मी बऱ्याच वेळा हायेस्ट वोटेड कंटेस्टंस्ट होतो. पहिल्या एपिसोडला मला जजेस म्हणाले होते की आम्ही तुला या शोचा विनर म्हणून बघतो. त्यामुळे जबाबदारी अजून वाढली होती. त्यांनतर अजून एक एपिसोड झाला त्यामध्ये पण त्यांनी मला विनर अनाउन्स केले होते. तेव्हा मला अजून ताकद मिळाली. त्यात लोकांचा सपोर्ट पहिल्यापासूनच होता. त्यामुळे हे मला कसंही करून करायचंच होतं व देवाच्या कृपेने मराठी इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता बनलो. यासाठी सर्वांचे आभार.

  - सागर म्हात्रे, विजेता - मराठी इंडियन आयडॉल, पर्व पहिले

  गुरुवारी कोप्रोली गावात सकाळी बेंजो व लेझीम रॅली काढण्यात आली होती. त्यांनतर रोड शो उरण पूर्व भागातील खोपटे, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, सारडे, वशेनी, पुनाडे, केळवणे, चिरनेर, कलंबूसरे, मोठी जुई या गावातील वेशीवरून नेण्यात आला. यावेळी जमा झालेल्या नागरिकांनी सागरचे स्वागत करीत एकच जल्लोष केला. यावेळी सागरने उपस्थितांचे व त्याला मत दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांसाठी एकविरा आईचे गाणे गायले. सागरच्या या दैदिप्यमान विजयाने उरण तालुक्यासह संबंध महाराष्ट्रात त्याचे कौतुक होत आहे.

  मराठी इंडियन आयडॉल साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धक निवडले गेले होते. या स्पर्धकांपैकी पेशाने इंजिनियर असलेला सागर म्हात्रे हा एक स्पर्धक होता. या स्पर्धेत त्याच्या गोड गळ्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. अखेर सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे.

  या स्पर्धेत टॉप-१४ स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मेहेनत, जिद्द, रियाज या जोरावर परिक्षकांची व्हा व्हा मिळवत तब्बल ८ ‘झिंगाट परफॉर्मन्स’ मिळवले. हिंदी, मराठी सर्वप्रकारची गाणी गात, दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या कौतुकासही सागर पात्र ठरला. आता ‘इंडियन आयडल मराठी’च्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले आहे. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली आहे.

  सागर म्हात्रेची आई पंकजा म्हात्रे, वडील विश्वास म्हात्रे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. सागर म्हात्रेचे सुरुवातीचे गुरु संध्या घाडगे, महादेव बुवा शहाबाजकर यानंतर गेली अनेक वर्षे मार्गदर्शन केले ते कोल्हापुरे सर आदींचे यात महत्त्वाचे योगदान आहे. सागरला जिंकण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील विविध नागरिक, सामाजिक संस्था,संघटना, चाहते विविध सेलिब्रिटी यांनी तसेच स्थानिक भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणात वोटिंग केले त्यामुळे सागर म्हात्रे याचा यशाचा मार्ग मोकळा झाला.