
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.
पणजी : वर्षभर सिनेरसिक ज्या सोहळ्याची वाट बघत असतात तो सोहळा म्हणजे गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोव्यात होणाऱ्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival Of India) म्हणजेच ‘इफ्फी’ची (IFFI) खूप चर्चा सुरु आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या काळात हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावेळी पाच मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’, दिग्पाल लांजेरक यांचा ‘शेर शिवराज’, डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’, प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि शेखर रणखांबे यांच्या ‘रेखा’ या सिनेमांचा समावेश आहे.
यावर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव खूप खास असणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या बहुचर्चित ‘दृश्यम २’चे खास स्क्रिनिंग आहे. तसेच बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा ‘अभिमान’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाहता येणार आहे.
मधुर भांडारकरचा ‘इंडिया लॉकडाऊन’ आणि अजय देवगणचा ‘दृश्यम २’, ‘थ्री ऑफ अस’, ‘द स्टोरी टेलर’, ‘मेजर’, ‘सिया’, ‘द कश्मीर फाइल्स’ हे हिंदी सिनेमे या महोत्सवात लोकांना पाहायला मिळतील. तसेच एस.एस राजामौलींचा ‘आरआरआर’ तेलुगू व्हर्जनमधील सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळानंतर होत असलेल्या या महोत्सवात जास्त लोकांची उपस्थिती असण्याचा अंदाज आहे. या चित्रपट महोत्सवाला कोणते कलाकार उपस्थिती लावणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे.