२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी नियमित जामीन मंजूर, २ लाखांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन

यादरम्यान ईडीने म्हटले होते की, त्यांच्याकडे जॅकलिनविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे त्यांना नियमित जामीन देऊ नये. यावर कोर्टाने ईडीची कानउघाडणी करत जर पुरावे होते, तर जॅकलिनला आतापर्यंत अटक का केली नाही? असा प्रश्न विचारला.

    मुंबई – २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने तिला नियमित जामीन मंजूर केला आहे. ०२ लाखांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास तिला मनाई करण्यात आली आहे. या सुनावणीला जॅकलिन कोर्टात हजर होती. सुनावणीसाठी जॅकलिन आजही वकिलाच्या वेशभूषेत कोर्टात पोहोचली होती.

    यापूर्वी झालेल्या सुनावणीला जॅकलिनने कोर्टात म्हटले होते, याप्रकरणी मी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केल्याचे जॅकलिनने न्यायालयात सांगितले होते. मी स्वत: या प्रकरणात आत्मसमर्पण केले आहे, परंतु ईडीने मला फक्त त्रास दिला आहे, असा आरोप जॅकलिनने केला होता.

    यादरम्यान ईडीने म्हटले होते की, त्यांच्याकडे जॅकलिनविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे त्यांना नियमित जामीन देऊ नये. यावर कोर्टाने ईडीची कानउघाडणी करत जर पुरावे होते, तर जॅकलिनला आतापर्यंत अटक का केली नाही? असा प्रश्न विचारला.

    १० नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत जॅकलिन कोर्टरूममध्ये आपला बचाव करताना म्हणाली होती, ‘मी याप्रकरणी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे. मी स्वत: या प्रकरणात आत्मसमर्पण केले आहे, परंतु EDने मला फक्त त्रास दिला आहे. मी माझ्या कामानिमित्त परदेशात जात राहते, पण मला परदेशात जाण्यापासून रोखले गेले. मला माझ्या कुटुंबीयांनाही भेटू दिले जात नाही. मी या सर्व गोष्टींसाठी तपास यंत्रणेला ईमेल केला होता, पण त्याचेही उत्तर आले नाही. त्यांनी आरोप केला की, मी देश सोडून पळून जाणार आहे. मग त्यांनी मला LOC (लुक आऊट सर्कुलर) जारी करून थांबवले. EDचे सर्व आरोप निराधार आहेत.’