waman kendre

देशपातळीवरील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजला जाणारा राष्ट्रीय कालिदास सन्मान २०२०(Kalidas Sanman) या वर्षासाठी प्रा. वामन केंद्रे (Kalidas Sanman To Waman Kendre)यांना जाहीर झाला आहे.

  मुंबई : मध्य प्रदेश शासनाच्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठीत समजला जाणारा राष्ट्रीय कालिदास सन्मान २०२०(Kalidas Sanman) या वर्षासाठी प्रा. वामन केंद्रे (Kalidas Sanman To Waman Kendre)यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार केंद्रे यांना त्यांच्या भारतीय रंगभूमीवरील अद्वितीय योगदानाबद्दल घोषित करण्यात आला आहे. प्रा. केंद्रे यांनी भारतीय रंगभूमीचा ध्वज विश्वाच्या रंगमंचावर फडकवुन तिला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठे योगदान केले आहे. भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली भरवलेले ८ वे थिएटर ॲालम्पिक्स हे त्याचे एक ठोस उदाहरण होय.

  भारतीय नाटकाला देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेले आटोकाट प्रयत्नही अत्यंत महत्त्वाचे आणि पायाभूत मानले गेले आहेत. आदिवासी, लोक, हौशी,व्यावसायीक,शास्त्रीय तसेच वंचित कलावंतांना योग्य मंच मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले उपक्रम बेजोड ठरले आहेत.आपल्या अन्यन्य साधारण दिग्दर्शन शैलीमुळे आणि पथदर्शी नाट्य निर्मित्तींमुळे त्यांचे आज भारतीय रंगभूमिवरील स्थान आदर्शवत आणि अढळ ठरले आहे.

  त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कैक नाटकांनी भारतिय रंगभूमिवर इतिहास घडवला आहे. झुलवा, एक झुंज वाऱ्याशी, दुसरा सामना, नातीगोती, तीन पैशाचा तमाशा,राहीले दूर घर माझे, गधे की बारात, सैंय्यॅां भए केोतवाल, टेम्ट मी नॅाट, लडी नजरिया, चार दिवस प्रेमाचे, रणांगण, ती फुलराणी, प्रेमपत्र, मध्यम व्यायोग, वेधपश्य , मोहे पिया, मोहनदास, गजब तेरी अदा, लागी लगन,काळा वजीर पांढरा राजा ही त्यांची अत्यंत गाजलेली नाटकं होत.

  त्यांच्या नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाला तर आज देशात तोड नाही. अकॅडमी ॲाफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ, नॅशनल स्कुल ॲाफ ड्रामा नवी दिल्ली, रंगपीठ थिएटर मुंबई, एनसीपीए मुबंई व इतर देशी विदेशी संस्थांबरोबर केलेल्या शैक्षणिक ऊपक्रमांमुळे कित्तीतरी आघाडीचे अभिनेते, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, निर्माते, अभ्यासक, संशोधक आणि शिक्षक हे नाटक, चित्रपट,टी.वी, व इतर महत्त्वाच्या माध्यमांना मिळाले आहेत. देशातील सर्वोत्तम शिक्षकांपैकी ते स्वत: एक अग्रणी नाट्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्या विद्दार्थ्यांनी अभिनय, दिग्दर्शन, लेखन, व्यवस्थापन, तंत्र आदी क्षेत्रात भारतभर नाटक सिनेमा व दूरदर्शन माध्यमात मोठा दबदबा निर्माण केला आहे.

  प्रा.वामन केंद्रे यांना मिळणारा हा पाचवा राष्ट्रीय सन्मान आहे. या पुर्वी त्यांना पद्मश्री (२०१९), केंद्रिय संगीत नाटक अकादमी पुरस्कार(२०१२), बी.व्ही.कारंत स्मृति पुरस्कार( २०१७,एनएसडी), मनोहर सींग स्मृति पुरस्कार ( २००४,एनएसडी) प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय कालिदास सन्मान हा त्यांच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा आहे.

  आत्तापर्यंत कालिदास सन्मान हा शंभु मित्रा, इब्राहिम अल्काजी, हबीब तनवीर, बादल सरकार, ब.व.कारंत, पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, श्रीराम लागु, गिरीश कार्नाड,कावालम नारायण पण्णीकर, जोहरा सहगल, बाबासाहेब पुरंदरे, विजया मेहता, सत्यदेव दुबे, तापस सेन,रतन थियाम, बंशी कोल, अनुपम खेर, राज बिसारिया, राम गोपाल बजाज, देवेंद्रराज अंकुर आदी दिग्गज कलावंतांना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी मिळाला आहे.

  पुरस्काराचे स्वरूप रोख दोन लाख रुपये आणि मंच सन्मान असे आहे. या पुरस्काराचे वितरण त्यासाठी भरवलेल्या भव्य सोहोळ्यात केले जाते.