
‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२१’ (kalnirnay Diwali Magzine 2021)हा अंक प्रकाशित झाला आहे. कालनिर्णयचा यंदाचा दिवाळी अंक हा व्यक्तिमत्त्व विशेषांक आहे.मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर(Ashok Naigaonkar) यांच्या हस्ते नुकतेच या अंकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.
मुंबई : कोरोनाच्या संकटावर मात करत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२१’ हा अंक प्रकाशित झाला आहे. कालनिर्णयचा यंदाचा दिवाळी अंक हा व्यक्तिमत्त्व विशेषांक आहे. त्याचबरोबर वैचारिक आणि मनोरंजन या विषयावरील वाचनीय लेखही या अंकात आहेत. मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते नुकतेच या अंकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.
वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लबमध्ये रंगलेल्या या सोहळ्याला प्रा. डॉ. मोहसिना मुकादम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी तरुण शेफ अदिती लिमये-कामत तसेच कालनिर्णयचे संपादक प्रकाशक जयराज साळगावकर व संचालक शक्ती साळगावकर आदी मान्यवर हजर होते. यावेळी सुमंगल सांस्कृतिक प्रकाशन (कालनिर्णय) च्या ‘निवडक १९७३-२०२१’ आणि ‘निवडक पाककृती १९७३-२०२१’ या दोन पुस्तकांचेही अनावरण करण्यात आले. तसेच ‘पाकनिर्णय-२०२२’ या पाककृती स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारही करण्यात आला. भारतीय परंपरेचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या कालनिर्णयचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने कालनिर्णयने काही पुस्तकांचे पुर्नप्रकाशन केले आहे, तर काही पुस्तके नव्याने प्रकाशित केली आहेत.
‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२१’मध्ये चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या राज खोसला यांचा प्रवास मांडणारा ‘जादूनगरीचा हिट जादूगर’ हा लेख सुधीर नांदगावकर यांनी लिहिला आहे. ५० च्या दशकात हिंदी चित्रपटांना जॅझ संगीत देणाऱ्या चिक चॉकलेट या गोवन संगीतकाराची कारकीर्द जयराज साळगावकर यांनी मांडली आहे. याशिवाय, प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी राजस्थानमधील कालबेलिया नृत्यकलाकार गुलाबो सपेरा यांची ओळख करून देणारा लेख लिहिला आहे. प्रा. मंगेश राजाध्यक्ष, रविप्रकाश कुलकर्णी, शरद काळे, ऋचा गोडबोले, अरविंद गोखले, रवि आमले, पंकज भोसले, प्रभाकर (बापू) करंदीकर, अशोक राणे, डॉ. आशुतोष जावडेकर, दिलीप लागू यांसारख्या मान्यवरांचे लेख अंकात वाचायला मिळतील.
यंदाच्या अंकात वसीमबार्री मणेर लिखित ‘तरकारी एक्सप्रेस’आणि मधुकर धर्मापुरीकर यांनी अनुवाद केलेली कथा वाचायला मिळेल. तर कविता विभाग संपादित केला आहे, ज्येष्ठ कवी, समीक्षक, साहित्यिक गणेश विसपुते यांनी. याशिवाय ‘पाकनिर्णय २०२२’ स्पर्धेतील परीक्षकांचे अनुभव आणि १८ उत्तेजनार्थ विजेत्या पाककृती, राशिभविष्य, व्यंगचित्रे आणि विनोदी किस्सेही देण्यात आले आहेत.