kangana

‘दिड्डा: वॉरियर क्वीन काश्मिर’ (Didda -Warrior Queen Kashmir) या पुस्तकाचे लेखक आशिष कौल(Ashish Kaul) यांनी कंगनाविरोधात विश्वासघात, फसवणूक करून कायदेशीर हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

    मुंबई: पुस्तकाचा स्वामित्व हक्क (कॉपीराईट)(Copyright Case) भंग केल्याच्या आरोपाखाली बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत(Kangana Raravat) आणि चित्रपट निर्माते कमल जैन(kamal Jain) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी चित्रपटाच्या निर्मात्यांना १ जुलैपर्यंत अटक करु नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court) पोलिसांना दिले.

    ‘दिड्डा: वॉरियर क्वीन काश्मिर’ (Didda -Warrior Queen Kashmir) या पुस्तकाचे लेखक आशिष कौल(Ashish Kaul) यांनी कंगनाविरोधात विश्वासघात, फसवणूक करून कायदेशीर हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत दंडाधिकारी न्यायालयाने खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले.

    कंगनासोबतच या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक होण्याच्या भितीपोटी जैन यांनी वकील शिरीष गुप्ते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यावर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, जैन यांना खार पोलिसांकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. जैन हे पोलिसांना सदर प्रकरणातील तपासात संपूर्ण सहकार्य करतील अशी हमीही अँड. गुप्ते यांनी खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत खंडपीठाने जैन यांना १ जुलैपर्यत अटकेपासून संरक्षण दिले. तसेच १० आणि ११ जून रोजी खार पोलीस ठण्यात सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत हजर राहण्याचे तसेच जेव्हा पोलीस बोलवतील तेव्हाही हजेरी लावण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली.

    मणिकर्णिका चित्रपटाच्या यशानंतर कंगना रणौतने मणिकर्णिका रिटर्न – द क्विन ऑफ दिड्डा या चित्रपटाची घोषणा केली होती. दिड्डा ही काश्मिरच्या राणीची कथा असून या राणीने जुलमी आणि क्रुर शासक मेहमूद गझनवीचा दोनदा पराभव केला होता. विशेष म्हणजे राणी एका पायाने अधु असूनही त्यांनी हा पराक्रम केला होता.