“कर्मवीरायण” चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च, १७ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या "कर्मवीरायण" चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्सचे पुष्कर मनोहर करत आहेत.

    कर्मवीरायण : समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देण्यात एक अत्यंत महत्वाची भूमिका पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बजावली आहे. अशा या महान विभूतींच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित कर्मवीरायण हा चित्रपट येत्या १७ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.

    ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या “कर्मवीरायण” चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्सचे पुष्कर मनोहर करत आहेत. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. अभिनेते किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, तनया जोशी, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. योगेश कोळी यांनी छायाचित्रण, संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.

    कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांनीही छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपत होस्टेल्स सुरु केली. त्या हॉस्टेल्समध्ये त्यांनी शिक्षण घेऊ इच्छीत असणाऱ्या मुलांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्व जातीधर्मातील मुले एका छताखाली गुण्यागोविंदाने शिकू लागली. उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांपर्यंतच मर्यादित असलेले शिक्षण त्यांनी तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवले. त्यांनी सुरु केलेल्या शाहू बोर्डिंग हाऊसला महात्मा गांधी ह्यांनीही भेट दिली होती. समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देण्यात एक अत्यंत महत्वाची भूमिका कर्मवीर भाऊराव पाटील यांचा थक्क करणारा प्रवास आपल्याला “कर्मवीरायण” या चित्रपटातून पाहता येणार आहे.