कधीकाळी रेल्वे तिकिटासाठी पैसे नसणारा कार्तिक आर्यन आज एका चित्रपटासाठी घेतो ‘इतके’ कोटी

कार्तिक आर्यनने त्याचे ऍक्टर व्हायचे स्वप्न घरच्यांपासून लपवण्यासाठी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. त्याला सुरुवातीपासूनच ऍक्टर व्हायचं स्वप्न असल्यामुळे त्याने कॉलेज पासूनच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती.

    मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आज त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करीत आहे. कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असून त्याच्या अभिनय आणि लुक्सने तो सध्या चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईद बनला आहे. मात्र आज प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या कार्तिक आर्यनचा पदार्पणाच्या काळातील खडतर प्रवास फार कमी लोकांना माहित असेल. आज एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये घेणाऱ्या कार्तिक आर्यनला करिअरच्या सुरुवातीला आर्थिक चणचणीमुळे ऑडिशनला जाण्यासाठी मुंबई लोकल मधून विदाउट तिकीट प्रवास करायला लागायचा. तेव्हा आज कार्तिक आर्यनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पदार्पणाच्या काळातील काही न ऐकलेले किस्से जाणून घेऊयात.

    कार्तिक आर्यनचा जन्म २२ नोव्हेंबर १९९० साली ग्वालियर मध्य प्रदेशात येथे झाला. कार्तिक आर्यनने त्याचे ऍक्टर व्हायचे स्वप्न घरच्यांपासून लपवण्यासाठी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. त्याला सुरुवातीपासूनच ऍक्टर व्हायचं स्वप्न असल्यामुळे त्याने कॉलेज पासूनच मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की आज त्याच्या अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत मात्र एक काळ असा होता, की कार्तिक आर्यन जवळपास १२ लोकांसोबत एका खोलीत रहायचा. तसेच दररोज वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशनदेण्यासाठी नवी मुंबई ते मुंबई असा लोकल ट्रेनने प्रवास करायचा. अनेकदा त्याच्याजवळ तिकिटासाठी पैसे नसायचे तेव्हा तो बिनातिकीट प्रवास करायचा.

    एकदा स्ट्रगलच्या दिवसांमध्ये कार्तिक एका अत्तराच्या जाहिरातीसाठी ऑडिशन द्यायला गेला असताना त्याची ऑडिशन न घेताच त्याला बाहेर हाकलण्यात आले होते. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत असताना आलेल्या प्रसंगांमधून कार्तिक आर्यनने स्वतःला खचून न देता त्याने आणखीन मेहेनत केली. तेव्हा त्याला २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ त्याचा पहिला चित्रपट मिळाला. याचित्रपटानंतर कार्तिक आर्यनने कधीच मागे वळून पहिले नाही. अभिनेत्याचं खरं नाव (Kartik Aaryan real name) कार्तिक आर्यन नसून कार्तिक तिवारी आहे. पण सिनेविश्वात पदार्पण करण्यापूर्वी त्याने स्वतःचं नाव बदललं. कार्तिक आर्यनने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली असून भूल भुलैया २ या सिनेमानंतर प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर बसवले आहे.

    करियरची सुरुवात छोट्या भूमिकेने करणारा कार्तिक आज गडगंज संपत्तीचा मालक आहे. कार्तिक एका सिनेमासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये घेतो. अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. कार्तिकने २०१७ साली BMW कार खरेदी केली होती. कार्तिककडे एक लॅम्बोर्गिनी देखील आहे. या कारची किंमत ४. ५ कोटी रुपये आहे. शिवाय जाहिरातींच्या माध्यमातून देखील कोट्यवधींची कमाई करतो.