शिवरायांच्या रूपात भूषणला मिळाला ड्रीम रोल!

महाराजांची भूमिका हा आपला ड्रीम रोल असून, मोठ्या जबाबदारीनं ही व्यक्तिरेखा साकारण्याचं धाडस करत असल्याचं भूषणनं 'नवराष्ट्र'शी बोलताना सांगितलं.

  कधी चॅाकलेट बॅाय, तर कधी रफ अँड टफ भूमिका साकारणारा भूषण प्रधान महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अवतरणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत भूषण शिवरायांच्या रूपात दिसणार आहे. आजवर बऱ्याच कलाकारांनी शिवरायांची भूमिका साकारण्याचा आपापल्या परीनं प्रयत्न केला आहे. महाराजांची भूमिका हा आपला ड्रीम रोल असून, मोठ्या जबाबदारीनं ही व्यक्तिरेखा साकारण्याचं धाडस करत असल्याचं भूषणनं ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितलं.

  भूषणनं आजवर मालिकांपासून चित्रपटांपर्यंत बऱ्याच विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. यापूर्वी ‘गोंद्या आला रे’ या वेब सिरीजसाठी टक्कल करणारा भूषण दुसऱ्यांदा ऐतिहासिक भूमिका साकारत आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेच्या निमित्तानं शिवराय साकारण्याची संधी मिळाल्याबाबत भूषण म्हणाला की, मला कायम ड्रीम रोलबाबत विचारलं जायचं. या प्रश्नाचं उत्तर मी कधीच दिलं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळावी असं कायम वाटायचं. माध्यम कोणतंही असलं तरी महाराज साकारायचे हे ठरवलं होतं. एक वर्षापूर्वी शिवजयंतीला मी महाराजांचं एक पोस्टर पाहिलं. ते पाहिल्यावर आपण महाराजांच्या रूपात कसे दिसू याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यासाठी माझा एक साईड फोटो त्यात मर्ज करून पाहिला होता. त्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याची संधी मिळायला हवी असं मनात आलं. योगायोगानं वर्षभरानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत महाराज साकारण्याची आॅफर आली. लहानपणी नववीत शिकताना एकांकीकेमध्ये महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर जवळपास दोन दशकांनंतर महाराज साकारत आहे.

  महाराजांच्या भूमिकेच्या निमित्तानं भूषण आठ वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. याबाबत तो म्हणाला की, आतापर्यंत मी मालिकांना नकार देत होतो, कारण यापूर्वी फॅमिली ड्रामा असणाऱ्या दैनंदिन मालिका केल्या होत्या. आठ वर्षांपासून टेलिव्हीजन केलेलं नाही. हिंदी मालिकांसाठीही विचारणा होत होती, पण नकार द्यायचो. कमबॅक करायचा तर काहीतरी चॅलेंजींग असायला हवं असं वाटत होतं. महाराजांचा रोल जेव्हा विचारण्यात आला, तेव्हा त्यापेक्षा मोठं चॅलेंज दुसरं कोणतं असू शकत नसल्याचं जाणवलं. मी खूप आनंदीही आहे आणि थोडा नर्व्हसही आहे. आपल्याला एखादी गोष्ट मिळावी असं वाटतं, पण मिळाल्यानंतर हलकासा नर्व्हसनेस येतो. कारण आपल्याला ते खरं वाटत नसतं. माझी लुक टेस्ट झाली. महाराजांवरील प्रेमाखातर तुम्ही माझे हवे तितके लुक टेस्ट घ्या, पण मी जर योग्य नसेन, तर कोणत्याही क्षणी सांगा मी लगेच बाजूला होईन, असं मी मनोमन ठरवलं होतं. महाराजांच्या लुकमध्ये मी जेव्हा मेकअप रूममधून बाहेर पडलो, तेव्हा टीम मेंबर्सच्या डोळ्यांतील चमक आणि रिस्पेक्ट पाहून आत्मविश्वास वाढला.

  व्याख्यानं, पोवाडे ऐकली…
  शिवरायांच्या भूमिकेसाठी स्वत:ही खूप अभ्यास केला आहे. व्याख्यानं ऐकली, प्रवासात गाणी ऐकणं बंद कून पोवाडे ऐकले. इतिहासाबाबत माहिती असलेल्या मित्रांकडून इनपुट्स घेतले. स्वत:मध्ये कशा प्रकारे बदल करायला हवेत याचा वैयक्तीक पातळीवर रिसर्च केला. प्रोडक्शन हाऊस व वाहिनीनं घेतलेल्या वर्कशॅाप्सचाही फायदा झाला. पहिला दिवस थोडा कठीण गेला, पण दुसऱ्या दिवसापासून दडपण बाजूला ठेवलं. भूमिकेच्या दडपणाखाली राहिलो, तर महाराजांच्या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकणार नसल्याचं जाणवलं. इतक्या वर्षांपासून वाट पहात असलेली संधी क्षणोक्षणी जगायला हवी असं वाटलं. महाराजांचं व्यक्तिमत्त्व जगायला लागल्यापासून ती नजर मिळाली आणि सीन्ससाठीही कॅान्फिडन्स वाढला. आता नक्कीच दिवसेंदिवस भूमिकेच्या जवळ पोहाचतोय.

  महाराजांमुळं माणूस म्हणूनही विकसीत होतोय
  एकंदरीत महाराजांचं व्यक्तिमत्त्व पाहता त्यांचं आपल्यासाठी जे कॅान्ट्र्युब्युशन इतकं मोठं आहे की, आपलं अस्तित्त्वच त्यांच्यामुळेच आहे. आजपर्यंत इतिहास म्हणून ठाऊक होता, पण भूमिका साकारण्यासाठी अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी समजत आहेत. त्यामुळं महाराजांच्या खूप जवळ पोहाचतोय. त्यांना रयतेचा राजा का म्हणायचे, त्यांचं शिलेदारांवर किती प्रेम होतं, त्यांच्याबद्दल किती काळजी होती, त्यांच्याबाबतची इमोशनल बाजू जाणवतेय. महाराजांबाबत खूप काही समजत असल्यानं भूमिका साकारताना कलाकार म्हणून माझा विकास होतच आहे, पण माणूस म्हणूनही मी ग्रो होतोय. महाराज साकारण्याचा अनाहुतपणे खासगी आयुष्यावर परिणाम होत आहे. प्रत्यक्षात आयुष्यात काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होतोय. ही त्या महाराजांची ताकद आहे. महाराज साकारताना स्वत:ला पूर्णपणे विसरून जाणं मला आवडतंय.

  खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय
  मी लगेच होकार दिला नाही. थोडा विचार केला. लगेच जबाबदारीची जाणीव झाली. हे स्वप्नवत असल्यानं नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, पण होकार देताना महाराज साकारताना तयारीसाठी लागणारा वेळ देऊ शकू का? हा स्वत:लाच प्रश्न विचारला. प्रत्येक ट्रॅक प्ले करताना मला स्वत:चा वेगळा अभ्यासही करावा लागणार असल्याची जाणीव होती. जबाबदारी पेलण्यासाठी काय करता येईल याचा पूर्ण विचार करून होकार दिला. स्टार प्रवाहवरील ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत अमोलदादानं (कोल्हे)  साकारलेली शिवरायांची भूमिका खूप भावली होती. आता ही मालिका स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कोणाचं काम पाहणं मी मुद्दाम टाळलं. कारण त्या कलाकारानं आपल्या परीनं महाराजांचा अभ्यास करून भूमिका साकारलेली असेल. आता माझी टीम ज्याप्रमाणं सांगतेय तसे महाराज मी साकारतोय.

  ही राजांच्या शिलेदारांची कहाणी
  या मालिकेतील मला हीच गोष्ट खूप आवडली. महाराजांची गोष्ट आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे, पण खूप कमी चित्रपट आलेत ज्यांनी महाराजांच्या शिलेदारांबाबत सांगितलं आहे. मोजक्या शिलेदारांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे किती शिलेदार होते ते ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेमुळं समजेल. शिवकालीन इतिहास पुढच्या पिढीला समजावा हा हेतू आहेच, पण आज टेक्निकली गोष्टी अॅडव्हान्स होत असल्यानं पुढच्या पिढीचं लक्ष वेधून घेईल अशा पद्धतीनं इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. हे शिवधनुष्य सर्व कलाकारांनी उचलून धरलं आहे. महाराजांप्रमाणेच त्यांच्या शिलेदारांचा इतिहास तळागाळापर्यंत पोहोचवण्याची भावना आहे.