गरीबीतून मार्ग काढत राकेश बनला फिटनेस ट्रेनर, आता टायगर-दिशासोबत सलमानलाही देतोय ट्रेनिंग!

मागील काही वर्षांपासून अत्यंत गरीबीतून मार्ग काढत सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर बनलेल्या राकेशनं आपला इथवरचा प्रवास 'नवराष्ट्र'सोबत शेअर केला.

  रुपेरी पडद्यावर चमचमणारे तारे नेहमीच चित्रपटांमध्ये नेत्रसुखद नृत्यासोबतच धडाकेबाज स्टंटस करताना दिसतात. या स्टंटसमागील खरा हिरो असतो फिटनेस… फिटनेसच्या बळावरच स्टार्स कल्पनेच्या पलिकडले अॅक्शन सीन्स करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात, पण या स्टंटसमागचा बोलविता धनी वेगळाच असतो. तो कधीच कॅमेऱ्यासमोर येत नाही. राकेश यादव हा तरुण फिटनेस ट्रेनर टायगर श्रॅाफ आणि दिशा पटाणी या आजच्या तरुणाईच्या फेव्हरेट जोडीसोबतच सलमान खान आणि कतरीना कैफला मागील काही वर्षांपासून फिटनेसचे धडे देण्याचं काम करत आहे. अत्यंत गरीबीतून मार्ग काढत सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर बनलेल्या राकेशनं आपला इथवरचा प्रवास ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केला.

  इच्छा तेथे मार्ग हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. काहींच्या जीवनाचं मात्र हे सूत्रच बनलं आहे. राकेश यादवबाबत सांगायचं तर एके काळी कमकुवत शरीरयष्टी असल्यानं डॅाक्टरकडे जावं लागणारा हाच तरुण आता स्टार्सना फिटनेसचे धडे देत आहे. या विरोधाभासामागील रहस्य उलगडताना राकेश म्हणाला की, मी लहान असताना आमची घरची परिस्थिती खूप बिकट होती. डॅडी कडीया काम करतात आणि मम्मी गृहिणी आहे. भाऊ-बहिण शिकत आहेत. लहानपणी कधी जेवण मिळायचं, तर कधी मिळत नव्हतं. डॅडी-मम्मींनी बऱ्याचदा स्वत: उपाशी राहून आमचं पालणपोषण केलं आहे. त्यामुळं फिटनेससाठी डाएटचा खर्च उचलण्यासाठी मी स्वत:च ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आता स्वत:चं वन बेडरुमचं घर घेतलं असून, फोर व्हीलर गाडीही आहे. आता मम्मी-डॅडी खूप खुश असून, त्यांना माझा अभिमान वाटतो.

  सेलिब्रिटींशी ओळख होण्याबाबत राकेश म्हणाला की, १३-१४ वर्षांचा असताना जुहू बीचवर माझी टायगरसोबत ओळख झाली. तेव्हापासून आम्ही एकत्रच प्रॅक्टीस करतोय. टागयरकडून मी मार्शल आर्टस आणि जिम्नॅस्टीक करून घेतो. दिशाला मी पाच वर्षांपूर्वी भेटलो. जॅकी चेनसोबत ‘कुंफू योगा’ केला होता तेव्हापासून ती माझ्याकडेच शिकत आहे. त्यानंतर तिनं ‘बागी’सुद्धा केला. ‘सुल्तान’ शूट करताना सलमानसरांसोबत ओळख झाली. जेव्हा त्यांना माझी गरज भासते, तेव्हा बोलावतात आणि माझ्याकडून काही गोष्टी शिकून घेतात. त्यांना किक बॅाक्सिंग शिकवतो. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासाठी कतरीना कैफला अॅक्शन शिकवली. ‘राजी’साठी आलिया भट्टला शिकवलं. ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’साठी विकी कौशलला शिकवलं. याशिवाय प्रियंका चोप्रा आणि हर्षवर्धन राणे यांना फिटनेससाठी ट्रेनिंग दिलं आहे.

  कमकुमत शरीरयष्टीसाठी शिकलो कराटे
  लहान असताना माझी प्रकृती कायम बिघडायची. त्यामुळं याला एक्सरसाईज करायला लावा, असं डॅाक्टरांनी डॅडींना सांगितलं. माझ्या डॅडींना अॅक्शन फिल्म्स खूप आवडतात. एकदा आम्ही दोघे बसून अजय देवगणचा ‘फूल और कांटे’ चित्रपट पहात होतो. अजयच्या एंट्रीचा दोन्ही पाय फ्लीप करून बाईकवरील शॅाट मला खूप आवडला. हे कसं केलं जातं असं मी डॅडींना विचारलं. तेव्हा ते म्हणाले की, जे कराटे शिकतात ते करू शकतात. त्यावेळी मलाही कराटे शिकायचे असल्याचं त्यांना सांगितलं. आठ वर्षांचा असल्यापासून मी कराटे शिकायला सुरुवात केली. मी मूळचा अयोध्येतील असून, मुंबईत गोरेगावला रहातो. तिथे एक नेपाळी टीचर होते. एकीकडे त्यांच्याकडून कराटे शिकलो आणि दुसरीकडे ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं आहे. मी स्वत:चं फिटनेस ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं नाही. केवळ सेलिब्रिटीजनाच पर्सनल ट्रेनिंग देतो. मार्शल आर्टस शिकण्याची मला खूप ओढ होती. जेवण मिळो अगर न मिळो मला फक्त शिकायचं होतं. लहानपणी आम्ही चाळीत रहायचो. आमच्याकडे पैसे नव्हतो. जुहू बीचपर्यंत चालत जायचो आणि चालतच परत यायचो. बीचवर जाऊन बॅक फ्लीप शिकायचो. हळूहळू टायगरची भेट झाली. सलमानसरांना माझ्याबाबत एका मित्रानं सांगितलं. त्यांनी बोलावलं आणि अॅक्शन करायला सांगितलं. त्यांना खूप आवडलं. त्यानंतर सर्व किक्स स्वत:ला शिकवायला सांगितलं. तिथून मी सलमानसरांचा ट्रेनर बनलो.

  मलाही अभिनय करायचाय…
  माझा एक गोल आहे. सेलिब्रिटींसोबत राहून मलाही अभिनयाचे वेध लागले आहेत. आता स्वत:ला मोठ्या पडद्यावर पहायचं स्वप्न आहे. सध्या यासाठी माझं ट्रेनिंग आणि डान्स क्लासेस सुरू आहेत. अॅक्टिंगचं शिक्षण घेतोय. अॅक्शन मला करता येते. यासाठी मला सलमान, टायगर आणि दिशानं प्रोत्साहित केलं आहे. मला अॅक्शन मुव्हीज करायच्या आहेत. वेब सिरीजमध्येही काम करायचं आहे, पण अॅक्शन झोनमध्येच काम करण्याचा विचार आहे. सलमानसरांनीही सोबत काम करण्याचा शब्द दिला आहे. अॅक्टिंग शिकवण्यासाठी टीचर माझ्या घरी येतात. तीन ते चार तास त्यांच्याकडून अभिनयाचं शिक्षण घेतो. याखेरीज कोरिओग्राफर आदिल शेख यांच्याकडून डान्सचे धडे घेतोय. बॅालिवूड डान्स पूर्ण केला आहे. सध्या हिपॅाप शिकतोय.

  कायम नावीन्याच्या शोधात टायगर…
  टायगर खूप मेहनती असून, दररोज ट्रेनिंग करतो. ज्या दिवशी शूट असतं, तेव्हा तो वेळ अॅडजस्ट करून सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येऊन ट्रेनिंग करतो. ट्रेनिंगबाबत तो खूप डिसीप्लीन आहे. त्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. आम्ही जेव्हा ट्रेनिंग करतो, तेव्हा काहीतरी नवीन शोधण्याचा ध्यास त्याला गप्प बसू देत नाही. मार्शल आर्टस, कॅाक स्क्रू, बी ट्वीस्ट, बटरफ्लाय किक, ५४० किक, ७२० किक, ९०० किक, वॅाल ३६० किक हे सर्व मी टायगरला शिकवले आहेत. दिशानं टायगरडून फिटनेसची प्रेरणा घेतली आहे. ती सातत्यानं आणि डेडीकेशननं ट्रेनिंग करते. कायम डाएटवर असते. इतर काही खात नाही. आता ती कोणाच्याही सपोर्टशिवाय बॅक फ्लीप मारते. टोरनॅडो किक, बी ट्वीस्ट आणि ७२० किकसोबतच ती पारकोरचे काही एलिमेंट्सही करते.

  सलमान-कतरीनाचा वक्तशीरपणा
  सलमानसरांना जेव्हा भेटायला गेलो, तेव्हा पाहिलं की ट्रेनर जरी उपस्थित नसला तरी ते स्वत:चे वर्कआऊटस पूर्ण करायचे. ते कोणाची वाट पहात नाहीत. त्यांनी स्वयंशिस्त लावून घेतली आहे. मला आज वर्कआऊट करायचं आहे तर कोणत्याही परिस्थितीत करायचंच आहे. सलमानसरांकडून किक बॅाक्सिंग आणि फ्लेक्सिब्लीटीसाठी स्ट्रेचिंग करून घेतो. सलमानसुद्धा नेहमी नवनवीन गोष्टी शिकत असतात. ‘सुल्तान’च्या गाण्यातील गोल फिरून केलेली डान्सिंग स्टेप त्यांनी स्वत: तयार केली आहे. ही स्पेप त्यांनी आॅन द स्पॅाट केली आणि सर्वांना आवडली. कतरीना वक्तशीरपणासाठी ओळखली जाते. तिलाही सलमानप्रमाणेच ट्रेनिंग दिलं आहे. ‘अॅक्शन जॅक्शन’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अजय देवगणसोबत भेट झाली होती. ज्यांच्यामुळे मी कराटे शिकून आज सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर बनलो त्यांना पाहून भारावून गेलो. तो अनुभव शब्दांत वर्णन करू शकत नाही. मी तिथेही त्यांना काही सांगू शकलो नाही. त्यांना पाहूनच खूप नर्व्हस झालो होतो. मी त्यांच्यासोबत अॅक्शन आणि स्टंट केला.