असं नाटक असतं राजा…

चाळीस एक व्यावसायिक नाटकांचं लेखन, दहा चित्रपटांचं लेखन - पटकथा, पंधरा एक मालिका, चित्रपट असा अनुभव त्यांच्या पोथडीत जमा आहे.

    संजय डहाळे

    नाट्यलेखन करताना प्रामुख्यानं तीन टप्प्यांचा विचार हा करावा लागतो. एक – विषय, दुसरा – कथानक आणि सादरीकरणाचा अंदाज. जर हे तीन टप्पे कुशलतेनं पार पडले, तर चांगली संहिता तयार होण्यास सहाय्य ठरते. यातील एखाद्या जागी जरी गोंधळ उडाला तर ‘नाट्य’ फसण्याचं भय असतं. अगदी मुकनाट्यापासून ते शब्दप्रधान नाट्यापर्यंत नाटककाराला ‘इन अॅक्शन’ राहावं लागतं. संहिता नसेल तर नाट्याचा आविष्कारच अशक्य बनेल. थोडक्यात, नाटककार नाटकाचा बापमाणूसच!
    असेच एक ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर गेली अनेक वर्षे सातत्यानं लेखणी चालवित आहेत. या रंगप्रवासात त्यांनी कुठंही ‘युटर्न’ घेतलेला नाही. गेली दोन वर्षे घराबाहेर पडणं मुश्कील आणि नाट्यगृहांची दारं बंद असली तरीही त्यांनी रसिकांशी, अभ्यासकांशी, विद्यार्थ्यांशी विविध प्रकारे संवाद सुरुच ठेवला आहे. थांबणं हा शब्द त्यांच्यातल्या रंगकर्मीच्या शब्दकोशात जसा नाहीच.
      ‘युटर्न’ हे विक्रमी प्रयोगांचं त्यांचं नाटक. त्यात जोडीदार नसलेल्या वयोवृद्धांच्या जीवनातील एकटेपणा नाट्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण  संहितेतून त्यांनी मांडला होता. त्याचे हजारो प्रयोग झाले. नंतर ‘युटर्न पार्ट २’ देखील रसिकांनी मान्य केला. लेखनासोबतच दिग्दर्शनाची जादूही त्यांनी दाखवून दिली. चाळीस एक व्यावसायिक नाटकांचं लेखन, दहा चित्रपटांचं लेखन – पटकथा, पंधरा एक मालिका, चित्रपट असा अनुभव त्यांच्या पोथडीत जमा आहे.
    म्हसवेकरांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये. ‘यूटर्न’, ‘कथा’, ‘जमलं बुवा एकदाचं’ आणि ‘अचानक’, ‘मदर्स डे’, ‘सगळं काही सुखांसाठी’, ‘रेशीमगाठी’, ‘दूधावरली साय’, ‘फिफ्टी-फिफ्टी’, ‘सासू नंबर वन’, ‘असे नवरे अशा बायका’, ‘तेरा दिवस प्रेमाचे’, ‘सुनेच्या राशीला सासूबाई’, ‘पाहुणे आले पळा पळा’ यांचा समावेश करता येईल. मालिकांच्या लेखनात – ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘चार दिवस सासूचे’, ‘उचापती’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘दोष ना कुणाचा’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘कुरुक्षेत्र’, ‘चिरंजीव सौभाग्य कांक्षीणी’. चित्रपट लेखनात ‘भरत आला परत’, ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘साद’, ‘असा मी काय गुन्हा केला?’,  ‘तृषार्त’ यादी अपूर्ण राहील. हिंदीतही त्यांनी मालिका लेखन केलंय.
     गेली चाळीस एक वर्षाचा नाटक, चित्रपट, मालिका यांच्या लेखनाचा प्रदीर्घ अनुभवाचा फायदा हा नव्या पिढीला व्हावा या प्रामाणिक हेतूने म्हसवेकर यांनी ‘लेखन गुरुकुल’ ही एक संकल्पना तयार केली. वर्षभर चालणाऱ्या आणि पन्नास तासांच्या या अभ्यासक्रमातून अखेरीस आवडीप्रमाणं एक मालिका, चित्रपट किंवा नाटक ही तयार करण्यात आलं. दोन ‘बॅच’ तयार झाले आता तिसरी बॅच ही १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. केवळ भाषणबाजी न करता थेट हाती लेखणी घेऊन नवा आविष्कार घडविण्याचा हा उपक्रम अक्षरशः थक्क करून सोडणारा ठरला. अमेरिकेतील काही नाट्यप्रेमींनीही यात सहभाग घेतला होता. नागपूर, नाशिक, रत्नागिरी, ठाणे, पुणे इथल्या अभ्यासकांनी या ‘गुरुकुल’मध्ये भाग घेऊन स्वतःची संहिता आकाराला आणली. ‘लॉकडाऊन’च्या बंद काळात गेली दोन वर्षे ऑनलाईन संवादातून हा उपक्रम यशस्वी झालाय. त्याबद्दल उत्सुकता वाढतेय.
    केवळ छापील प्रशस्तीपत्र गळ्यात घालून मिरविण्याचे दिवस आता संपले आहेत. स्पर्धेचा जमाना आहे त्याऐवजी ‘तुमच्या हाती काय नेमकं गवसलं आहे!’ हे बघितलं जातं. जर त्यात ‘दम’ असेल तर आणि तरच ग्लॅमरस दुनियेत तुमचं नाणं चालेल. ताठ मानेनं उभं राहाता येईल, हेच या भेटीत जाणवलं.
     संहिता लेखनात आजवर जे प्रयत्न केले, ते कुठेतरी पुढल्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, हा हेतू मनात आहे. नाटक शिकविण्याचं समाधान खूप काही देऊन जातं. नवी उमेद मिळते. नवी नाती जुळली जातात. गुरु-शिष्य परंपरा ही फक्त संगीत, नृत्य या कलेपुरती मर्यादित राहाता कामा नये. संहिता लेखन हे देखील त्याच प्रकारे साकार व्हावं, ही इच्छा व तळमळ आहे, त्यासाठी हा सारा खटाटोप!’ असं ‘गुरुकुल’ संकल्पनेचे सर्वेसर्वा म्हसवेकर यांनी स्पष्ट केलं.
     ‘नाटकाशिवाय दुसरं काय देणार? असं नाटक असतं राजा…’ या ‘नटसम्राट’मधल्या वि. वा. शिरवाडकरांच्या संवादाची आठवण ही या ‘लेखन गुरुकुल’ उपक्रमातून आल्याखेरीज राहात नाही.