रॅाकस्टार रोहित छेडणार ‘सारेगपम’चे सूर, पंचरत्न म्हणून नाव मिळाल्यानंतर असा झाला त्याचा प्रवास!

पुन्हा एकदा 'सारेगमप'च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येण्याचं औचित्य साधत 'नवराष्ट्र'शी गप्पा मारताना रोहितनं आपला १२ वर्षांचा प्रवास उलगडला.

  ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मधील पंचरत्न परतणार असून, नव्या पर्वात ते ज्युरीच्या रूपात दिसणार आहेत. २४ जूनपासून सुरू होणाऱ्या ‘सारेगमप’मध्ये रोहित राऊतसह प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड ही पाचही रत्न पुन्हा एकदा चमकणार आहेत. १२ वर्षांपूर्वी ‘सारेगमप’ संपल्यानंतर पुन्हा याच मंचावर परतण्याच्या काळात रोहित राऊत पार्श्वगायक बनला, ‘इंडियन आयडॅाल’मध्ये गेला आणि संगीतकारही बनला आहे. पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येण्याचं औचित्य साधत ‘नवराष्ट्र’शी गप्पा मारताना रोहितनं आपला १२ वर्षांचा प्रवास उलगडला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rohit Shyam Raut (@rohitshyamraut)

   

  ‘सारेगमप’नंतर सर्वांप्रमाणेच रोहितनंही शालेय शिक्षण सुरू ठेवली. दहावीनंतर ओपन युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं. मुंबईत आल्यानंतर २०१७ पर्यंत सुरेश वाडकरांकडून गायनाचं शिक्षण घेतलं. अजूनही अधूनमधून तो गायनाच्या क्लासेसना जातो. आता पुन्हा ‘सारेगमप’मध्ये परण्याबाबत रोहित म्हणाला की, भीती, नव्हसनेस आणि खूप आनंद अशा संमिश्र भावना मनात आहेत. मंच जरी तोच असला तरी भूमिका वेगळी आहे. त्यामुळं एक छान फिलींग आहे, पण कसं होणार याची भीतीही आहे. आमचं साधं सोपं गणित आहे. आम्हाला यांचे ताई-दादा व्हायला आवडेल. त्यामुळं आम्ही प्रत्येकजण खऱ्या आयुष्यात जसे आहोत तसेच वावरणार आहोत. मुलांना जितकं कम्फर्टेबल करू शकू आणि त्यांना आपलंसं करून घेऊ तितकं ‘सारेगमप’साठी आणि आमच्यासाठी चांगलं होईल. त्यामुळं आमची तयारीही त्याच दिशेनं सुरू आहे. गाण्यांची माहिती आम्हाला आहेच, पण इतरही गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करू.

  पंचरत्न म्हणून नावलौकीक मिळाल्यानंतरच्या प्रवासाबाबत रोहित म्हणाला की, पंचरत्न हा आमच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. त्या व्यतिरीक्त वैयक्तीकरीत्या करियर करायचं हे आमचं लहानपणापासून ठरलेलं होतं. ज्याला ज्या झोनमध्ये करियर करायचंय त्या झोनमध्ये जाऊया. त्यामुळं सोलो काम करतानाचा अनुभव खूप वेगळा होता. प्लेबॅक सिंगर बनण्यासाठी एक वेगळा स्ट्रगल आहे. दररोज रिजेक्शनला सामोरं जावं लागतं. बरीच गाणी गायलो, पण १५० पेक्षा जास्त वेळा रिजेक्टही केलं. तू प्लेबॅक सिंगर होऊ शकत नाही किंवा तू लाइव्ह सिंगरच छान आहेस असं सांगितलं गेलं. त्या सर्व गोष्टींमधून शिकून स्वत:ला पॅालीश केल्यानंतर हळूहळू फिल्म्स मिळू लागल्या. ‘दुनियादारी’साठी प्रथम पार्श्वगायक बनलो. त्यानंतर प्लेबॅक सिंगर म्हणून करियर सुरु झालं, पण संगीतकार होण्याची तळमळ सुरू होती. त्या दृष्टिनं अभ्यास केला. जागतिक संगीत आत्मसात केलं. झी मराठीच्या ‘जागो मोहन प्यारे’, ‘हम तो तेरे आशिक है’ या मालिकांचे टायटल ट्रॅक संगीतबद्ध केल्यानंतर मागच्या वर्षी ‘मोगरा फुलला’ चित्रपटाच्या रूपात संगीतकार म्हणून मोठा ब्रेक मिळाला. ‘इंडियन आयडॅाल’चा अनुभव सुंदर होता. नवीन पद्धतीचं म्युझिक शिकायला मिळालं. मराठीमध्येपेक्षा वेगळ्या पद्धतीची गायकी तिथं आहे. गाण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rohit Shyam Raut (@rohitshyamraut)

   

  ती बातमी शंभर टक्के चुकीची
  रिलेशनशीप हे माझं पर्सनल लाईफ आहे. लोकांना त्याबद्दल काय वाटतं किंवा त्या विषयी काय चर्चा करतात त्याकडं मी लक्ष देत नाही. लवकरच लग्न करणार असल्याची बातमी खोटी आहे. काही लोकांना अशी सवय असते. कदाचित त्यांच्याकडे त्यावेळी बातमी नसेल म्हणून क्रिएट केली गेली असेल. ती बातमी कोणी छापली? का छापली? याचा मला काहीही संदर्भ लागत नाही, पण ती बातमी शंभर टक्के चुकीची आहे. आदर्श मानण्याबाबत सांगायचं तर, मी कोणा एकाला फॅालो करत नाही. प्रत्येक वेळी जेव्हा मी काहीतरी नवीन ऐकतो, तेव्हा त्यांच्याकडून काही ना काहीतरी शिकतो. त्यामुळं माझा एक आदर्श नाही. मला सगळ्या धाटणीचे गायक आवडतात. केवळ क्लासिकल किंवा वेस्टर्न किंवा फिल्मी गायक आवडतात असं नाही. प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळतं. जो कोणी मला त्या दिवशी प्रेरणा देतो तो त्या दिवशी आदर्श असतो.

  हे आजच्या युगातील लिटील चॅम्प्स
  आताच्या मुलांकडून आम्हाला शिकण्यासारखं खूप आहे. आज टेक्नॅालॅाजी बदलली आहे. आजच्या लिटील चॅम्प्समध्ये आणि आमच्या वेळेच्या पर्वामध्ये खूप फरक आहे. आम्हाला जेव्हा गाणी बसवायची किंवा ऐकायची वेळ यायची, तेव्हा आम्ही अॅनालॅाग होतो. आम्ही सीडी प्लेअर किंवा वॅाकमनवरून गाणी ऐकून ती कागदावर उतरवून गायचो. एखादा परफॅार्मंस बघता येत नसायचा. त्यावेळी युट्यूबसारखं माध्यम नव्हतं. अॅनालॅाग टू डिजिटल झालेलं कनव्हर्सेशन आता आहे. आता प्रत्येक मुलाकडं इंटरनेटचा अॅक्सेस आहे. त्यामुळे तो लगेच युट्युब किंवा गुगलवर जाऊन ती गाणी ऐकू शकतो. प्रत्येक कलाकार आपली कला स्वत:च्या शैलीत सादर करत असतो. हा वेगळेपणा आम्हाला ऐकायला मिळत नव्हता. आता एकाच गाण्याचे खूप व्हर्जन्स ऐकायला मिळत असल्यानं मुलं प्रत्येक व्हर्जन ऐकून चांगली गोष्ट आत्मसात करून स्वत:चं एक नवीन व्हर्जन करून आम्हाला ऐकवतात. ही मुलं खूपच तयारीची आहेत. आम्हालाही अपडेट रहायला लागतं. या मुलांना मला इतकंच सांगायचंय की, आता तुम्ही ज्या प्रकारे निरागसतेनं गाताय, जज्ञासू वृत्तीनं अभ्यास करताय ते तसंच राहू दे. तुमच्यातील कुतूहल हरवता कामा नये.

  एलिमिनेशन असेल पण…
  या पर्वात पूर्णत: एलिमिनेशन नसेल असं नाही. स्पर्धा असल्यानं एलिमिनेशन असेल, पण त्याचं स्वरूप थोडं वेगळं असेल. एखाद्या मुलाला सहा विषयांपैकी एका विषयात कमी मार्क्स मिळाले म्हणून त्याला आपण नापास करत नाही. त्याला पुढच्या वर्गात पाठवतो आणि ज्या विषयात तू मागे आहे त्या विषयाचा या वर्षी आणखी चांगला अभ्यास कर असं त्याला सांगतो. अशी संधी यावेळी लिटील चॅम्प्सनाही मिळणार आहे. एखाद्या एपिसोडमध्ये तुमचं गाणं चांगलं झालं नाही किंवा आम्हाला जसं अपेक्षीत आहे तसं झालं नाही, तर दुसरी संधी मिळणार आहे. तुम्ही तुमची चूक सुधारून महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rohit Shyam Raut (@rohitshyamraut)

   

  गाण्यांना संगीत देताना…
  मी दिग्दर्शकांचा संगीतकार आहे. संगीतकार एखादं गाणं जन्माला घालतो. नकळत आपण त्या गाण्याच्या प्रेमात पडतो. त्या आपल्या अपत्याला कुणी वाईट म्हटलं तर ते पटत नाही. त्यामुळं त्या प्रोजेक्टपुरता मी आणि दिग्दर्शक वैचारीक पातळीवर एकमेकांशी जोडले जातो. त्यानंतर आम्ही दोघं मिळून जे काही जन्माला घालतो ते लोकांना आवडलं पाहिजे याची काळजी घेतो. दिग्दर्शकानं सिच्युएशन सांगितल्यानंतर मला जे इमॅजीन झालं तसं मी गाणं बनवणार आणि ते जर दिग्दर्शकाला आवडलं नाही, तर आमची गट्टी जमू शकणार नाही. त्यामुळं प्रत्येक वेळी दिग्दर्शकासोबत बसून चर्चा करतो. त्यांना आॅनस्क्रीन काय दाखवायचंय ते जाणून घेतो. त्यानंतर संगीत देतो. मला सर्वच पद्धतीची गाणी करायला आवडतात. हिंदीत म्युझिक डायरेक्टर म्हणून संधी मिळायला अद्याप वेळ आहे. मराठीप्रमाणं हिंदीतही गायक म्हणून स्वत:ला सिद्ध करायचंय. ‘इंडियन आयडॅाल’मधील जजेससोबत काम करण्याची संधी मिळत आहे. पाहूया ती गाणी कधी रिलीज होतात.