अभिनेता होण्यासाठी स्पॅाटबॅाय बनलेल्या दिग्दर्शक जागेश्वरचा ‘ढ’!

जागेश्वर ढोबळेचा 'ढ' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे औचित्य साधत जागेश्वरनं सिनेसृष्टीतील प्रवास 'नवराष्ट्र'सोबत शेअर केला.

  सिनेसृष्टीचं आकर्षण भल्याभल्यांना मुंबईत घेऊन येतं, पण इथलं वास्तव खूप वेगळं आहे. गॅाडफादर नसेल, तर स्ट्रगलशिवाय काही मिळत नाही. त्यामुळंच अॅक्टर बनण्यासाठी येणाऱ्या असंख्य कलाकारांना स्पॅाटबॅायसारखं काम करून स्वत:चा मार्ग शोधावा लागतो. त्यातूनच पुढे अॅक्टर, दिग्दर्शक, कॅमेरामन, एडिटर घडतात, जे सिनेसृष्टीच्या जडणघडणीतही मोलाचं योगदान देतात. जागेश्वर ढोबळे हे नाव आज मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही ओळखलं जाऊ लागलं आहे. ‘सूरज पे मंगल भारी’, ‘मॅडम चिफमिनीस्टर’, ‘सायना’ या हिंदी चित्रपटांचं मेकिंग करणाऱ्या जागेश्वरनं स्पॅाटबॅायपासून आपला प्रवास सुरू केला. आता त्यानं दिग्दर्शित केलेला ‘ढ’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे औचित्य साधत जागेश्वरनं सिनेसृष्टीतील प्रवास ‘नवराष्ट्र’सोबत शेअर केला.

  कहानी बिल्कुल फिल्मी है… असं जागेश्वरच्या बाबतीत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. घरातून न सांगता मुंबईत येणं, फुटपाथवर रहाणं, प्रचंड स्ट्रगल केल्यानंतर प्रथम स्पॅाटबॅाय आणि नंतर दिग्दर्शक बनणं हे एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणं आहे. जागेश्वर याबाबत म्हणाला की, नागपूरमध्ये आमचं छोटं किराणा स्टोअर आहे. दोन महिन्यांपूर्वीच कोरोनामुळं बाबा गेले. आता आईच स्टोअर चालवते. कुटुंबात मला सर्वांनीच सपोर्ट केला. कोणत्याही गोष्टीसाठी अडवलं नाही की फोर्स केला नाही. खरं तर मी २००९मध्ये मुंबईत आलो तो अॅक्टर बनण्यासाठी, पण इथलं वास्तव खूप वेगळं आहे. इथं आल्यावरच त्याची जाणीव होते. घरी बसून आपल्याला चित्र वेगळं दिसत असतं. सर्व सोपं वाटतं, पण तसं नाही. चित्रकलेत रुची असल्यानं अॅनिमेशन करायचा विचार होता, पण आर्थिक गणितांमुळं राहून गेलं. खरं तर माझं सिनेसृष्टीत येणं खूप फिल्मी आहे. सिनेमात काम करण्यासाठी मला मुंबईत येऊन थिएटर करायचं होतं. त्या दरम्यान नागपूरमधील आमच्याच ग्रुपमधील एक मित्र फेअरवेल पार्टी देऊन मुंबईत अॅक्टर बनण्यासाठी आला होता, पण एक-दोन आठवड्यांनी तो परत आला. त्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की याचे नातेवाईक इंडस्ट्रीत असून हा परत आला मग आपलं तर तिथे कोणीच नाही. राहण्याचीही सोय नाही. इतकं होऊनही मी मुंबईला यायचा विचार बदलला नाही. फक्त कोणालाही सांगायचं नाही असं ठरवलं. मित्रांसोबत बाहेर चाललोय असं घरी सांगून थेट मुंबई गाठली.

  मुंबईत आल्यावर पहिला दिवस जागेश्वरसाठी खूपच खडतर होता. मनातील हाती आमदाराचं पत्र, पण मनातील भीतीमुळं त्याला फुटपाथवरच रहावं लागलं. याबाबत तो म्हणाला की, नागपूरातील माझ्या गुरू मनोरमा दाते ज्यांना आम्ही आत्याबाई म्हणायचो त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात राहण्यासाठी आमदारांचं पत्र मिळवून दिलं होतं. तिथेही एक दिवस अगोदरच पोहोचल्यानं मनात भीती होती आणि पूर्ण दिवस पावसातच मंत्रालयाच्या फुटपाथवरच काढला. गायक-संगीतकार-लेखक अभिजितदादांनी (अभिजित जोशी)खूप मदत केली आहे. मी दहावीत असताना मुंबईत यायचं असल्याचं अभिजितदादांना सांगितलं होतं, पण प्रथम शिक्षणावर लक्ष केंद्रित कर आणि मग मुंबईला ये असं ते म्हणाले होते. त्यानंतर बारावी झाल्यावर लगेच मुंबईला आलो. दिग्दर्शक जय तारी यांच्या दत्तगुरूंवरील मालिकेसाठी पायलट एपिसोड शूट केले जाणार होते. त्याचं लेखन अभिजितदादा करत होते. त्यामध्ये मी स्पॅाटबॅाय म्हणून काम केलं आणि चित्रपटसृष्टीत माझी एंट्री झाली.

  ‘हरि ओम विठ्ठला’नं केला श्रीगणेशा
  अभिजितदादांसोब मी खूप काम केलं आहे. त्यांच्याच ‘हरि ओम विठ्ठला’ या प्रोजेक्टसाठी असिस्ट करत स्वत:ला सिद्ध करत दिग्दर्शन क्षेत्रातील श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. ‘ऐसा भी यदा कदाचित’ हे नाटक करताना महाबळेश्वर नार्वेकर, विविध कोरगावकर आणि आशिष तेलावणे हे ठाण्यातील काही मित्र भेटले. त्यानंतर महाबळेश्वरसोबत वरळीतील रहेजा इन्स्टिट्यूटला अॅडमिशन घेऊन डिप्लोमा केला. पुढे ओळखी वाढत गेल्या आणि शॅार्टफिल्म्सकडे वळलो. ‘मंथन’, ‘तिच’ अशा जवळपास ५० शॅार्टफिल्म्स आणि १५०च्या आसपास व्हिडीओ साँग्ज केली आहेत. यात काहींसाठी सिनेमॅटोग्राफी केली, तर काहीचं एडिटींग केलं आहे. एडिटर म्हणून ‘वंटास’, ‘रघुवीर’, ‘पैदागीर’, ‘रेशटीप’, ‘ढ’ या चित्रपटांचं एडिटींग केलं आहे. काही जाहिराती केल्या. एनजीओंसाठी छोट्या फिल्म्स केल्या.

  हिंदी चित्रपटांचं मेकिंग
  मजल दरमजल करत स्वत:ला सिद्ध करत राहिलो आणि न थांबता एक एक टप्पा पार करत पुढे जात राहिलो. याच वाटेवर मला दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली आणि दिग्दर्शक म्हणून ‘रेश्टीप’ या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. आता अभिजितदादांची निर्मिती असलेल्या ‘ढ’ या आगामी चित्रपटामुळे दुसऱ्यांना दिग्दर्शनाची संधी मिळाली. दादांप्रमाणेच प्रथमेश रांगोळे या सिनेमॅटोग्राफर मित्रानंही मला खूप मदत केली आहे. मागील पाच वर्षांपासून त्याच्याच घरी राहतोय. याच्यासोबत मी बऱ्याच बिहाईंड द सीन्स आणि मेकिंगचं काम केलं आहे. ‘आम्ही दोघी’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’, ‘ठाकरे’, ‘गर्ल्स’, ‘बॅाईज २’ या मराठी चित्रपटांसोबतच ‘सूरज पे मंगल भारी’, ‘मॅडम चिफमिनीस्टर’, ‘सायना’ या हिंदी चित्रपटांचं मेकिंग केलं आहे.

  ‘ढ’मध्ये नेमकं काय आहे?
  आपण कोणालाही ‘ढ’ म्हणून चिडवतो किंवा एखाद्याला कमी लेखतो, पण दुसऱ्याला कमी लेखताना आपण स्वत: कधी ढ बनतो ते समजत नाही. कारण आपलं लक्ष त्याला हरवण्यावर केंद्रित करतो. त्यात आपली प्रगती विसरतो. दुसऱ्याला कमी लेखण्याच्या प्रयत्नात स्वत:लाच कुठेतरी हरवून बसतो. अशा बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या शर्यतीत ज्याला आपण हरवण्याचा प्रयत्न करतो तोच जिंकतो. या चित्रपटात प्रत्येकजण ‘ढ’ आहे. यातील सर्व कॅऱेक्टर्स एका पॅाइंटला ‘ढ’ ठरतात. सिनेमाची संकल्पना माझी असून, अभिजितदादांनी कथाविस्तार केला. या चित्रपटात अतुल महाले, मुकुंद वसूले, संजय कुलकर्णी, पूर्णिमा अहिरे, वैशाली पाटेकर, चित्रा देशमुख आदी कलाकार आहेत. ८० टक्के काम पूर्ण झालं असून, २० टक्के बाकी आहे. शूट, डबिंग, बॅग्राऊंड, फॅाली, डीआयसुद्धा झालं आहे. मिक्सिंग आणि इतर काही लहानसहान कामं राहिली आहेत. ते झाल्यावर रिलीजची तारीख ठरेल. संगीत अभिजितदादांनीच दिलं आहे. विषयाला धरून गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रपटाशी लोकं कुठेतरी स्वत:ला रिलेट करतील. यातील बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना आपल्यासोबत घडल्याच्या जाणवतील.