snehlata vasaikar

'नवराष्ट्र'शी खास बातचित करताना स्नेहलतानं मालिकेसोबतच आपल्या आजवरच्या प्रवासाबाबतही सांगितलं.

  पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही ऐतिहासिक मालिका घरोघरी लोकप्रिय झाली आहे. सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या या मालिकेतील गौतमाबाईंची व्यक्तिरेखा रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. आजवर बऱ्याच मालिका, एकांकीकांसोबतच ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात काम केलेली स्नेहलता वसईकर या मालिकेत गौतमाबाई साकारत आहे. ‘नवराष्ट्र’शी खास बातचित करताना स्नेहलतानं मालिकेसोबतच आपल्या आजवरच्या प्रवासाबाबतही सांगितलं.

  स्नेहलतानं यापूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत सोयराबाई साकारली आहे. ‘या गोजीरवाण्या घरात’, ‘कुंकू’, ‘फुबाईफू’, ‘एकापेक्षा एक’ या मराठी मालिकांसोबतच ‘गोची प्रेमाची’, ‘राजा शिव’ ही नाटकं केली आहेत. कॅालेजमधून खूप एकांकीका केल्या आहेत. टेलिफोन अॅापरेटर, कार्टुनिस्ट, शिक्षिकेपासून अभिनयापर्यंतचा स्नेहलताचा प्रवास प्रेरणादायी आहे. याबाबत ती म्हणाली की, माझे बाबा अरुण तावडे महाराष्ट्र टाईम्समध्ये कामाला असल्यानं अकरावीमध्ये शिकताना त्यांनी मला तिथे टेलिफोन आॅपरेटर म्हणून कामाला लावलं. बालपणापासून चित्रकलेची आवड असल्यानं कार्टुन्स काढण्याचा छंद जडला. चित्रकलेचा वारसा मामाकडून लाभला. दहावीला असताना एक नर्सरी पेंट करून दिली होती. त्यातून झालेल्या कमाईतून क्लासेससची फी भरली. दहावीत असताना नापास झालेल्या मुलांचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन गणित शिकवायचे. ते पैसे इतर शिक्षणासाठी खर्च करायचे. बालनाट्यात काम करायचे. अँकर बेस शो करायचे. नोकरी करताना ‘बेधुंद’ चित्रपटासाठी फोन आला. खरं तर नोकरीमुळं सिनेमा करणं शक्य नव्हतं. त्यामुळं मी मैत्रिणीला आॅडीशनसाठी घेऊन गेले होते. तिथे गेल्यावर दिग्दर्शक ज्ञानेश भालेकरांनी मला सहज आॅडीशन द्यायला सांगितलं आणि सिलेक्ट झाले. त्यानंतर अभिनयातच रमले.

  गौतमाबाई साकारण्याबाबत स्नेहलता म्हणाली की, मी साकारत असलेल्या गौतमाबाईंबाबत फारशी माहिती लिखाणात नाही. मल्हाररावांसोबत त्यांनीही अहिल्यादेवींना घडवण्यात मदत केली, पण त्यांची पद्धत भिन्न दृष्टिकोनातून होती. अहिल्यादेवींनाना घडवण्याबाबत दोघांचे व्ह्यूज फार वेगळे होते. मल्हाररावांचा दृष्टिकोन खूप वाईड होता. ते दूरदृष्टी ठेवून निर्णय घ्यायचे. गौतमाबाई लोकांना निगेटीव्ह वाटण्याची भीती होती. कारण त्या काळी कुटुंबाला सुखी ठेवत कुटुंबाशी निगडीत असलेल्या गोष्टी स्त्रियांना कराव्या लागायच्या. त्या अनुषंगानं गौतमाबाईंनीही आपल्या सुनेला घडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच्या सासूला आजच्या आईशी रिलेट केलं तर ती चपखलपणे त्या कॅरेक्टरमध्ये बसते. आजची स्त्रीसुद्धा अशीच आहे. तू बाहेरचं जग कितीही फिरलीस तरी घरातल्या गोष्टी यायलाच हव्यात. याच जडणघडणीतून अहिल्यादेवींकडे मां अहिल्या देवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, देवी अहिल्याबाई या रूपात पाहिलं जातं. कारण देवी किंवा आई सर्वगुणसंपन्न असते. आईला सर्व माहित असतं. तिला खाण्या-पिण्याच्या गोष्टींपासून हिशोब ठेवण्यापर्यंतचं सर्व काम करावी लागतात. गौतमाबाईंचं अहिल्याला सर्वांगानं घडवायचं असतं म्हणून त्या कायम तिची परीक्षा घेत असतात.

  थोड्याशा खाष्ट आणि शिस्तप्रिय
  अहिल्याबाई कशा घडल्या हे दाखवताना खाष्ट आणि शिस्तप्रिय सासू दाखवण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. याचवेळीs-त्या आपल्या सुनेला सर्व गोष्टी समजतायत. त्यातून ती बोध घेतेय, शिकतेय हे समजल्यावर तिचं कौतुक करण्याचं कामही त्या करताहेत. या कॅरेक्टरला अशा वेगवेगळ्या शेड्स आहेत. त्या जितक्या कणखर आहे तितक्याच मृदू स्वभावाच्याही आहेत. अहिल्या अचानक घरातून जाते आणि जेव्हा परत सापडते तेव्हा त्या तिच्यासमोर धाय मोकलून रडतातही. अशा बऱ्याच छटा या कॅरेक्टरला आहेत. या सादर करायला मजा येत आहे. हिस्टॅारीकल कॅरेक्टर करण्यात हीच गंमत असते. अशा कॅरेक्टर्समध्ये कलाकाराला त्या व्यक्तीचे सर्व पैलू दाखवता येतात. याच कारणामुळं मी ही दुसरी ऐतिहासिक मालिका करत आहे.

  प्रत्येक आईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या

  एखाद्या लहान बाळाला आपली आई थोडी खाष्ट, थोडी वेडी, काही गोष्टी न समजणारी अशी वाटते, पण आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जिला न बोलता आपल्या बाळाच्या मनातील गोष्टी समजत असतात. ती आपली दूरदृष्टी दाखवत नाही, पण आपल्या कर्तव्यातून सिद्ध करत असते. त्यामुळेच मी गौतमाबाईंच्या माध्यमातून सर्व आईंचं प्रतिनिधीत्व करतेय असं म्हणेन. काही दृश्यांमध्ये गौतमाबाई अहिल्याला ओरडतात आणि नंतर तिचं कौतुकही करतात, तेव्हा काही मुलांना त्या आपल्या आईसारख्या वाटतात अशा मला प्रतिक्रिया आल्या आहेत. गौतमाबाई सेम तुझ्यासारख्याच आहेत हे सांगणाऱ्या प्रतिक्रीया काही आईंनी दिल्या आहेत. आपल्या मुलांवरील प्रेम आणि त्यांच्या भल्यासाठी करण्याची वृत्ती दाखवण्याचा प्रयत्न मी गौतमाबाईंच्या माध्यमातून करत असून, योग्य पद्धतीनं रसिकांपर्यंत पोहोचत असल्याचं समाधान आहे.

  सच्चेपणामुळं त्या रसिकांपर्यंत पोहोचतायत
  मी कधीच कोणतंही कॅरेक्टर साकारण्यापूर्वी रिसर्च करत नाही. कारण कोणत्याही कॅरेक्टरची स्वभाव वैशिष्ट्ये ते लिखाणात येतं तेव्हा बांधले जातात. ते वास्तववादी की काल्पनिक आहे इतकंच सांगितलं जातं. गौतमाबाईंचं कॅरेक्टर साकारताना ते खरं असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यामुळं मी पूर्णपणे यात माझा सोल टाकण्याचा प्रयत्न केला. याच कारणामुळं तुम्ही खरोखर रडताय असं वाटतं, तुमच्या हसण्यात खोटेपणा जाणवत नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रीया येतात. ही व्यक्तिरेखा साकारत असतानाचा प्रत्येक क्षण मी जगत असल्यानं त्यातील खरेपणा लोकांपर्यंत पोहोचत आहे. याच कारणामुळं एखादा भावनिक सीन परफॅार्म केल्यानंतर मला त्यातून बाहेर यायलाही वेळ लागतो. शेकडो वर्षांपूर्वी हे खरंच घडलेलं असून हे सर्व लोकांपर्यंत पोहाचवायचं असल्यानं मला खोटंखोटं करून चालणार नाही याची जाणीव असते.

  अदितीकडे ते उपजत आहे
  अहिल्यादेवी वन मॅन आर्मी होत्या. त्यांनी सर्वांना एकत्र आणून वैचारीक क्रांती घडवली. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी शेतकऱ्यांना बियाणं पुरवली. त्यांना झाडं लावायला सांगितली. त्यातील अर्ध तुमच्याकडे ठेवा आणि अर्ध सरकारला द्यायला सांगितलं. ही विचारसरणी तेव्हाची आहे. अहिल्यादेवींना दरबारातही जायचंय, शिक्षणही घ्यायचंय, स्वयंपाकघरही सांभाळायचंय. हा अहिल्यादेवींचा मल्टिटास्कींगपणा या मालिकेत पहायला मिळत आहे. आजची मल्टिटास्कींग स्त्री सर्वांमध्ये स्वत:चा सोल अॅड करत असल्यान स्ट्राँग असल्याचं अहिल्यादेवींकडून शिकायला मिळत आहे. अहिल्याची भूमिका साकारणाऱ्या अदिती जलतरेसोबतच मल्हाररावांच्या भूमिकेतील राजेश श्रृंगारपुरेंचंही कौतुक होत आहे. राजेशसर नेहमी अदितीला समजावून सांगतात. खरं तर आदितीमध्ये हे गुण उपजत आहेत. आपल्यामध्ये अभिनयाचे जन्मजात गुण असल्याचं माहित असूनही अदितीला त्याचा गर्व नाही. ज्या पद्धतीनं ती परफॅार्म करते ते खूप वर्क होतंय. एखाद्या नॅार्मल सीनमध्ये ती जरी शिंकली तरी काय गोड परफॅार्म करून गेली ही मुलगी असं वाटतं. याच वेळी ती खूप मेहनतही घेत आहे. काही गोष्टी सांगितल्या तर ती लगेच समजते.