एकच डाव नाटकाचा? लॉकडाऊन नंतर १ प्रयोग झाला आणि पुन्हा नाटक थांबलं!

  ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे’ ही नेहमीच ऐकत आलेली म्हण आज मराठी रंगभूमीलाही लागू पडते. रंगभूमीनं आजवर अनेकांना रोजगार दिला, असंख्य संसार उभे केले, अनेकांना घडवलं, पालणपोषण केलं, पण कोरोनामुळं मार्च २०२०पासून नाट्यसृष्टीवर अवकळा पसरली आहे. लॉकडाऊन… लॉकडाऊन… आणि पुन्हा लॉकडाऊन… यामुळं आज रंगभूमीशी निगडीत असलेले हजारो बॅक स्टेज आर्टिस्ट देशोधडीला लागले आहेत. अनेक जण गावी गेले ते तिथेच राहिले. काहींनी जगाचा निरोप घेतला, तर काहींनी पोटाची खळगी भरण्याकरीता मिळेल ते काम करत दिवस ढकलले ते केवळ एकाच आशेवर… पुन्हा नाटक सुरू होईल आणि आपल्याला काम मिळेल, पण झालं मात्र उलटंच. लॉकडाऊननंतर पुन्हा नाटयगृहं उघडली, पण नाटकाचा केवळ एकच डाव रंगला आणि पडदा पडला…

  ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये रविवार, २७ जून रोजी दुपारी ४:३० वाजता ‘स्त्री’ नाटकाचा शो मोठया उत्साहात पार पडला. नाट्यरसिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानं निर्मात्यांसह कलाकार-तंत्रज्ञांनाही दिलासा मिळाला आणि नाट्यकर्मींना एक आशेचा किरण दिसू लागला, पण आले सरकारच्या मना… या सद्य परिस्थितीनुसार या नाटकाचा एकच डाव रंगला. रंगभूमीला निर्बंधांचं ग्रहण लागल्यानं नाट्यगृहांना पुन्हा टाळं लागलं. पहिल्या लॅाकडाऊननंतर रंगभूमीवर आलेल्या ‘स्त्री’ या नाटकानं दुसऱ्या लॅाकाडाऊनपूर्वी २१ प्रयोग केले होते. ९ जानेवारीला श्रीगणेशा केलेल्या या नाटकाचा रविवारी २२वा प्रयोग सादर झाला. ५० टक्के क्षमतेसह नाट्यप्रयोग करण्याचा नियमाचं पालन करीत ४० टक्के रसिकांनी हा प्रयोग पाहिला. यामुळं मागील बऱ्याच दिवसांपासून रंगभूमीची सेवा करण्यासाठी तळमळणाऱ्या हातांना काम मिळालं आणि पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी नाटकातून झालेल्या कमाईमुळं त्यांना मन:शांती लाभली. नियतीला मात्र नाट्यकर्मींचा हा आनंद पहावला नाही आणि एकाच खेळावर नाटकाचा खेळ थांबला आहे.

  ‘हरी आला दारी’, ‘आली अंगावर’, ‘या घर आपलंच आहे’, ‘नो एंट्री’, ‘शिर्डीत आले साईनाथ’, ‘ताईच्या लग्नाला यायचं’ या नाटकानंतर ऋषिकेश घोसाळकर यांनी ‘स्त्री’ या नाटकाची निर्मिती-दिग्दर्शन केलं आहे. मध्यंतरीच्या काळात सात वर्षे घोसाळकरांनी बालरंगभूमीवर विविध बालनाट्यांचे जवळपास ९०० प्रयोग केले आहेत. मागच्या वर्षी लॅाकडाऊन लागल्यानंतरही हार न मानता ‘स्त्री’च्या रूपात त्यांनी नवं कोरं नाटक रंगभूमीवर आणलं. दुसऱ्या लॅाकडाऊनपूर्वी दीड महिन्यात या नाटकानं २१ प्रयोग केले. नवोदित कलाकार आणि ‘ए’ सर्टिफिकेट असूनही सशक्त संदेश देणाऱ्या ‘स्त्री’नं रसिकांचं मनोरंजन करत कौतुकाची थापही मिळवली. ‘स्त्री’चं मॅनेजमेंट पाहणाऱ्या गोट्या सावंत आणि शेखर दाते यांनी आॅगस्टपर्यंतचं प्लॅनिंग करत सुरुवातीला ठाण्यासह वाशी आणि कल्याणमधील नाटयगृहांमध्ये प्रयोग करण्याची योजना आखली. २२व्या प्रयोगाला रसिकांनी गर्दी केली, पण निर्बंधांमुळं हे नाटक थांबवावं लागत असून, यामुळं केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिकही धक्का सहन करावा लागल्याचं मत घोसाळकर यांनी ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना व्यक्त केलं.

  पावणे दोन लाख रुपयांचा फटका
  ‘स्त्री’च्या रविवारच्या शोला ४२,००० रुपयांचं बुकींग मिळालं. अतिशय वाईट परिस्थिती असताना पहिला लॅाकडाऊन ओपन झाल्यावर आम्ही तालिमी केल्या आणि नाटक रंगभूमीवर आणलं. २१ प्रयोगांनंतर पुन्हा लॅाकडाऊन लागला. सरकारनं सांगितल्यानंतर पुन्हा १५ दिवस तालिम करून रसिकांच्या सेवेत रुजू झालो, पण आता आलेल्या निर्बंधांनुसार प्रयोग थांबल्यानं निराशा झाली आहे. जिथून आम्ही ब्रेक घेतला होता, तिथून पुन्हा सुरू करू या आशेनं जुळवाजुळव केली होती, पण पुन्हा बंदी आणल्यानं खूप नुकसान झालं आहे. सरकारनं संमती दिलेल्या किमान सहा नाट्यगृहांमध्ये प्रयोग करून आलेली मरगळ झटकून टाकण्याचा विचार होता, पण त्यावरही विरजण पडलं. ४ जूनला वाशीला प्रयोग करणार होतो. पुन्हा नाटक सुरू करताना तालिमीपासून जाहिरातीपर्यंत जवळपास पावणे दोन लाख रुपयांचा खर्च केला. रसिकांचं लक्ष वेधून घेण्याकरीता आठ दिवसांपूर्वीपासून नेहमीपेक्षा मोठ्या जाहिराती केल्या. याद्वारे रसिकांना आमंत्रित केलं. दूरदृष्टी ठेवून जाहिरातबाजी केली. एका प्रयोगानंतर नाट्यगृहं बंद होणार असल्याचं ठाऊक असतं तर प्रयोगच केला नसता.

  सरकारची धरसोड वृत्ती चुकीची
  २७ तारखेला एक प्रयोग झाला. त्यातून थोडंफार का होईना उत्पन्न झाल्यानं २० लोकांच्या टीमला काहीतरी मानधन मिळालं. निर्मात्याला फायदा सोडून द्या, पण रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं, नाट्यकर्मींच्या मनात आशा निर्माण झाली होती. नाट्यगृहं सुरू झाली आहेत हे किमान रसिकांना माहित तरी व्हायला हवं. हे सरकार आपल्या निर्णयावर ठाम रहात नसल्यानं सरकारवर आमची नाराजी आहे. १५ दिवसांनी जर नाट्यगृहं बंदच करायची होती, तर ओपन का केली? हा सरकारला सवाल आहे. घोषणा करण्यापूर्वी आढावा घ्यायला हवा होता. यामुळंच कदाचित काही मोठ्या जाणकार निर्मात्यांनी थांबण्याचाच निर्णय घेतला असावा. नाटक पाहणारा वर्ग स्टँडर्ड असतो. असं असूनही इथंच पहिला घाव का घातला जातो हे समजत नाही. आम्ही सरकारवर विश्वास ठेवून नाटकाची तयारी केली. नाट्यसृष्टीतील बऱ्याच लोकांनी सध्या नाटक करू नका असं सांगितलं, पण मला संधी दिसली आणि पुन्हा धाडस दाखवत नाटक ओपन केलं.

  निर्माता संघाचा अजब कारभार
  मराठी नाट्य निर्माता संघ सदस्यांनी काहीच कळवायची तसदी घेत नाही. कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. नाट्यसृष्टी कोणत्या दिशेनं चाललीय, सरकारशी काय बोलणी झाली, कोणत्या मागण्या केल्या याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. २० दिवसांपूर्वी संघाच्या ग्रुपवर मी एक पोस्ट टाकली की, आपण काय करतोय? निर्माते कुठल्या परिस्थितीत आहेत? आपली कमिटी स्थापन होऊन वर्ष उलटून गेलं तरी ग्रुपवर केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा श्रद्धांजली वाहण्याचं काम सुरू आहे. हा व्यावसायिक संघ असल्यानं इथं फक्त नाटकाविषयी चर्चा व्हायला हवी. एखाद्या निर्मात्याला काही अडचण आहे का? कोणाला काही मदत करता येईल का? या प्रश्नांसोबतच नाटकाशी संबंधित गोष्टींची चर्चा इथं होणं अपेक्षित आहे. त्यावर दोन दिवसांमध्ये झूम मिटिंग घेण्याचं आश्वासन अध्यक्षांनी दिलं, पण मिटिंग झाली नाही. नंतर अचानक फोन आला की, आपण रंगमंच कामगारांना सपोर्ट केल्यानं नाटक करू नका. इतका खर्च आणि तालिमी केल्यानंतर थांबू शकणार नसल्याचं मी त्यांना स्पष्ट सांगितलं.

  स्त्रीप्रधान दोन अंकी नाटक
  या स्त्रीप्रधान नाटकातील नायिकेचा नवरा प्रोफेसर आहे. नवऱ्याचा पगार नियमित नसल्यानं घरासाठी झटणारी नायिका नवऱ्याला रिक्वेस्ट करते की, मी सुशिक्षीत असल्यानं मला नोकरी करू द्या. नवऱ्याचा इगो आड येत असल्यानं तो तिला नोकरी करू देत नसतो. अशा वेळी एक घरंदाज स्त्री एका बेसावध क्षणी कशा प्रकारे एका जाळ्यात अडकते त्याची कहाणी ‘स्त्री’ नाटकात आहे. हर्षा बनतोडे लिखीत या नाटकात दिपश्री कवळे, उदय पाटकर, हिमांगी सुर्वे, प्रितुल पवार, संदेश अहिरे, प्रियांका कासले, विलक्षणा मोरे, उमेश देसाई यांच्या भूमिका आहेत.