क्रिकेटर-गायक समीर सांगतोय सौंदर्याची नवी व्याख्या!

'सौंदर्या मनामध्ये भरली' या मालिकेनं क्रिकेटपासून दुरावल्यानंतर अभिनयाकडे वळलेल्या समीरचं पुन्हा क्रिकेटशी नातं जोडलं आहे. हे कसं ते समीरनं 'नवराष्ट्र'शी बोलताना सांगितलं.

  छोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिका आपापल्या परीनं रसिकांचं मनोरंजन करत आहेत. यात कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेनं सौंदर्याचं नवं समीकरण मांडत रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा समीर परांजपे मूळात उत्तम क्रिकेटर असून, क्लासिकल गायकही आहे. ‘सौंदर्या मनामध्ये भरली’ या मालिकेनं क्रिकेटपासून दुरावल्यानंतर अभिनयाकडे वळलेल्या समीरचं पुन्हा क्रिकेटशी नातं जोडलं आहे. हे कसं ते समीरनं ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितलं.

  लहानसहान भूमिका साकारल्यानंतर मुख्य भूमिकेत ब्रेक मिळण्याबाबत समीर म्हणाला की, कॅालेजनंतर लगेच मला ‘भेजा फ्राय’ फेम सागर बल्लारी निर्मित ‘भातुकली’ या मराठी सिनेमात ब्रेक मिळाला. त्यानंतर काही मालिकांमध्ये लहानसहान भूमिका साकारल्या. २०१६ मध्ये स्टार प्रवाहवरील ‘गोठ’नं मुख्य भूमिकेत संधी दिली. त्यापूर्वी झी मराठीवरील ‘माझे पती सौभाग्यवती’मध्ये छोटी भूमिका साकारली. ‘अग्निहोत्र २’मध्ये मुख्य भूमिकेत होतो. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’मध्ये गोपाळ गणेश आगरकरांची भूमिका साकारली. शाहरुख खानची निर्मिती असलेल्या नेटफ्लिक्सवरील ‘क्लास आॅफ ८३’मध्ये मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट मुंबईतील एन्काऊंटर स्पेशलिस्टवर आधारीत होता. आता ‘फिरस्त्या’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ची संकल्पना आवडल्यानं ही मालिका स्वीकारली. यात करण्यासारखं खूप असल्याचं जाणवलं. भाषा नाशिकची असल्यानं गावाकडच्या भाषेचा टोन शिकावा लागला. टाइपकास्ट व्हायचं नसल्यानं होकार दिला.

  ही मालिका सौंदर्याची नवी व्याख्या मांडणारी असल्याचं सांगत समीर म्हणाला की, या मालिकेत सौंदर्याची व्याख्या नव्यानं मांडण्यात आली आहे. सुंदरतेचे जगामध्ये काही पॅरामिटर्स आहेत. नाजूक, छान सडपातळ, कमनीय बांधा, उंच, लांबलचक केस, टपोरे डोळे असं सर्वसाधारणपणे सौंदर्याचं वर्णन केलं जातं. याच्या अगदी अपोझीट असणाऱ्या नायिकेची म्हणजेच लतिकाची भूमिका अक्षया नाईकनं साकारली आहे. हिच्या अगदी विरुद्ध असणारा नायक या मालिकेत आहे. ‘वजनदार प्रेमाची दमदार गोष्ट’ ही आमच्या मालिकेची टॅगलाईन आहे. खरंच वजनदार प्रेम आहे. ही मालिका सौंदर्याची दृष्टी देणारी आहे. बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्मनातील सौंदर्य खूप महत्त्वाची आहे. तत्त्वज्ञान न सांगता साध्या सरळ भाषेत आपलं म्हणणं मांडणारी आहे. मी साकारलेला अभिमन्यू करियरबाबत पॅशनेट आहे. शिकलेला आहे, पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांना जे प्रश्न भेडसावतात ते याच्यासमोरही आहेत. गावामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. याची काही ध्येयं आहेत ती पूर्ण करण्यासाठी झटतोय. आजच्या तरुणाईला रिप्रेझेंट करणारा आहे. ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन कष्ट करण्याची त्याची जिद्द आहे. असं असताना अगदी विरुद्ध स्वभाव असलेल्या दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक ड्रामा घडतो. काही कारणांमुळं अभिमन्यूला या मुलीशी लग्न करावं लागतं. आपण पूर्णपणे मिस मॅच आहोत हे तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण मित्रही होतो, पण मला ते पटत नव्हतं असं तो सांगतो. नंतर हळूहळू लतिका व्यक्ती म्हणून किती गोड आहे हे त्याला उमगतं.

  अभिमन्यूला शर्यत जिंकायचीय
  आमच्या गावात एक शर्यत होणार आहे. त्याच्या बक्षीसाची रक्कम खूप मोठी आहे. अभिमन्यूनं लतिकाच्या वडीलांकडून पैसे घेतलेले असल्यानं त्याला तिच्यासोबत लग्न करावं लागलेलं असतं. त्यामुळं सुरुवात करताना अभिमन्यूनं लतिकासोबत डील केलेलं असतं. शर्यत झाल्यानंतर पैसे मिळाल्यावर तुझ्या बाबांचे पैसे देणार आणि मी मुक्त होणार असं अभिमन्यूनं लतितासोबत ठरवलेलं असतं. आपल्यात काहीच नातं नसेल. लतिकालाही ते मान्य असतं, पण आता अभिमन्यू हळूहळू तिच्या प्रेमात पडलाय. त्याला लग्न मोडायचं नाही, पण अनेक अडचणी येत असतात त्या दरम्यान आपल्याला लग्न मोडायचं नसल्याचं तो तिला सांगूही शकत नाही. लग्न झाल्यावर आपलं लग्न मोडणार हे तिच्या डोक्यात मात्र फिक्स आहे. आता हे अभिमन्यू कसं सॅाल्व्ह करतो ते पहायचं आहे.

  स्पोर्टस अॅकॅडमी सुरू करायचीय
  अभिमन्यू हा स्पोर्टसमन आहे. स्वत:च्या फिटनेसबाबत सजग आहे. लतिकाला फिटनेसची आवड नाही. तिला खायला आवडतं. याच्या विरुद्ध अभिमन्यूचं आहे. रणजीपर्यंत याचं सिलेक्शन होता होता राहिलेलं असतं. आमदारांचा मुलगा दौलतच्या पॅालिटीक्समुळं संधी हुकते. त्यामुळं आता अभिमन्यूला गावामध्ये स्पोर्टस अॅकॅडमी सुरू करायची आहे. यातून गावातील मुलांकडून त्याला करता आलं नाही ते करवून घ्यायचं आहे. त्याला जे एक्सपोजर मिळालं नाही ते त्यांना मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यानं प्लॅाटही विकत घेतलाय. भूमीपूजनही झालंय. आता पुढच्या बऱ्याच गोष्टी करताना त्याच्या नाकी नऊ येत आहेत. या अडथळ्यांवर मात करत त्याला पुढं जायचं आहे. दुसरीकडं ध्येय असणं बरोबर आहे, पण त्यासाठी योग्य पावलं उचलणं कसं गरजेचं आहे हे लतिका अभिमन्यूला सांगते. प्रॅक्टिकली विचार करणं खूप गरजेचं असल्याचं समजावते. त्यातून अभिमन्यूला एक बॅलन्स साधणं जमू लागतं. यामुळं दोघांमधील मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होऊ लागलं आहे. या सर्वांमध्ये मालिकेनं २५० भागांचा टप्पा गाठला आहे.

  क्लासिकल शिकलेला जिल्हास्तरीय क्रिकेटर
  मला वास्तवात क्रिकेट खेळायला आवडतं. जिल्हास्तरीय क्रिकेट खेळलो आहे, पण दहावीनंतर पुढे सातत्य राखणं जमलं नाही. बार्शीतील सुलाखे हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वतीनं क्रिकेट खेळायचो. नंतर कॅालेजसाठी पुण्याला गेलो आणि क्रिकेट सुटलं. सोलापूर जिल्हा पातळीवर क्रिकेट खेळलोय. मी ओपनिंग बॅटसमन होतो. क्रिकेटशिवाय गायनाचंही शिक्षण घेतलेलं आहे. १० वर्षे क्लासिकल म्युझिक शिकलो आहे. बार्शीमध्येच किराणा घराण्याचे पं. सुरेश हवेली यांच्याकडे गाणं शिकलो. अद्यापही माझा रियाज सुरू आहे. घरामध्येही नाटक आणि संगीताची आवड होती. खरंतर मला घरातून मोकळीक होती, पण मी बारावीनंतर इलेक्ट्रीकल इंजीनियरींग केलं. पुण्यात असताना एकांकिका, पुरुषोत्तम करंडक, फिरोदीया करंडक यांच्याशी संबंध आला, आवड निर्माण झाली, आनंद मिळू लागला आणि अभिनयाकडे वळलो.

  ‘मत्स्यगंधा’साठी गायनाची संधी…
  गाणं गाण्याची संधी कधी मिळाली नाही. यापुढेही प्रयत्न करणार आहे. मध्यंतरी अनंत पणशीकर ‘मत्स्यगंधा’चा नवीन संच उभा करत होते, तेव्हा त्यांचा फोन आला होता, पण तेव्हा ‘गोठ’ नावाची मालिका सुरू असल्याचं वेळेचा ताळमेळ साधणं शक्य झालं नाही. आता मी जरी अभिनय करत असलो, तरी संगीताशी संबंधित काहीही करायला आवडेल. कारण माझं पहिलं प्रेम संगीत आहे. भविष्यात गायनाची एखादी मिळाली तर सोडणार नाही. ‘फिरस्त्या’ या चित्रपटाला ४८ पुरस्कार मिळाले असल्यानं या चित्रपटाला प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया मिळतात याबाबत उत्सुकता आहे.