जाणून घ्या बॉलिवूडचा ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ महेश भट्ट यांच्या काही खास गोष्टी

आज म्हणजेच २० सप्टेंबरला बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांचा वाढदिवस आहे. महेश भट्ट यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांशिवाय इतरही अनेक कारणांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. महेश भट्ट यांचे नाव अनेकदा वादात सापडले आहे. प्रोफेशनल लाईफ व्यतिरिक्त त्यांनी वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. अनेक हिट चित्रपट देऊनही ते वादांमुळे चर्चेत राहिले.

    महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट हे ब्राह्मण होते. तर, त्यांची आई शिरीन मोहम्मद अली मुस्लिम होती. महेश भट्ट यांचे वैयक्तिक आयुष्य वादांनी भरलेले आहे. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला, ज्यामुळे ते वादात सापडले.

    महेश भट्ट कॉलेजमध्ये असताना लॉरियन ब्राइट नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी लग्न गाठ बांधली. लग्नानंतर लॉरियनचे नाव बदलून किरण भट्ट ठेवण्यात आले. किरण आणि महेश भट्ट यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन मुले आहेत. दरम्यान, महेश भट्टचे परवीन बॉबीसोबतही अफेअर होते. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यावेळी महेश भट्ट विवाहित होते. 1977 मध्ये त्यांनी परवीन बाबी यांच्यावर प्रेम व्यक्त केले. विवाहित असूनही महेश भट्ट यांनी पत्नीला सोडले आणि परवीनसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र, काही काळानंतर त्यांचे परवीनसोबतचे नातेही बिघडले. याचे कारण होते परवीन बाबी यांचे आजारपण.

    त्यानंतर महेश भट्टच्या आयुष्यात सोनी राजदान आली. महेश आणि त्याची पहिली पत्नी किरणचे सोनीसोबत प्रेमसंबंध असताना ते एकत्र राहत होते. कायदेशीर घटस्फोट न घेता त्यांनी सोनी राजदानशी लग्न केले. त्यासाठी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना आलिया आणि शाहीन या दोन मुली आहेत.