विंगेतून : संशोधनातील जीवघेणी स्पर्धा!

हा एक संवेदनशील विषय प्रा. अवधूत भिसे यांनी आपल्या 'म' या नाट्यातून अभ्यासपूर्ण मांडला असून उन्मेश वीरकर यांचे दिग्दर्शन त्याला लाभलंय. सत्याची झालर असलेला थरारक दुनियेचा विषय अक्षरशः सुन्न करून सोडतो. राज्य नाट्य स्पर्धेच्या मांडवाखालून आणि प्रासंगिक विषय हे प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न होत असतो.

  चीनमधल्या व्यूहान या शहरात एका भयानक संसर्गाची निर्मिती झाली आणि बघता बघता उभं जग त्यात अडकलं. एका ‘कोरोना’चं दृष्टचक्र सुरू झालं. प्रत्येक घराबाहेर जसा मृत्यू वाट बघत उभा राहिला. नेमक्या याच कालखंडात संशोधक आणि औषधनिर्मिती संस्था या देखील त्यावरली प्रभावी लस शोधण्याच्या कामी लागल्या.

  पैसा कमविण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. जगभरातले संशोधक, त्यांचे संशोधन आणि कंपन्या सक्रिय बनल्या. कसंही करुन कोट्यावधी नव्हे तर अब्जोपती होण्याची ही एक जीवघेणी स्पर्धाच बनली महासत्तेसाठी संघर्ष जुंपला

  हा एक संवेदनशील विषय प्रा. अवधूत भिसे यांनी आपल्या ‘म’ या नाट्यातून अभ्यासपूर्ण मांडला असून उन्मेश वीरकर यांचे दिग्दर्शन त्याला लाभलंय. सत्याची झालर असलेला थरारक दुनियेचा विषय अक्षरशः सुन्न करून सोडतो. राज्य नाट्य स्पर्धेच्या मांडवाखालून आणि प्रासंगिक विषय हे प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न होत असतो. त्याच वाटेवरल ‘म’ याने रंगप्रवास केलाय. त्यात त्याने बाजी मारलीय.

  मुंबईतल्या एका कंपनीत औषध संशोधक या पदासाठी अत्यंत हुशार असलेला राजा पवार पोहोचतो. तिथे सुहानी अग्रवाल ही ऑफिस असिस्टंट आहे. आभास यादव आणि सिराज बुर्हानी हे दोघेही संशोधक तिथे आहेत. व्हिवीयन मेकॅरियस आणि त्यांची पत्नी स्टेला. हे दोघे या कंपनीतले इथले व्यवस्था बघणारे रिसर्च डायरेक्टर.

  जर संशोधनाचं काम यशस्वी झालं तर पुढील कामासाठी ही कंपनी राजाला अमेरिकेला पाठविणार आणि राहाण्याची, जेवणाची व्यवस्था याच २० मजली इमारतीत करण्यात आलेली. सिराज आणि सुहानी हे दोघे इथलं संशोधन दुसऱ्या कंपनीला छुपेपणानं देत आहेत तर राजा आणि आभास हे दोघेजण प्रामाणिकपणाने संशोधनाचे काम करीत आहेत.

  यात आभास मरण पावतो आणि राजावर गोळीबार करून जीव घेण्याचा प्रयत्न होतो. सत्य विरुद्ध असत्य, निष्ठा विरुद्ध गद्दारी, विश्वास विरुद्ध अविश्वास याने भरलेले घटनाप्रधान नाटक जे दोन अंकात आकाराला येते. कोरोना लसीची पार्श्वभूमी असल्याने नाट्य पकड घेणारे.

  नाटककारांनी त्यासाठी आणि संशोधनात्मक दाखले, पुरावे, संज्ञा याचा पुरेपूर उपयोग कथेच्या ओघात केलाय. राजा पवार याचे शेवटचं अर्थपूर्ण स्वगत म्हणजे, एकूणच वैचारिक मंथनच ठरते. मृत्यूची जराही कल्पना न देता माणसं ठार मारणारे राक्षस समाजात सक्रीय आहेत. पृथ्वी आणि पृथ्वीवरला मानव वाचविण्यासाठीच्या प्रयत्नात साऱ्यांनी जागे राहा, असा संदेशही या निमित्त्याने देण्यात आलाय. जो विचार करायला लावणारा.

  राजा पवारच्या भूमिकेत विलास मोरे यांनी आपली भूमिका रंगवितांना रंगभूमीवरली हुकमत सिद्ध केलीय. शेवटचे स्वगत चांगले रंगले आहे. धीरेन बलसाने याचा खलनायकी सिराज शोभून दिसतो. संतोष मोरे आणि सायली पेडणेकर यांनी उच्च सुशिक्षित संशोधक दाम्पत्य म्हणून प्रत्येक प्रसंगाला न्याय दिलाय.

  शंतनु राऊत (आभास), संकेत झगडे (डॉ. स्टॅलिन), राखी राणे (सुहानी), दिपक पेठे (विलासराज), शिल्पा शाह (जागृती) यांच्याही भूमिका वाट्याला पूरक. नेपथ्य हे प्रतिकात्मक आणि प्रकाशयोजना – संगीत हे देखिल आवश्यकतेनुसार. त्यात कुठेही अतिरेकीपणा नाही.

  हे नाट्य दिग्दर्शकाच्या चष्म्यातून सादर करणे तसे आव्हानात्मक असले तरीही कल्पक दिग्दर्शक उन्मेश वीरकर यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न भुरळ पाडतात भडक विषय असूनही मांडणीही संयमाने केली आहे नाटककार आणि दिग्दर्शक यांचे ट्युनिंग मस्त जमले आहे.

  अशा प्रासंगिक विषयांवरली नाटके ही काळाची गरज असून व्यावसायिक रंगभूमीवर मानाचे पान मिळावे, ही अपेक्षा. प्रायोगिक रंगभूमीचा आधार असणाऱ्या ‘प्रयोग मालाड’ या संस्थेने याची निर्मिती करून ते पुढलं पाऊल टाकले आहे. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल. एक वैचारिक दिशादर्शकता या आविष्कारातून नजरेत भरते.

  नाटकाचे शीर्षक ‘म’ तसे अर्थपूर्ण. यात ‘म’ महत्त्वाकांक्षा असणारे. ‘म’नस्वी आनंद लुटू पाहाणारे. ‘म’रण भेट म्हणून देणारे. औषध कंपन्यांमध्ये सुरू असलेली जीवघेणी स्पर्धा ‘मरण’या भोवती फिरते. आजच्या वेगवान कार्पोरेट दुनियेत प्रत्येकजण जगण्याची दिशा ठरविण्याचा असलेला मूलभूत हक्क हा गमावून बसला आहे. संशोधक, अभ्यासक, तज्ञ जरी जगत असले तरी दुसर्याच कुणाच्या ‘बॉस’च्या हाती आपलं सर्वस्व सोपवून अगतिक बनलेत. त्यांचं अस्तित्व आहे दिखावू खेळणं झालंय… याचीही प्रचिती यातून येते.

  या नाटकाच्या निमित्ताने प्रा. भिसे यांनी मांडलेले विचारही थरारून सोडणारे. वाढत्या प्रदूषणाचा फटका हा जगभरातल्या जीवसृष्टीला बसत चाललाय. मृत्यूचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भय मानवजातीला आहे. आजवर दोन महायुद्धे झालीत कोट्यावधींचे जीव गेले. ‘अणुबॉम्ब’चा हादरा होता.

  आता बदलत्या काळात बलाढ्य शक्ती संशोधनाच्या जोरावर अशाच प्रकारच्या रोगजंतूंचा फैलाव करून मानवीसंहाराचा नवा पर्याय वापरू शकतात. शत्रू आणि लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचाही ‘प्रयोग’ होऊ शकतो. हे देखिल या ‘म’ नाट्यातून प्रभावीपणे मांडले आहे. या नाट्यातून कुठेतरी गंभीरपणे बघण्याचा तसेच भविष्याचा वेध घेण्याचा प्रयोग हा नोंद घेण्याजोगा म्हणावा लागेल.

  ‘म’
  लेखक – प्रा. अवधूत भिसे
  दिग्दर्शक/प्रकाश – उन्मेश वीरकर
  संगीत – राजेंद्र वैशंपायन/सुनील नार्वेकर
  नेपथ्य – प्रदीप पाटील
  रंगभूषा – उदेश खंदारे
  निर्मिती सूत्रधार – भूषण मंत्री
  निर्मिती – प्रयोग, मालाड

  संजय डहाळे

  sanjaydahale33@gmail.com