साहित्य संस्कृती मंडळावर अध्यक्षांसह अनेक सदस्यांची पुन्हा लागली वर्णी, साहित्य विश्वातून स्वागतासोबत टीकेलाही सुरुवात

मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाची गुरुवारी पुनर्रचना जाहीर झाल्यानंतर साहित्य विश्वातून याच्या स्वागतासोबत टीकेलाही सुरुवात झाली आहे.

    मुंबई: साहित्य-संस्कृती मंडळावर फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील नियुक्त केलेल्या सदानंद मोरे(Sadanand More) यांचीच अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती झाल्याने आक्षेप नोंदवला जात आहे. मोरेंसोबत अरुण शेवते, भारत सासणे आणि डॉ. रणधीर शिंदे यांची मंडळावर पुन्हा नियुक्ती झाली आहे. त्यामुळे केवळ याच सदस्यांची पुनर्नियुक्ती होण्याचे कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

    याशिवाय ही सदस्य संख्या ३५ वरून ३० वर आणल्यानेही नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. तीन पक्षांचे सरकार असल्याने तीनही पक्षाशी संलग्न मंडळींनी समिती सदस्य होण्यासाठी इच्छा व्यक्त केल्यानंतरही दोन्ही मंडळांमधील मोजक्या सदस्य संख्येचे कारण काय, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

    काही सदस्यांची पुन्हा लागली वर्णी
    मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळाची गुरुवारी पुनर्रचना जाहीर झाल्यानंतर साहित्य विश्वातून याच्या स्वागतासोबत टीकेलाही सुरुवात झाली आहे. प्रदीर्घ काळाने मराठी भाषा अभ्यासकांना काम करायला मिळणार याच्या आनंदासोबत काही सदस्यांची या समित्यांवर पुन्हा लागलेली वर्णी, विदर्भातील मराठी भाषा अभ्यासकांचे प्रमाण या मुद्द्यांकडे लक्ष वेधले जात आहे.

    विदर्भाचे स्थान नगण्य
    अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पूर्वाध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी सातत्याने मराठी भाषा विभगाशी निगडीत समित्या आणि मंडळांसाठी पाठपुरावा केला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या मंडळाबद्दल विदर्भाचे स्थान नगण्य असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला. वैदर्भीय भाषा, साहित्य आणि संस्कृतीची परंपरा अतिशय समृद्ध असून त्यापैकी केवळ डॉ. रवींद्र शोभणे आणि रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनाच मंडळामध्ये स्थान देण्यात आल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

    मंडळामध्ये केवळ एकेक नाव दिल्याने प्रादेशिक समतोल राखला जात नसून अशा गोष्टींमुळे विदर्भामध्ये विलगीकरणाची भावना वाढते या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. दोन्ही मंडळांच्या नियुक्त्यांमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व वाढवावे, असी मागणीही त्यांनी या निमित्ताने केली आहे.

    आंबेडकर चरित्र साधने समितीच्या सदस्य
    प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या नावाबद्दलही काहींनी हरकत नोंदवली. पवार या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यही आहेत. त्याचबरोबर त्या आता साहित्य-संस्कृती मंडळाच्या सदस्यही आहेत. त्यामुळे त्यांची दोन समित्यांवर नियुक्ती कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मात्र अशा प्रकारे या आधीही दोन समित्यांवर अनेक सदस्यांची नियुक्ती झाली आहे याकडेही लक्ष वेधण्यात आले.