gurunath naik

रहस्यकथाकार म्हणून प्रसिद्ध असलेले गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक (Gurunath Naik Passed Away) यांचे आज दुपारी पुण्यात निधन झाले.

    पणजी :  अनेक मराठी कादंबऱ्या लिहिणारे, रहस्यकथाकार म्हणून प्रसिद्ध असलेले गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक (Gurunath Naik Passed Away) यांचे आज दुपारी पुण्यात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच नाईक यांनीही रहस्य कादंबर्‍यांव्दारे एका मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवले.

    रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या. महिन्याकाठी ते ७-८ कादंबर्‍या ते सहज लिहित.

    मिळालेल्या माहितीनुसार, १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबर्‍या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणार्‍या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्यलढ्याचीही पार्श्वभूमी आहे. नाईक यांनी वर्तमानपत्रांमध्येही काम केले आहे.