‘लॅाकडाऊन लग्न’चा मुहूर्त ठरला, अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत चित्रपटाची अधिकृत घोषणा!

निर्माते वऱ्हाडी बनले असून, सहनिर्माते हे सहवऱ्हाडी आहेत. लंडनमधील तरडे मंगल कार्यालयात विवाह सोहळा पार पडणार असून, आपला आहेर हाच आशिर्वाद असं काहीसं कन्फ्युज करणारं वाक्य लिहिलं आहे.

    अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत ‘लॅाकडाऊन लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा आणि मुहूर्त करण्यात आला आहे. ‘नवराष्ट्र’ने यापूर्वीच या चित्रपटाची एक्सक्लुझीव्ह माहिती वाचकांना दिली आहे. लंडनच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाईन! असा नारा देत ‘लॅाकडाऊन लग्न’चा मुहूर्त करण्यात आला आहे. विधीवत पूजा करून ‘लॅाकडाऊन लग्न’चा श्रीगणेशा करण्यात आला आहे. याप्रसंगी निर्माता-दिग्दर्शकांसोबत तंत्रज्ञांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

    पूजा विधी पार पडल्यानंतर सेलिब्रेशन म्हणून केकही कापण्यात आला. याचं औचित्य साधत एक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. यावर विवाहासाठी आवश्यक साहित्याच्या जोडीला सॅनिटायझर, आॅक्सीमीटर, टेम्परेचर गन अशा वस्तूही आहेत. आंतरपाटाऐवजी मास्कवर गुरुजी म्हणून दिग्दर्शकाचं नाव आहे. निर्माते वऱ्हाडी बनले असून, सहनिर्माते हे सहवऱ्हाडी आहेत. लंडनमधील तरडे मंगल कार्यालयात विवाह सोहळा पार पडणार असून, आपला आहेर हाच आशिर्वाद असं काहीसं कन्फ्युज करणारं वाक्य लिहिलं आहे.

    या चित्रपटाचं चित्रीकरण युकेमध्ये होणार आहे. किरण कुमावत, स्वाती अमेय खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित संघमित्र करणार आहेत. निनाद बट्टीन आणि तबरेज पटेल या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटातील कलाकारांची नावं सध्या तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. लॅाकडाऊन संपल्यानंतर या चित्रपटाची संपूर्ण टीम लंडनच्या दिशेनं उड्डाण करणार आहे.