‘लूप लपेटा’मधील जुलियाच्या भूमिकेसाठी श्रेयाची निवड!

श्रेयानं यापूर्वी एलिप्सिस एन्टरटेनमेन्टसोबत काम केल्यामुळं निर्मात्यांना तिच्या अभिनय कौशल्याची जाण होती. त्यामुळेच त्यांनी 'लूप लपेटा'मधील जुलियाच्या भूमिकेसाठी श्रेयाची निवड केली.

    ‘स्कॅम १९९२’ आणि ‘फॅमिली मॅन’ या दोन गाजलेल्या वेब सिरीजमध्ये चमकलेली श्रेया धन्वंतरी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या दोन वेब सिरीजद्वारे श्रेया घरोघरी पाहोचली आहे. हिच श्रेया आता मोठ्या पडद्यावरही दिसणार आहे. तापसी पन्नू आणि राज भसीन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘लूप लपेटा’ या आगामी चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या चित्रपटात श्रेया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

    ‘लूप लपेटा’चे निर्माते तापसी आणि ताहिर म्हणजेच सावी आणि सत्या यांच्या भूमिकांच्या तोलामोलाचा अभिनय करणाऱ्या एखाद्या अॅक्टरच्या शोधात होते. श्रेयानं यापूर्वी एलिप्सिस एन्टरटेनमेन्टसोबत काम केल्यामुळं निर्मात्यांना तिच्या अभिनय कौशल्याची जाण होती. त्यामुळेच त्यांनी ‘लूप लपेटा’मधील जुलियाच्या भूमिकेसाठी श्रेयाची निवड केली. सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिप्सिस एंटरटेनमेंट (तनुज गर्ग, अतुल कसबेकर),  आयुष महेश्वरी यांची निर्मिती असलेला व आकाश भाटिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘लूप लपेटा’ हा  चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.