madhav kaushik

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी आज दिल्लीत निवडणूक झाली. या निवडणुकीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे (Rangnath pathare), हिंदी साहित्यिक व अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तसेच कन्नड साहित्यिक डॉ. मल्लेपुरम व्यंकटेश यांच्यामध्ये चुरस होती.

नवी दिल्ली: साहित्य अकादमीच्या (Sahitya Akademi) अध्यक्षपदी माधव कौशिक (Madhav Kaushik) यांचा विजय झाला आहे. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी आज दिल्लीत निवडणूक झाली. या निवडणुकीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे (Rangnath pathare), हिंदी साहित्यिक व अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तसेच कन्नड साहित्यिक डॉ. मल्लेपुरम व्यंकटेश यांच्यामध्ये चुरस होती. दरम्यान माधव कौशिक यांनी बाजी मारत साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाचा मान मिळवला आहे. साहित्य अकादमीच्या 97 सदस्यांनी मतदान केलं. मराठी साहित्यिकाला आत्तापर्यंत एकदाही अकादमीचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळालेला नाही. याही वर्षी ही संधी हुकली आहे.

गेल्या वेळी ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले होते. मात्र, त्यांना फक्त चार मते मिळाली होती. प्रचार न करण्याची नेमाडे यांनी केलेली चूक यावेळी दुरुस्त करण्याचा पठारे यांनी प्रयत्न केला. साहित्य अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेच्या अधिकाधिक सदस्यांशी पठारे यांनी संपर्क साधला होता. शिवाय, पठारेंच्या कादंबऱ्यांचे अन्य भाषांमध्ये अनुवाद झालेले असल्यामुळे अन्य भाषक साहित्यिकांनाही पठारे परिचित आहेत. त्यामुळे नेमांडेंपेक्षा पठारेंना विजयाची अधिक संधी असू शकते, असे या निवडणुकीच्या घडामोडींशी संबंधित समीक्षकांचे म्हणणे होते. मात्र प्रत्यक्षात निकाल वेगळाच लागला.

माधव कौशिक यांचा जन्म हरियाणामधील भिवानी शहरात  1 नोव्हेंबर 1954 ला झाला. त्यांनी हिंदी कविता, कथा, बाल साहित्य आणि गझलच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘सारे सपने बागी हैं’, ‘आईनों के शहर में’, ‘किरण की सुबह’, ‘सपने खुली निगाहों के’, ‘हाथ सलामत रहने दो’, ‘आसमान सपनों का’ आणि ‘नई सदी का सन्नाटा’ या त्यांच्या काही गाजलेल्या गझल आहेत.