film bazaar in iffi

महाराष्ट्र ही चित्रपटाची पंढरी आहे. मराठी सिनेमासह बॉलिवूड सिनेमांची निर्मिती राज्यात मोठ्या प्रमाणात होत असते. मागील अनेक वर्षांची बॉलिवूड सिनेमाची असलेली परंपरा आणि मराठी सिनेमांचे बदलते रंग-रूप या धरतीवर फिल्म ऑफिसची रचना करण्यात आली आहे.

    पणजी: गोव्यातील आंतरराष्ट्रीय फिल्म बाजारच्या (International Film Bazaar) महाराष्ट्र फिल्म ऑफिसला मागील तीन दिवसापासून जगभरातील निर्माते, दिग्दर्शक, चित्रपट समीक्षक सिने कलाकार आणि सिने जाणकार मंडळी भेटी देत आहेत. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे (Avinash Dhakne) यांच्या संकल्पनेतून साकार झालेली महाराष्ट्र आणि बॉलिवूड यांचे नाते सांगणारी फिल्म ऑफिसची (Film Office) अंतर्गत रचना येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

    फिल्म ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला फिल्म ऑफिसची सजावट आणि निवडलेली बॉलिवूड थीम आवडत असून फिल्म ऑफिसचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथे तयार करण्यात आलेला ‘आय लव्ह बॉलिवूड’ सेल्फी सगळ्यांसाठीच आकर्षण ठरला आहे. त्यामुळे प्रत्येकालाच सेल्फी काढण्याचा मोह होत आहे. महाराष्ट्र ही चित्रपटाची पंढरी आहे. मराठी सिनेमासह बॉलिवूड सिनेमांची निर्मिती राज्यात मोठ्या प्रमाणात होत असते. मागील अनेक वर्षांची बॉलिवूड सिनेमाची असलेली परंपरा आणि मराठी सिनेमांचे बदलते रंग-रूप या धरतीवर फिल्म ऑफिसची रचना करण्यात आली आहे.

    महामंडळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय फिल्मबजार करीता पल्याड, राख, पोटरा, तिचं शहर होणं या चार मराठी सिनेमाची इंडस्ट्री स्क्रिनींग करीता निवड करण्यात आली आहे. या चार सिनेमांचे दिग्दर्शक आणि निर्माते यांचे शिष्टमंडळ देखील याठिकाणी उपस्थित आहे. मराठी सिनेमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागतिक बाजार मिळावी यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून २०१५ पासून फिल्म बजारकरीता महामंडळ सहभाग दर्शवत आहे.