अभिनेता संजय दत्तच्या कर्करोगाच्या कथेतून मिळाली प्रेरणा- महिमा चौधरी

अभिनेत्री महिमा चौधरीने नुकतेच ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर कॅन्सरशी लढा दिल्याबद्दल सांगितले आहे.

  अभिनेत्री महिमा चौधरीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, कर्करोगाशी लढण्याच्या तिच्या प्रवासात संजय दत्त तिची प्रेरणा आहे. महिमाने सोशल मीडियावर ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानाची माहिती दिली होती. मात्र, आता अभिनेत्री या धोकादायक आजारातून बरी झाली आहे.

  ऑगस्ट 2020 मध्ये संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे निदान झाले

  महिमा चौधरी ‘द सिग्नेचर’ या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. कामावर परतण्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, संजय दत्तच्या कर्करोगाच्या कथेने तिला प्रेरणा दिली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये संजयला स्टेज 4 फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याच्यावर मुंबईत मोठ्या प्रमाणावर उपचार करण्यात आले. कर्करोगमुक्त घोषित केल्यानंतर, अभिनेता चित्रपटाच्या सेटवर परत गेला आणि ‘KGF 2’ च्या क्लायमॅक्स सीनचे शूटिंग पूर्ण केले.

  महिमाने संजयच्या कामाबद्दलच्या वचनबद्धतेचे स्मरण करून सांगितले की, “माझ्या कथेकडेही प्रेरणा म्हणून पाहिले गेले तर मला खूप आनंद होईल. कारण मी इतर लोकांच्या प्रवासातूनही प्रेरणा घेतली आहे. जेव्हा संजय दत्त कर्करोगाशी झुंज देत होता. तेव्हाही तो शूटिंगमध्ये होता. सेट आणि त्याच्या कथेने मला प्रेरणा दिली.”

  महिमा पुढे म्हणाली, “मी, संजय दत्त आणि महेश मांजरेकर, आम्ही सर्वांनी ‘कुरुक्षेत्र’ चित्रपटात एकत्र काम केले होते आणि आम्हा तिघांनाही कॅन्सरशी जवळजवळ एकाच वेळी लढावे लागले होते.” तसेच महिमा म्हणाली की सोनाली बेंद्रे, मनीषा कोईराला आणि ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरच्या कथांनी तिला प्रेरणा दिली.

  महिमा ‘द सिग्नेचर’मधून पुनरागमन करणार आहे

  महिमा सध्या लखनऊमध्ये तिच्या आगामी ‘द सिग्नेचर’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अनुपम यांच्या कारकिर्दीतील हा 525 वा चित्रपट असेल. महिमाने अलीकडेच चित्रपटाच्या सेटवर विग घातलेला एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री शेवटची 2016 मध्ये ‘डार्क चॉकलेट’ या बंगाली चित्रपटात दिसली होती.